ढोल ताशांचा गजर, डिजे आणि बेन्जोच्या तालावर थिरकत,गुलाल उधळत मुंबईकरांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
मुंबई- मागील अकरा दिवसांपासून घरांघरांमध्ये आणि सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये विराजमान झालेल्या श्री गणरायांनी मोदक, लाडू आणि पंचपंक्वांनाचा आस्वाद घेत अखेर सोमवारी भावपूर्ण निरोप घेतला. बाप्पांना निरोप देण्यासाठी दुपारपासूनच मिरवणूका निघाल्या होत्या. या मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा तसेच समुद्र किना-यांवर भक्तांची अलोट गर्दी लोटली होती. ढोल ताशांचा गजर करत, डिजे आणि बेन्जोच्या तालावर थिरकत,गुलाल उधळत भक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषाने अवघी मुंबापुरी दुमदुमून गेली होती. अगदी गल्लींपासून ते प्रमुख रस्ते आणि चौकांमध्ये बाप्पांना निरोप देण्यासाठी जमलेल्या लाखो भक्तांमुळे एकच भक्तीचा मळा फुललेला होता.
श्री गणेशांचे आगमन झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पांचे विसर्जन करून त्यांना निरोप देण्यात येतो. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी निर्विघ्नपणे विसर्जन सोहळा पार पडावा म्हणून पोलिस यंत्रणा, महापालिकेसह विविध स्वयंसेवी संस्थांनी कंबर कसली होती. त्यामुळे प्रत्येक रस्त्यारस्त्यांवर कडक पोलिस सुरक्षा तैनात करण्यात आली होती. मुंबईचा राजा म्हणून ओळखल्या जाणा-या गणेशगल्ली सार्वजनिक उत्सव मंडळाचा गणपती सकाळी विसर्जनासाठी बाहेर पडला. त्या नंतर काही वेळाने लालबागचा राजाची मिरवणूक निघाली. या दोन्ही गणेशमूर्तीवर पुष्पवृष्ठी करण्यात आली. त्यामुळे लालबागमध्ये या दोन्ही गणरायांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. लालबागमधील उड्डाणपूल, प्रत्येक इमारतींमधून लोकांनी बाप्पाला डोळयात साठवून ठेवण्यासाठी दाटीवटीने बसून गर्दी केली होती. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दोन्ही बाजुला मोठी गर्दी उसळली होती. प्रत्येक इमारतींमधील गॅलरी, घरांमधील खिडक्या, दुकानांवरील शेड, गच्ची अशा जिथून दर्शन होईल अशी ठिकाणे शोधून बाप्पांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
शहरातील मोठमोठ्या गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन केल्या जाणा-या गिरगाव चौपाटीवर दुपारी दोन वाजल्यापासूनच अबालवृद्धांनी गर्दी करण्यास सुरूवात केली. दुपारी बारा वाजता साडेचार मीटरची मोठी उंची असल्यामुळे गिरगाव चौपाटीवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. मात्र घरगुती गणपती आगमन दुपारपासूनच होऊ लागल्यामुळे महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या स्वयंसेवकांमार्फत मूर्तीचे विसर्जन केले जात होते. संध्याकाळी चार वाजता सीएसटी रेल्वे स्थानकावरील हमालांचा गणपतीचे पहिले आगमन झाले. त्यापाठोपाठ व्ही. पी. रोडवरील अमर शिवशक्ती सार्वजनिक मंडळाच्या गणपतीचे आगमन झाले. त्यापाठोपाठ दहा मिनिटांनी डिलाईट रोडचा महाराजानेही हजेरी लावली. यानंतर खेतवाडीतील १२ वी गल्लींमधील गणपती, अंजिरवाडी यासह १८ फुटी उंचीच्या मोठ्या गणेशमूर्तीचे एकामोगामाग एक असे आगमन होत गेले. यासाठी महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या तराफांचा वापर केला जात होता.
नौंदलाची हेलिकॉप्टरमधून गस्त
गिरगाव चौपाटीसह जुहू, शिवाजी पार्क या प्रमुख चौपाट्यांवर नौदलाची हेलिकॉप्टर गस्त सुरू होती. सुरूवातीला संध्याकाळी दोन हेलिकॉप्टरमधून चौपाट्यांवर होत असलेल्या विसर्जनावर विशेष लक्ष ठेवण्यात येत होते.
गिरगाव चौपाटीवर स्टींग रे, इल आणि जेल फिशचा धोका
गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे (पाकड), इल(वाम) आणि जेली फिशचा धोका असल्यामुळे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते. विसर्जनासाठी येणा-या प्रत्येक भक्तांना या माशांपासून सावधानतेचा इशारा देण्यात येत होता. मात्र संध्याकाळपर्यंत कोणताही अनुचित प्रकार गिरगाव चौपाटी किंवा अन्य चौपाटीवर घडला नव्हता.
बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लौकर या !!!