१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनने फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नवी दिल्ली – १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनने फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याकूबला ३० जुलैला फाशी देण्यात येणार होती.
गुरुवारी याकूबच्या वकिलांनी फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबतची याचिका दाखल केली आहे. याकूबच्या प्रकरणात अन्य कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याने त्याला फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली गेली पाहिजे असे याकूबच्या वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
याआधी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने याकूबची सुधार याचिका फेटाळून लावल्याने त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले होते.
सुधार याचिकेसंदर्भात तयार केलेल्या निकषांमध्ये मेमनची याचिका बसत नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या पीठाने ही याचिका फेटाळून लावली होती.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर तासाभरातच याकूबने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दयेची याचिका दाखल केली.
१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर ७०० हून अधिक जखमी झाले होते. याकूब या स्फोटांचा मास्टरमाईंड होता. पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या मेमनला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी १९९४ मध्ये अटक झाली होती. २००७ मध्ये टाडा न्यायालयाने याकूबला फाशीची शिक्षा सुनावली होती.
या शिक्षेविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. मात्र त्याच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. त्यानंतर मेमनचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनीही फेटाळून लावला होता.
हि अशीच नाटके करत करत आणखीन वीस वर्ष हा याकुब जिवंत राहणार हे नक्कीच