माथेरान प्रतिष्ठानच्या वतीने मागील काही वर्षापासून माथेरान महोत्सव आयोजित करण्यात येतो.
माथेरान- माथेरान प्रतिष्ठानच्या वतीने मागील काही वर्षापासून माथेरान महोत्सव आयोजित करण्यात येतो. अन्य शहरांतील पर्यटकांना माथेरानकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळया ठिकाणी महोत्सवाचे उद्घाटन आणि माथेरानमध्ये आठवडाभर विविध कार्यक्रम अशी रेलचेल माथेरान महोत्सवात असणार आहे. दरम्यान, यंदाच्या माथेरान महोत्सवाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महानगरात २४ एप्रिल रोजी होत आहे.
माथेरान महोत्सवाच्या आयोजनाविषयी माहिती देण्यासाठी नुकत्याच एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माथेरानचे नगराध्यक्ष अजय सावंत, तसेच विवेक चौधरी, संतोष पवार यांच्यासह पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील उपस्थित होते. २४ एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात माथेरान महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्याच दिवशी सकाळी माथेरानमधील चिक्की, चप्पल, माथेरानचे घोडे, माथेरानची निसर्गचित्रे, पर्यावरणविषयक महितीचे स्टॉल्स यांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. प्रेक्षागृहाच्या तळमजल्यावर लावलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील जय गोविंदा ग्रूप आणि भिकू वाघेरे-पाटील प्रतिष्ठान माथेरान महोत्सवाचे प्रमुख संयोजक आहेत.
सायंकाळी चार वाजता मुख्य उद्घाटन सोहळा होणार असून, या सोहळयाचे उद्घाटन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते होईल. उद्घाटन सोहळयाच्या अध्यक्षा महापौर मोहिनी लांडे, तर स्वागताध्यक्ष कर्जतचे आमदार सुरेश लाड आहेत. या सोहळयात माथेरान भूषण म्हणून नरिमन चिक्कीचे प्रमुख दिलीप गुप्ता यांना, तर माथेरान मित्र म्हणून माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील, उद्योजक विजू काटे, नितीन नावेकर आदींनी सन्मानित करण्यात येणार आहे.
उद्घाटन सोहळयाला खासदार गजानन बाबर, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे तसेच आझम पानसरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी माथेरान महोत्सवाचे आयोजन पुणे आणि ठाणे येथे करण्यात आले होते.
२० ते २८ मे दरम्यानही कार्यक्रम
२० ते २८ मे २०१३ या कालावधीत माथेरानमध्ये विविध ठिकाणी इको-मॅरॅथॉन, सर्प छायाचित्र प्रदर्शन, कपल ऑफ दी सिझन स्पर्धा, अश्व शर्यती, जंगल ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, आदिवासींचे पारंपरिक कार्यक्रम, माथेरानचा वाढदिवस आणि स्वागतयात्रा असे कार्यक्रम होतील.
matheran is best for couples