रंगीबेरंगी, हालचाल करणा-या, सागरतळाशी असलेल्या सुंदर माशांना तासन् तास पाहत राहण्याचा मोह कोणाला आवरत नाही. विविध आकाराचे आणि रंगांचे मासे पाहिले की तिथे क्षणभर का होईना पण थबकल्याशिवाय राहत नाही. रोज दहा मिनिटं फिश टँकचं निरीक्षण केलं तर दैनंदिन जीवनातील ताणतणाव ५० टक्क्यांनी कमी होतो. यातूनच घरोघरी फिश टँक विराजमान झाले आहेत.
रंगीत सुंदर माशांची समुद्राच्या तळातली दुनिया आता थेट आपल्या घरात वसवता येते. अॅक्वेरिअम ही आता केवळ मत्स्यालयात जाऊन पाहण्याची किंवा श्रीमंतांच्या घरातली मक्तेदारी राहिलेली नाही. एका छोटय़ाशा काचेच्या पेटीत तुमच्या घराच्या कोप-यात ही मत्स्यसुंदरी अवतरू शकते. किंवा एखाद्या बाउलमध्ये गोल्डफिश डोळ्याला आनंद देऊ शकतो. विविध आकाराचे आणि रंगांचे मासे पाहिले की तिथे क्षणभर का होईना पण थबकल्याशिवाय राहत नाही. रोज दहा मिनिटं फिश टँकचं निरीक्षण केलं तर दैनंदिन जीवनातील ताणतणाव ५० टक्क्यांनी कमी होतो. ही बाब डॉक्टरांनीही मान्य केली आहे.
आणि हो घरातल्या लहान मुलांना मानसिकरीत्या गुंतवण्यासाठी हे फिश टँक उपयोगी पडतात. बऱ्याचदा पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी हे शिकवण्यासाठी सुरुवात फिश टँकपासून केलेली बरी. माशांना वेळच्या वेळी खायला कसं द्यावं, टँकची साफसफाई कशी करावी आणि जीवनचक्राची योग्य माहिती होण्यासाठी फिश टँकचा खूपच उपयोग होतो.
शिवाय फिश टँक कोणत्याही आकाराचा असो तो घराची शोभाही वाढवतो. त्यामुळे घरोघरी फिश टँक ठेवण्याचा ट्रेंड सध्या जोर धरतोय.
लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत फिश टँकचं आकर्षण वाटत आलं आहे. पण या फिश टँकची देखभाल कशी करावी, माशांना कधी आणि केव्हा खायला द्यावं याची खूप कमी जणांना माहिती असते. परिणामी मासे मरतात. असं होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी, याविषयी थोडक्यात माहिती…
बाजारात चौकोनी, आयताकृती आणि गोलाकार अशा आकारात फिश टँक उपलब्ध आहेत. त्याप्रमाणे आपल्या आवडीनुसार हव्या त्या आकारातला फिश टँक आणावा.
बाजारातून नवीन टँक आणल्यावर त्याच्या काचेवर जाडं मीठ घासावं. त्यानंतर संपूर्ण दिवसभर पाणी भरून ठेवावं. जेणेकरून फिश टँकला रबर सोल्युशनमुळे येणारा केमिकल आणि रबराचा उग्र वास जाण्यास मदत होते.
दुस-या दिवशी टँकमधील पाणी फेकून तो टँक साफ करावा. त्याच्या काचेवर पुन्हा जाडं मीठ घासावं. त्यानंतर त्यात पाणी भरून ठेवावं. दोन दिवसांनंतर त्यात आपल्याला हवे ते मासे सोडावेत.
पाण्यात मासे सोडल्यानंतर त्यांना ताबडतोब खायला देऊ नये. कारण टँकमधील वातावरणाशी किंवा पाण्याशी जुळवून घ्यायला माशांना २४ तास इतका कालावधी लागतो. चोवीस तासांनंतर माशाला खायला द्यावं.
माशांच्या खाद्याचे(फीडिंग)ही खूप प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यात ब्लड वंग आणि साधे कीटक यांसारख्या जिवंत खाद्याप्रमाणे लाल-हिरव्या रंगातील रेडिमेड खाद्यही उपलब्ध आहे.
फिश टँक सजवण्यासाठी तुम्ही एखादा निसर्गचित्र असलेला वॉलपेपरही लावू शकता. समुद्रातील पाण्याखाली दिसणाऱ्या दृश्याप्रमाणे कितीतरी वॉलपेपर बाजारात मिळू शकतात. याशिवाय सजावटीसाठी झाडं, लहान-मोठे रंगीत दगड आणि वाळूही वापरली जाते.
टँकमध्ये ठेवण्यासाठी विविध प्रकारचे, रंगांचे, आकाराचे मासे बाजारात मिळतात. सध्या तर त्यात फेंगशुई माशांचीही भर पडली आहे. इतकंच नव्हे तर खास टँकच्या सजावटीसाठी विशिष्ट टय़ूबलाइट आणि बल्बही बाजारात उपलब्ध आहेत.
छोटय़ा फिश टँकसाठी निऑन मासे वापरले जातात. कारण ते रात्रीचे काजव्याप्रमाणे चमकतात.
लाल, गुलाबी, निळ्या रंगांचे फ्लॉरॉन तसंच गोल्डन, सिल्व्हर, पर्ल रंगांचे अरवाना जातीचे मासे फिश टँकमध्ये ठेवण्याचा ट्रेंड रुजू लागला आहे. अरवाना जातीचे मासे ठेवताना मात्र विशेष काळजी घ्यावी लागते. हे मासे विषम संख्येत ठेवले जातात. तसंच या माशांची वाढ झाल्यावर याची किंमत लाखाच्या घरातही जाऊ शकते. डिस्कस नावाचे मासे अतिशय नाजूक आणि दिसायला सुंदर असतात. ते शक्यतो एकाच जागी तरंगतात. परंतु एक जागा सोडून दुसरीकडे जाताना एका क्षणात जातात.
माशांमध्ये आक्रमक आणि शांत असे दोन प्रकार असतात. ऑस्कर, फ्लॉरॉन, टायगर, पिराना, कॅट फिश हे आक्रमक मासे आहेत. त्यांच्यासोबत कधीही शांत प्रवृत्तीचे मासे ठेवू नयेत. कारण आक्रमक मासे शांत, लहान माशांना खाऊन टाकतात.
टँकमधील पाणी बदलतानाही विशेष काळजी घ्यावी. टँकमधील पाणी पाइपने काढावं. पाणी पूर्ण काढू नये. केवळ अर्धा टँक पाणी काढावं. पूर्ण पाणी काढलंत तर मासे तडफडून मरतील. टँकची काच स्वच्छ करावी. उरलेल्या अध्र्या पाण्यात नवीन पाणी टाकावं. त्यात एक मूठ जाडं मीठ टाकावं. नवीन पाण्यामुळे टँकमधल्या वातावरणात बदल होतो. नवीन वातावरणाला जुळवून घेण्यासाठी माशांना चोवीस तास उपाशी ठेवावं. चोवीस तासांनंतर फीडिंग द्यावं.
टँकला फिल्टर लावलं असेल तर आठवडा किंवा पंधरा दिवसांनी पाणी बदललं तरी चालतं. मात्र फिल्टर नसल्यास दोन दिवसांनी पाणी बदलणं आवश्यक आहे.
मरिन टँक : हा नवीन प्रकारही उदयास येतोय. हा प्रकार लहान स्वरूपात किंवा घरगुती टँक करू शकतात. मात्र हा फार खर्चिक प्रकार आहे. मरिन टँकमध्ये खारं पाणी असतं. तसंच तो टँक तयार करण्याची पद्धतही विशिष्ट असते. याची काळजी घेण्यासाठी त्या विषयातील तज्ज्ञ घरी येऊन तपासणी करतात. म्हणून यासाठी महिन्याला साधारण ५ हजार इतका खर्च येतो. यासाठी मासेही वेगळे असतात. लहान-मोठे असे खूप आकर्षक मासे असतात. त्यात जेलफिश, लायनफिश, ब्ल्यू… फेस एंजल इतकंच नव्हे तर ऑक्टोपस आणि तारामासाही ठेवू शकतो.
fshish