पैशांची उधळपट्टी करत असाल तर त्याला आवर घाला. अन्यथा प्राप्तिकर विभागाच्या कचाटयात आयतेच सापडाल!
नवी दिल्ली – पैशांची उधळपट्टी करत असाल तर त्याला आवर घाला. अन्यथा प्राप्तिकर विभागाच्या कचाटयात आयतेच सापडाल! काळयापैशाला आवर आणि महसूल संकलनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी भरमसाट खर्च करणा-यांवर वेगाने विकसित होणा-या शहरांमध्ये खास प्रशिक्षित कर्मचा-यांचे पाळत पथक या विभागाकडून उभारले जात आहे.
वैयक्तिक खर्च, आलिशान वाहनांची खरेदी आणि स्थावर मालमत्ता विक्रीतून होणा-या भांडवली नफ्यावर या कर्मचा-यांकडून नजर ठेवली जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी)ने यासाठी ‘डायरेक्टरेट ऑफ इंटेलिजन्स आणि क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन’ हे खास पथक निर्माण करण्यात आले आहे. आठ महानगरे आणि दुस-या क्रमांकाच्या शहरांमध्ये पथदर्शी स्वरूपामध्ये ही यंत्रणा राबवली जाणार आहे. ज्यामुळे कर महसूल वाढवण्यात मोठा हातभार लागणार आहे. सीबीडीटी आणि प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी ही यंत्रणा राबवण्याचा निर्णय दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या मुख्य आयुक्त आणि महासंचालकांच्या परिषदेत घेण्यात आला. प्रत्यक्ष कर महसुलाचे लक्ष्य कठीण आहे. गुंतवणूकस्नेही करकक्षेबाबत सरकारचा आग्रह लक्षात घेऊन एकही करस्रेत हुकणार नाही यासाठी ही मोहीम राबवली जाणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या माध्यमातून ही पाळत ठेवली जाणार आहे. बँका, वित्तीय संस्था आणि केंद्रीय विभागातील तपास यंत्रणांकडून ही गोपनीय माहिती गोळा केली जाणार आहे. याचा ठेवला जाणार हिशेब!
» शॉपिंग मॉल किंवा इतर बाजारांतील वैयक्तिक किंवा संस्थेचा खर्च » शैक्षणिक संस्था किंवा कोचिंग केंद्रांना दिलेली फी » नागरी सहकारी बँका, कॉर्पोरेट बाँड आणि सहकारी पतसंस्थांमधील गुंतवणुकीतून मिळालेले व्याज » स्थावर मालमत्तेच्या विक्रीतून मिळालेला भांडवली नफा » आलिशान, एसयूव्ही मोटारींची खरेदी
कर परतावा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
वैयक्तिक कराचा मोठा स्रोत असलेल्या प्राप्तिकर परतावा (रिटर्न) भरण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. यामध्ये मिळणा-या वजावटीत झालेल्या बदलांवर बारकाईने नजर ठेवून कर परतावा भरणे आवश्यक आहे. ज्यामुळे रिफंडचा आकडा वाढण्यास मदत होईल.
‘प्राप्तिकर खात्याचा अधिकृत ई-मेल सेव्ह करा’ ऑनलाइन कर परतावा भरण्यासाठी वैयक्तिक ई-मेल आणि मोबाइल फोनची वैधता पडताळणी पूर्ण करण्याबरोबरच प्राप्तिकर विभागाचा अधिकृत ई-मेल अॅड्रेस आपल्या इनबॉक्समधील ‘सुरक्षित यादी’त समाविष्ट करण्याच्या सूचना करदात्यांना दिल्या आहेत. ज्यामुळे हे ई-मेल स्पॅम किंवा जंक फोल्डरमध्ये जाऊन करदात्यांची गैरसोय होणार नाही.
या शहरांवर असेल पाळत
बंगलोर, चेन्नई, कोलकाता, पुणे, कोची, लखनौ, भोपाळ आणि गुवाहाटी या वेगाने विकसित होणा-या आठ शहरांबरोबरच त्यांच्या निमशहरी भागावर प्राप्तिकर खात्याकडून पाळत ठेवली जाणार आहे.
प्रहार खरच प्रहार आहे. इतर वर्तमान्पात्रापेक्षा सुबक मांडणी व बातम्या वाचनीय असतात. खूप शान! कोकणी असल्याचा अभिमान आहे.