खंडोबाविषयी सर्वाधिक माहिती देणारा ‘मार्तंड विजय’ हा हस्तलिखित ग्रंथ डिजिटल रूपात संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे.
जेजुरी- खंडोबाविषयी सर्वाधिक माहिती देणारा ‘मार्तंड विजय’ हा हस्तलिखित ग्रंथ डिजिटल रूपात संकेतस्थळावर उपलब्ध झाला असून, खंडोबाविषयीचा डिजिटल रूपात उपलब्ध होणारा हा पहिलाच हस्तलिखित ग्रंथ आहे.
यामुळे खंडोबा उपासक व अभ्यासकांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती जयाद्री मित्र-परिवार सदस्य गणेश टाक यांनी दिली.
‘मार्तंड विजय’ खंडोबा उपासनेमध्ये महत्त्वपूर्ण स्थान असलेला ग्रंथ आहे. शंकराने मणीमल्ल वधासाठी मार्तंड भैरव अवतार धारण केला.
या विजयाचे वर्णन करणारा हा ग्रंथ असून या ग्रंथास ग्रंथकर्त्यांनी ‘मार्तंड विजय’ नाव दिले आहे. या ग्रंथाचे लिखाण जेजुरी येथील कडेपठार निवासी कवी गंगाधर कमलाकर यांनी शके १७४५ मध्ये कडेपठारी येथे केले.
३७ अध्याय व ४५५६ ओव्या या ग्रंथामध्ये असून या खंडोबा उपासनेत मल्हारी महात्म्य, जयाद्री महात्म्य, मैलार तंत्र, भैरव तंत्र, व इतर अनेक ग्रंथांचा आधार गंगाधर कवींनी घेतलेला आहे.
यातील जयाद्री महात्म्य, मैलार तंत्र, भैरव तंत्र हे ग्रंथ आज उपलब्ध नाहीत, खंडोबा अवतार कथा, जेजुरी महात्म्य, खंडोबाच्या विविध उपासना अशा अनेक विषयांचा समावेश या ग्रंथामध्ये आहे.
या ग्रंथाचे जेजुरी येथील कडेपठार येथे उपलब्ध झालेल्या प्रतीवरून १८८८ मध्ये कै. भिकोबा टाक जेजुरी यांनी स्वहस्ताक्षरात या ग्रंथाची प्रत तयार करून हा अनमोल ठेवा जतन करून ठेवला होता. हे ग्रंथ पाहण्यासाठी व खंडोबाचे टाक याच्याविषयी माहितीसाठी जर्मन खंडोबा अभ्यासक गुंथर सोन्थ्यामर यांनी अनेकदा त्यांची भेट घेतल्याचे समजते.
भिकोबा टाक यांनी हस्तलिखित केलेल्या ‘मार्तंड विजय’ ग्रंथाच्या या प्रतीवर आजपर्यंत अनेक पारायणे सिद्ध झाली आहेत. अशा या ग्रंथाची डिजिटल आवृत्ती आता इंटरनेटच्या माध्यमातून आता सर्वासाठी उपलब्ध झाली आहे.
या संकेतस्थळावर ‘सिद्धपाल केसरी लिखित’ मल्हारी महात्म्य व श्रीधर स्वामी लिखित ‘मल्हारी महात्म्य’ या दोन्ही ग्रंथांची डिजिटल आवृत्ती उपलब्ध आहे, सचित्र खंडोबा अवतार कथा, खंडोबा कुलधर्म-कुलाचार यांची माहिती संकेत स्थळावर असून जेजुरी, जेजुरी गड, कडेपठार, व परिसराची धार्मिक, सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक व पर्यटन यांची विस्तृत सचित्र माहिती व महाराष्ट्रातील पाली, शेगूड, सातारे, नळदुर्ग, अणदूर, कर्नाटकातील आदिमैलार, मंगसुली, देवरगुड्डा, मृणमैलार, व आंध्र प्रदेशमधील कोमीरवेल्ली या खंडोबा स्थानाचा सचित्र परिचय या संकेतस्थळावर आहे.
भारतातील विविध राज्यांतील खंडोबा स्थळावरून इंग्रजी काळात खंडोबाची दुर्मीळ पेंटिंग व धातू मूर्ती ब्रिटनला नेण्यात आली होती ती आजही ब्रिटिश संग्रहालयात उपलब्ध असून जागतिक संकेतस्थळाद्वारे ही छायाचित्रे अनेक वर्षापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली असून यामध्ये जेजुरीतील ऐतिहासिक होळकर तलाव व गड परिसरातील चित्रांचा सामावेश करण्यात आल्याचे समजते. या साहित्यामुळे खंडोबा लोकसंस्कृती साहित्य या विषयाकडे देशी-विदेशी अभ्यासक संशोधकांचे लक्ष वेधले जात आहे.
या बातमी मधील मार्तंड विजय ग्रंथ http://jejuri.net या संकेतस्थळ वर पुढील लिंक वर उपलब्ध आहे. http://jejuri.net/khandoba-literature/#martandavijay