अशक्य, कठीण, खडतर, आव्हानात्मक या शब्दांवर मात करत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहिम यशस्वी करुन दाखवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
बंगळूरु – कठीण, खडतर, आव्हानात्मक या शब्दांवर मात करत इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहिम यशस्वी करुन दाखवत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
अमेरिकेची नासा, रशिया आणि युरोपियन अवकाश संशोधन संस्थांना जे अनेक प्रयत्नांनंतर शक्य झाले ते भारतीय शास्त्रज्ञांनी पहिल्या प्रयत्नात करुन दाखवले. मंगळ मोहिम पहिल्या प्रयत्नात यशस्वी करणारा भारत जगातला पहिला देश ठरला आहे. सकाळी ७.४७ मिनिटांनी मंगळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. मंगळाकडून पृथ्वीवर संदेश यायला बारा मिनिटे लागत असल्याने ७.५९ मिनिटांनी मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोहोचल्याचा पहिला संदेश आला आणि इस्त्रोच्या नियंत्रण कक्षात एकच जल्लोष सुरु झाला.
»मंगळयान ट्विटरवर दाखल
»‘इस्त्रो’ मंगळावर तुमचे स्वागत- नासा
» ‘इस्त्रो’ तुम्ही करुन दाखवले
»भारताची मंगळाकडे यशस्वी झेप (व्हिडीओ)
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बंगळूरुतील इस्त्रोच्या नियंत्रण कक्षात उपस्थित होते. मोहिम यशस्वी झाल्याचा पहिला संदेश येताच त्यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. मंगळाच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी यानाचा वेग प्रति सेकंद २२.१ किलोमीटरवरून ४.४ कि.मी.पर्यंत कमी केला. त्यासाठी यानातील लिक्विड इंजिन २४ मिनिटे प्रज्वलित करुन हा वेग नियंत्रित करण्यात आला. तीनशे दिवसाहून अधिक काळ सुरु असलेल्या मंगळमोहिमेतील हा अंत्यत महत्वाचा आणि खडतर टप्पा होता.
कारण मंगळावरुन पृथ्वीवर संदेश पोहोचायला बारा मिनिटांचा अवधी लागत होता. तरीही, भारतीय शास्त्रज्ञांनी यानाचे अचूक नियंत्रण करत ही मोहिम यशस्वी करुन दाखवली. या मोहिमेच्या यशाने भारत रेडक्लबमध्ये दाखल होणारा चौथा देश ठरला आहे. अमेरिका, रशिया आणि युरोपियन अवकाश संशोधन संस्थांचा रेड क्लबमध्ये समावेश होतो. कारण आतापर्यंत याच देशांना मंगळ मोहिम यशस्वी करता आली आहे.
मंगळयान मंगळावर जीवसृष्टीसाठी आवश्यक असणा-या मिथेन वायूचा शोध घेणार आहे. यासाठी यानावर खास तयार केलेले मिथेन सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. मिथेन वायू असला तरी, तो जीवसृष्टीसाठी अनुकूल आहे का ? याचा शोध घेणे हे मंगळमोहिमेचे उद्दिष्टय आहे. मंगळयानाने मंगळ प्रदक्षिणा सुरु केली असून, आज दुपारपर्यंत मंगळाचे पहिले छायाचित्र मिळू शकते.
मंगळयानाने मंगळाभोवती परिक्रमा सुरु केली असून, पुढचे सहा महिने मंगळयान कार्यरत रहाणार आहे. सध्या मंगळाच्या कक्षेत सात याने फिरत असून, यात नासाची तीन याने आहेत. नुकताच मावेन या नासाच्या यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. युरोपीयन अवकाश संशोधन संस्थेचे ऑरबीट पाणी, हवामान आणि भूपृष्ठीय रचनेची माहिती गोळा करत आहे.
मागच्यावर्षी पाच नोव्हेंबरला मंगळयानाने मंगळाच्या दिशेने झेप घेतली होती. पाचवेळा पृथ्वी परिक्रमा पूर्ण केल्यानंतर एक डिसेंबरला मंगळयानाने मंगळाच्या दिशेने प्रवास सुरु केला. या मोहिमेत इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी एकूण चारवेळा मार्गक्रमण दुरुस्ती केली. त्यातील चौथी शेवटची मार्गक्रमण दुरुस्ती सोमवारी पार पडली. ही अत्यंत महत्वाची मार्गक्रमण दुरुस्ती होती.
कारण मंगळयानाचे तब्बल ३०० दिवस बंद असलेले लिक्विड इंजिन शास्त्रज्ञांनी चार सेकंदांसाठी सुरु केले त्यामुळे मंगळमोहिम यशस्वीरित्या पार पडणार याची हमी मिळाली होती. अन्य देशांच्या तुलनेत भारतीय शास्त्रज्ञांनी या मोहिमेसाठी अत्यंत कठिण मार्ग निवडला होता. कमी खर्च, तंत्रज्ञान आदि घटकांचा विचार करता जागतिक अवकाश संशोधनातील हा मैलाचा दगड आहे.
इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी फक्त ४५० कोटी रुपयात इस्त्रोची मोहिम यशस्वी करुन दाखवली. दोनवर्षांपूर्वी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंगळ मोहिमेची घोषणा केली होती. शास्त्रज्ञांनी अत्यंत कमी वेळेत या मोहिमेसाठी आवश्यक उपकरणे तयार करुन, नवा इतिहास रचला.
मंगळ मोहिमेची उद्दीष्टे
– मंगळावरील जीवन, वातावरण, भूगर्भ, त्याचे मूळ उत्कांती आणि त्याचे चिरंतनत्व याचा अभ्यास करणे
– मंगळावरील हवामान, वातावरण, जमीन याचा अभ्यास
– मंगळावरील विरळ वातावरण, चुंबकीय क्षेत्र, पाण्याचे वितरण, भूपृष्ठाचे छायाचित्रण आणि सर्त महत्वाचे मिथेनचे प्रमाण याचा शोध घेणे
[EPSB]
मंगळयान ट्विटरवर दाखल »
बुधवारी सकाळी भारताचे ‘मंगळयान’ मंगळावर पोहचले आणि इकडे पृथ्वीवर त्याचे ट्विटर आगमन झाले.…
‘इस्त्रो’ तुम्ही करुन दाखवले »
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्त्रो’ने मंगळ मोहीम यशस्वी करुन संपूर्ण जगात भारताची शान वाढवली आहे.…
[/EPSB]
पुन्हा एकदा ” ब्रावो इस्रो ” ! अभिनंदन !!!!!!