हर्षोल्हास, उत्सुकता आणि शुभेच्छांच्या वर्षावात ‘प्रहार’च्या चौथ्या वर्धापनदिनाचा आनंदोत्सव रंगतदार झाला.
मुंबई – हर्षोल्हास, उत्सुकता आणि शुभेच्छांच्या वर्षावात ‘प्रहार’च्या चौथ्या वर्धापनदिनाचा आनंदोत्सव रंगतदार झाला. ‘शब्दांना सत्याची धार’ असलेल्या, सर्वाभिमुख लोकप्रियतेचे शिखर गाठणा-या ‘प्रहार’चा वर्धापनदिन या दैनिकाला साजेसाच होता. मान्यवरांची मांदियाळी, गीत-संगीताची जोड या पार्श्वभूमीवर षण्मुखानंद सभागृहाचे दालन रसिक वाचक व शुभेच्छुकांनी खचाखच भरले होते. राज्याचे उद्योगमंत्री व प्रहारचे संपादकीय सल्लागार नारायण राणे यांची सहकुटुंब उपस्थिती हा उपस्थितांसाठी आकर्षणाचा भाग होताच, पण विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून लावलेल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
या चिरस्मरणीय कार्यक्रमाची सुरुवातच सांगीतिक मैफिलीने झाली. नव्या दमाच्या गायकांनी गायलेली गाणी आणि त्याला रसिकांनी दिलेली उत्स्फूर्त दाद यामुळे उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला. षण्मुखानंद सभागृहाच्या प्रवेशद्वारावर नानाविध रंग-गंधाच्या फुलांच्या झालरींची तोरणे दिमाखाने लटकली होती. प्रवेशद्वारासमोरच चित्ताकर्षक सुंदर रांगोळी आणि त्यावर ‘प्रहारला चौथ्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छां’ची कलाबूत मन मोहून टाकत होती.
या रांगोळीशेजारीच कडधान्यांची रांगोळीही अफलातून रंगली होती. राजमा, नाचणी, साबुदाणा, मूगडाळ आणि तूरडाळ यांचा वापर करून कमळाच्या चार पाकळ्यांची महिराप अत्यंत सुंदररीत्या रेखाटण्यात आली होती. त्यात मधोमध ‘राणे प्रकाशना’चा ‘लोगो’ही दिमाखात झळकत होता. कार्यक्रमासाठी आलेल्या सगळ्यांचेच पाय या रांगोळीशी थबकत होते. दाद मिळवत होते. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला ‘प्रहार’चे वाचक, जाहिरातदार, प्रतिनिधी, वार्ताहर, छायाचित्रकार, लेखक, चाहते, हितचिंतक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
khup chan …. PRAHAR …race complete 4 years…proud to our KOKAN leading news paper….keep it up