महिला मोफत प्रसाधनगृहांचे फलक लावल्याची बतावणी करणा-या चेंबूर वॉर्डात फलकाची अंमलबजावणी झाली खरी; परंतु सर्वच ठिकाणी प्रसाधनगृहे मोफत नाहीत.
मुंबई– महिला मोफत प्रसाधनगृहांचे फलक लावल्याची बतावणी करणा-या चेंबूर वॉर्डात फलकाची अंमलबजावणी झाली खरी; परंतु सर्वच ठिकाणी प्रसाधनगृहे मोफत नाहीत. कित्येकांना महापालिकेकडून परिपत्रक मिळालेले नाही. पूर्व भागापेक्षा पश्चिमेकडील भाग महिलांसाठी जास्त असुरक्षित आहे. महिलांकडून सरसकट पैसे आकारूनही सुरक्षित आणि स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध करून देण्यास चेंबूर वॉर्डातील प्रसाधनगृहे अद्याप कमी पडत आहेत. झोननिहाय बैठकीत चेंबूर वॉर्डात फलक लागल्याचे पालिका अधिका-यांनी सांगितले खरे; परंतु काही ठिकाणी हे फलक कंत्राटदारांच्या टेबलावरच असल्याने महिलांना होणारा मन:स्ताप कायम आहे.
चेंबूर (पश्चिम)
चेंबूर पश्चिमेकडे अंमलबजावणी बऱ्यापैकी झालेली असली तरीही झोपडपट्टीनजीक असलेल्या प्रसाधनगृहांचा विचार करता येथे महिलांसाठी पूर्णत: असुरक्षित वातावरण आहे. प्रसाधनगृहाच्या वाटेवर गर्दुल्ले, फेरीवाले, मवाली असतात. येथील एकाही प्रसाधनगृहात महिलांसाठी सुरक्षित वातावरण नाही. प्रसाधनगृहापर्यंत कसेबसे पोहोचले तरीही पाण्याची सोय नाही. त्यामुळे महिलांना निराश व्हावे लागते. स्थानकाबाहेच्या पी. एल. लोखंडे मार्गावरील शौचालय संकुलात प्रथमदर्शनी महिला प्रसाधनगृहांचे फलक आढळतात. महिलांकडून पैसे आकारले जातात, परंतु या कंत्राटदारालाच समोरच्या झोपडपट्टीतील मुलांकडून त्रास सहन करावा लागतो. मुद्दामहून महिला प्रसाधनगृहांबाहेर उभे राहणे, त्याच ठिकाणी धूम्रपान करणे, दिवसाढवळ्या मद्यपान करणे इत्यादी प्रकार सुरू असतात. रात्री चरस, गांजात मग्न असलेले टपोरी असतात. झोपडपट्टीत म्हाडाकडून मोफत शौचालय उपलब्ध असले तरीही अस्वच्छतेमुळे झोपडपट्टीतील सर्व महिलांना शौचालय संकुलाचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही, असे येथील महिलावर्गाने सांगितले. येथील मवाली मुले कंत्राटदाराला जुमानत नाहीत. सम्यक क्रांती फोर्स या झोपडपट्टी वसाहतीतील महिला शौचालयातही पुरेसे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे शौचालयाबाहेरच दरुगधी असते. या दोन्ही प्रसाधनगृहांत बरेच अंतर आहे.
देवनार भागातील महिला प्रसाधनगृहांची स्थिती पाहता येथे महिलांनी जाणे टाळणेच योग्य ठरेल. महिला प्रसाधनगृहाबाहेर गर्दुल्ले, फेरीवाले, धूम्रपान करणारे, प्रसाधनगृहात उंदीर-घुशींचा वावर आहे. प्रत्येक प्रसाधनगृहात महिलांना सुरक्षितता नाहीच. येथील खासगी कंत्राटदार पैसे आकारल्याशिवाय महिलांना प्रसाधनगृहात जाण्याची परवानगी देत नाही. केना मार्केट येथील एका खासगी प्रसाधनगृहात तर कंत्राटदाराची मनमानीच असते. टेबलावर फलक लावून महिलांकडून पैसे आकारत असताना तो दिसतो. टाटानगरसमोरील वस्तीसमोर असलेल्या महापालिकेच्या प्रसाधनगृहातही प्रथमदर्शनी फलक असूनही वस्तीतील महिलांकडून जबरदस्तीने पैसे आकारले जातात. महिलांसाठी प्रसाधनगृहे मोफत आहेत, याची कल्पना असूनही कित्येकदा तो अर्वाच्य भाषेत महिलांकडून पैसे उकाळतो.
देवनार पोलिस स्थानक आणि देवनार कत्तलखाना तसेच चेंबूर-गोवंडी मार्गावरील प्रसाधनगृहांतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. देवनार पोलिस स्थानकाकडे जाणा-या प्रसाधनगृहांबाहेर रिक्षांचा घोळका, फेरीवाले असतात. एका प्रसाधनगृहाबाहेर फेरीवाल्यांनी कच-यातच खाद्यपदार्थाचा व्यवसाय सुरू केला आहे. या प्रसाधनगृहाला नाव नाही. प्रसाधनगृह पालिकेचे आहे का, असे विचारल्यास कंत्राटदार उर्मट उत्तरे देतो. शिवाय प्रसाधनगृहात शिरल्याने पैसे आकारणी बंधनकारक असल्याचा नियमही लावतो. जय महाराष्ट्र सोशल फाउंडेशन येथे महिला प्रसाधनगृहात दरुगधी असते. प्रसाधनगृहाबाहेरच पाणी वाहत असते. येथे महिलांना मोफत प्रसाधनगृहे उपलब्ध असल्याचे फलक असल्याचे कंत्राटदार प्रत्येक महिलांना लक्षात आणून देतो. परंतु स्वच्छतेबाबत उत्तर देण्यास टाळतो. पालिकेकडून चेकलिस्ट उपलब्ध झाल्यास स्वच्छतेचे काम पार पाडले जाईल, असे त्याच्याकडून सांगितले जाते. देवनार पोलिस स्थानकाच्या बाजूच्या प्रसाधनगृहाबाहेरच तरुणांची टोळी असते. महिला मोफत प्रसाधनगृहांचे फलक असले तरीही स्वच्छतेत हे प्रसाधनगृह कमी पडते.
चेंबूर (पूर्व)
चेंबूर पूर्व भागात बहुतांश प्रसाधनगृहांत प्रथमदर्शनी महिलांसाठी मोफत प्रसाधनगृहे असे फलक दिसतात. परंतु या प्रसाधनगृहांत शिरल्यानंतर महिलांना मन:स्ताप होतो. एम वॉर्डनजीकच्या आणि चेंबूर स्थानकापासून जवळच्या अंतरावर सेवा प्रसाधनगृह आहे, परंतु या प्रसाधनगृहाजवळ सतत माणसांचा घोळका असतो. शिवाय कंत्राटदार स्वत: धूम्रपानात व्यस्त असतो. आत शिरल्यास महिला प्रसाधनगृहात गुटख्याची पाकिटे तसेच सायकल उभी केलेली दिसते. काहीशा अंतरावर असलेल्या हरिजन वेल्फेअर सोसायटीतील सुगम शौचालयात प्रथमदर्शनी मोफत प्रसाधनगृहांचा फलक दिसतो. आतमध्ये पुरुषांची अंतर्वस्त्रे टांगलेली असतात. बाजार परिसरात हे प्रसाधनगृह असल्याने या प्रसाधनगृहाशिवाय महिलांना पर्याय नसतो. पर्याय म्हणून थेट एम वॉर्डनजीकच्या सेवा प्रसाधनगृहात जावे लागते. परंतु वेळ वाचवण्यासाठी भाजी विकणा-या तसेच फेरीवाल्या महिला हरिजन वेल्फेअर सोसायटीच्या प्रसाधनगृहात नाइलाजाने जातात. त्यापुढे पोस्टर कॉलनीतील जनता सेवा संघातही महिलांचा प्रश्न उभा राहतो. येथे महिलांसाठी एकच मोफत प्रसाधनगृह उपलब्ध आहे. परंतु या प्रसाधनगृहातून दरुगधी असते. प्रसाधनगृहाची खिडकी पूर्ण बंद नाही. पुढे महापालिकेचे सुलभ शौचालय संकुलात मोफत प्रसाधनगृहाचे फलक प्रथमदर्शनी दिसत नाहीत. स्वच्छेने पैसे द्या, असे कंत्राटदारासोबत असलेली महिला प्रत्येक महिलांना सांगते. पाण्यासाठी येथे एक टाकी ठेवलेली आहे, परंतु पाणी अस्वच्छ दिसते. नळातून सतत पाणी वाहत असते. बाहेरच कच-याच्या डब्यातील कचरा परिसरातच अस्ताव्यस्त पडलेला दिसतो.
>चेंबूर पूर्वेत ६ लाख, ७४ हजार ८५० माणसांसाठी ५० प्रसाधनगृहे उपलब्ध आहेत. तर चेंबूर पश्चिमेला ४ लाख १३ हजार ७२७ माणसांसाठी ५० प्रसाधनगृहे आहेत.
>चेंबूर वॉर्डात ठिकठिकाणी मोफत महिला प्रसाधनगृहांचे फलक लागल्याचे वॉर्ड अधिका-यांनी झोननिहाय बैठकीत सांगितले. परंतु पश्चिमेकडील काही प्रसाधनगृहांत फलकांचा पत्ता नाही. घनकचरा व्यवस्थापनाचे सहआयुक्त प्रकाश पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना दरडावूनही खासगी कंत्राटदारांची मुजोरी कायम आहे.
>फलकांचे काम घाईघाईने उरकल्याचे दिसते, परंतु महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह आहे.
चेंबरच्या लोकसंख्येचा विचार करता, येथे प्रसाधनगृहांची संख्या वाढवण्याची गरज आहे. फलक लावून काम होत नाही. परिपत्रकाची अंमलबजावणी झाली पाहिजे. – मुमताज शेख, कार्याध्यक्ष, महिला मंडळ फेडरेशन
[EPSB]
महिलांची मात्र अवहेलनाच!
नोकरी करणा-या, प्रवास करणा-या महिलांसाठी मुंबईत साधे प्रसाधनगृहदेखील नाही. रुपये मोजूनही सार्वजनिक स्वच्छतागृहांत स्वच्छता नसते. सुरक्षितता तर लांबच!
[/EPSB]
या विषयावर काय लिहायचे तेच समजत नाही ,सगळा अंधा धुंध कारोबार ,!!