आशिया खंडातील सर्वात मोठे रुग्णालय अशी ख्याती असलेल्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी अधिष्ठातापदाचा पदभार स्वीकारला.
मुंबई – आशिया खंडातील सर्वात मोठे रुग्णालय अशी ख्याती असलेल्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी अधिष्ठातापदाचा पदभार स्वीकारला. मात्र जे. जे. रुग्णालयात त्यांनी शिस्त लावणे, नियमांनुसार काम करणे यासारख्या त्यांच्या काम करण्याच्या पद्धतींमुळे डॉ. लहाने यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याचे बोलले जात आहे.
ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात
डॉ. लहाने यांनी अधिष्ठातापदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेक चांगले बदल केले. रुग्णालयातील रामभरोसे असलेली सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले तसेच काही ठिकाणी सुरक्षारक्षकही
तैनात केले. विशेष म्हणजे रुग्णालयात असलेल्या स्वयंपाकघरात शिजवल्या जाणा-या अन्नपदार्थाबाबत रुग्णांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारी दूर करून अन्नपदार्थाचा दर्जा वाढवण्यात डॉ. लहाने यांची महत्त्वाची भूमिका निभावली. चपाती तयार करण्यासाठी कर्मचारी नसल्याचे सांगून पूर्वी रुग्णांना जेवणात चपाती दिली जात नव्हती. अखेर डॉ. लहाने यांनी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करून चपाती बनवण्याची मशिनही रुग्णालयात आणली.
डॉ. लहाने यांनी अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रुग्णालयात शस्त्रक्रियांची संख्या दुपटीने वाढली. याआधी रुग्णांना शस्त्रक्रियेकरता १३ दिवस रुग्णालयात थांबावे लागत होते. मात्र आता रुग्णांना पाच दिवस रुग्णालयात थांबावे लागते.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी माझगाव येथे महापालिकेची इमारत कोसळल्याची माहिती मिळताच रुग्णालयातील सर्व डॉक्टर, विभाग प्रमुखांना त्यांनी कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या. एवढेच नाही, त्यांनी तर घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावाही घेतला.
१३/७ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात जखमी रुग्णांना ‘पहिल्या अध्र्या तासात’ उपचार देऊन रुग्णांचे प्राण वाचवण्यात डॉ. लहाने यांच्या टीमची महत्त्वाची भूमिका होती. गेल्या कित्येक वर्षापासून रुग्णालय आवारात असलेल्या अनधिकृत झोपडय़ा हटवण्यात डॉ. लहाने यांनी पुढाकार घेतला.
रुग्णालयातील झोपडपटय़ा हटवणे, कर्मचा-यांना शिस्त लावणे यामुळे कित्येक जणांच्या रोषाला डॉ. लहानेंना जावे लागले. त्या लेटलतीफ कर्मचा-यांना शिस्त लावण्यात डॉ. लहाने यांची महत्त्वाची भूमिका होती. डॉ. लहाने हे स्वत: मागासवर्गीय असून त्यांना फसवण्याकरता षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोपही केला जात आहे.
जे. जे. रुग्णालय समूहात केलेल्या बदलांमुळेच आपल्याला फसवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत.
– डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय
डॉ.लहाने यांचे कामामुळे राजकिय नेते,कामगार नेते,ठेकेदार यांच्या पोटावर कदाचित पाय पडला असेल, त्यामुळे या लोकांचे बळी ठरण्याची शक्यता आहे, वास्तविक पोलीसांनी गुन्हा नोंद करण्याच्या अगोदर तपासनी करणे आवश्यक होते.