ठाणे महापालिका परिवहन समितीच्या निवडणुकीत झालेला पराभव झाल्याचे शिवसेनेला भलताच झोंबला आहे.
ठाणे – ठाणे महापालिका परिवहन समितीच्या निवडणुकीत झालेला पराभव झाल्याचे शिवसेनेला भलताच झोंबला आहे. त्यामुळे रडीचा डाव खेळत मित्रपक्ष भाजपतील मिलिंद पाटणकर यांना मारहाण केली आहे.
पाटणकर यांनी फूस लावल्याने भाजपचे अजय जोशी यांनी लोकशाही आघाडीला मत दिले, असे सांगत उपमहापौर कार्यालयाकडे मोर्चा वळवणा-या शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
परिवहन सदस्य बाळा राऊत व इतर यांच्या दालनाचीही मोडतोड करण्यात आली आहे. पाटणकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या दालनात शिवसेनेकडून त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याने अखेर उपमहापौर पाटणकर यांनी महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्याकडे राजीनामा दिला.
या घटनेनंतरही पालिका मुख्यालयात शिवसेना कार्यकर्ते घोळक्या घोळक्याने पाटणकर केव्हा बाहेर येतात, त्याची वाट पाहत होते. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी तर पाटणकर यांना बांगडयांचा आहेर आणला. पण पोलिसांनी तो बेत हाणून पाडला. त्यामुळे सोमवारी दिवसभर शिवसेनेच्या गुंडगिरीचीच चर्चा होती.
पाटणकरांच्या राजीनाम्यासाठी प्रदेशाध्यक्षांना साकडे
भाजपचे शहराध्यक्ष व उपमहापौर मिलिंद पाटणकर यांची अजय जोशी यांनी फूस होती. त्यामुळे जोशी यांनी लोकशाही आघाडीला मतदान केले. याला जबाबदार पाटणकर यांचा राजीनामा घ्यावा, असे साकडे भाजपचे पालिका गटनेते संजय वाघुले यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून घातले आहे.
या निवडणुकीपुर्वी जोशी यांना (व्हीप) पक्षादेश जारी करण्यात आला होता. मात्र पाटणकर यांनी या व्हीपवर सही करायची नाही, असे आदेश दिले. त्यामुळे युतीचे उमेदवार कदम यांचा पराभव झाला, ही बाबही वाघुले यांनी निदर्शनास आणली आहे.
महापौर निवडणुकीत युतीविरोधात मतदानासाठी पाटणकर यांनी भाजप सदस्य मुकेश मोकाशी, राजकुमार यादव यांनी पैशाचे आमिष दाखवले होते, ही बाबही त्यांनी निदर्शनास आणली आहे.
परिवहनची गाडी रुळावर आणणार
ठाणे परिवहन सेवेचा गाडा सुरळित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. परिवहनला स्थायी समितीकडून सहकार्य मिळत नसल्याने या सेवेचा बोजवारा उडाला आहे, असे नवनिर्वाचित सभापती शैलेश भगत यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुखांच्या गाडीतून आले जोशी
ठाणे परिवहन समितीत शिवसेना-भाजपा युतीचे चार तर लोकशाही आघाडीचे तीन सदस्य होते. त्यामुळे भाजपाचे अजय जोशी यांचे मत निर्णायक ठरणार होते. जोशी यांच्याकडून दगाफटका होऊ शकतो. याची भीती शिवसेनेला होती. त्यासाठी सकाळी जोशी यांना शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी आपल्या गाडीतून आणले. पण जोशींचे मन वळवण्यास ते असफल ठरले.
गोव्याची सहलही फसली
सभापतीपदाचा अर्ज भरताना शैलेश भगत यांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेना सावध झाली. यासाठीच शिवसेनेने आपल्या सदस्यांना गोव्याची सहल घडवून आणली. त्यात जोशीही होते. पण शिवसेनेला त्यांच्या व्यूहरचनेत यंदा यश आले नाही.
धर्मवीर आनंद दिघे यांनी ज्या परिवहन सेवेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं-सांभाळलं, तीच परिवहन आज त्यांच्या पश्चात त्यांच्याच शिलेदारांच्या राजकारणामुळे विरोधकांच्या ताब्यात गेली. जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे हे स्वतला तोड-फोडीच्या राजकारणाचे माहीर समजतात. पण आज त्यांचाच `डाव’ त्याच्यावर उलटलेला दिसतोय. स्वपक्षातील बंडखोराला सांभाळता न आल्याचा राग मित्रपक्षाच्या कानाखाली काढून शिंदे यांनी कोणते राजकारण खेळले? शहराच्या उपमहापौरांना झालेली मारहाण ही शहराचीच बदनामी नव्हे का? `सदशिवपेठी’ पाटणकरांवर उगारलेले युतीचे हात `भगत’ यांना बंडखोरी करण्यापासून रोखू शकले नाहीत एवढे मात्र खरे…