बँकिंग व्यवसायात प्रवेश करण्यास उत्सुक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय स्टेट बँकेबरोबर हातमिळवणी केली असून पेमेंट बँकेच्या परवान्यासाठी आरबीआयकडे अर्ज केला आहे.
नवी दिल्ली- बँकिंग व्यवसायात प्रवेश करण्यास उत्सुक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय स्टेट बँकेबरोबर हातमिळवणी केली असून पेमेंट बँकेच्या परवान्यासाठी आरबीआयकडे अर्ज केला आहे. या दोघांच्या एकत्र येण्यामुळे देशव्यापी बँकिंग आणि दूरसंपर्क नेटवर्क आणि किरकोळ व्यवसायाचा फायदा होणार आहे.
व्यावसायिक बँक असलेली एसबीआय पेमेंट बँकेसाठी अर्ज करू शकत नाही. यासाठी बँकेने रिलायन्सबरोबर एकत्र येत ३० टक्क्यांची हिस्सेदारी उचलली आहे. तर उर्वरित ७० टक्के हिस्सेदारीही रिलायन्स आपल्याकडे राखणार आहे. पेमेंट बँकेसाठीच्या नियमावलीनुसार ही भागीदारी झाली असून यामुळे भारताच्या फॉच्र्युन ५००मधील दोन संस्था भारतातील आर्थिक समावेशीकरणाच्या प्रक्रियेत वाटा उचलणार असल्याचे दोहोंनी म्हटले आहे. मात्र गुंतवणुकीबाबत अधिक स्पष्टीकरण देण्यात आलेले नसून संचालक मंडळाबाबतही काहीच सूतोवाच केलेले नाहीत.
रिलायन्स इंडस्ट्रीजकडे देशभरातील फोरजी दूरसंपर्क परवाना असून सर्वच राज्यांमध्ये दूरसंपर्क आणि ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी बँकेने तयारी सुरू केली आहे. ९० टक्के शहरी लोकसंख्या असलेली ५,००० निमशहरे आणि शहरे तसेच २,१५,००० गावांचा समावेश आहे. याबरोबरच कंपनीचे १६६ शहरांमध्ये २,३०० रिटेल स्टोअर असून प्रति दिन १० लाख ग्राहक त्यांना भेट देतात. देशभरात १५,८६९ शाखा आणि ४३,५१५ एटीएम नेटवर्क असलेल्या एसबीआयने ४५,४८७ व्यावसायिक प्रतिनिधींबरोबर करार केला आहे. याआधी भारती एअरटेल आणि कोटक महिंद्रा बँकेने एकत्र येत पेमेंट बँकेच्या स्थापनेसाठी पाऊल टाकले आहे.
आदित्य बिर्ला नुवोचाही अर्ज
बहुआयामी उद्योग असलेल्या आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड (एबीएनएल)ने सोमवारी पेमेंट बँकेच्या परवान्यासाठी रिझव्र्ह बँकेकडे अर्ज दाखल केला आहे. २ फेब्रुवारीला रिझव्र्ह बँकेकडे पेमेंट बँक स्थापन करण्यासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती मुंबई शेअर बाजाराला कंपनीने दिली आहे. प्रस्तावित बँकेमध्ये आदित्य बिर्ला नुवोची ५१ टक्के भागभांडवल असणार आहे. तर आदित्य बिर्ला समूहातील दूरसंपर्क कंपनी आयडिया सेल्युलरकडे ४९ टक्के हिस्सेदारी असणार आहे. याबरोबरच एबीएनएलच्या संचालक मंडळाने आयडियाला आपली हिस्सेदारी ६० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचीही परवानगी दिली आहे. अर्थातच यासाठी वेळोवेळी नियामकाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. फ्युचर समूहानेही या परवान्यासाठी अर्ज केला आहे.
असा असेल पेमेंट बँकेचा कारभार
प्रति व्यक्ती १ लाखापर्यंत ठेवी स्वीकारता येणार
एटीएम/डेबिट कार्डची सुविधा देणार
म्युच्युअल फंड आणि विमा उत्पादनांच्या विक्रीस परवानगी
विविध पेमेंट आणि पैसे हस्तांतराची सुविधाही देणार
क्रेडिट कार्ड, कर्ज सुविधा मात्र देता येणार नाही
हेसुद्धा आहेत शर्यतीत
एसकेएस मायक्रोफायनान्स
यूएई एक्स्चेंज इंडिया
दिवाण हाऊसिंग फायनान्स
एसई इन्व्हेस्टमेंट
adhik सुविधाजनक सरस निर्णय