श्री गणेशाच्या नावातून गणनायकाचे रूप साकारण्याची कला अक्षर चित्रकार राज कांदळगावकर यांनी अवगत केली आहे. दीड वर्षात त्यांनी ४ हजार २४९ अक्षर चित्रे साकारली आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात अनेक कलाकार आहेत. त्यांना संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे कांदळगावकर म्हणाले.
अक्षरातून गणेश कलाकृती साकारण्यासाठी सराव केला होता का?
मी कधीच या कलेचा सराव केला नाही. वाहनांवर रेडिअमची नावे, अक्षरे लावण्याचा माझा व्यवसाय आहे. हे काम करताना कला कौशल्याचे होते. त्यातून अक्षरांच्या आकारातून कला साकारण्याची आवड निर्माण झाली. ही आवड जोपासली आणि अक्षर गणेश कला साकार झाली.
तुमचे पहिले अक्षर चित्र कोणते?
माझ्या भावाच्या व मित्राच्या नावाने काढलेले विशाल व महेश हे माझे पहिले अक्षर शिल्प आहे. सुरुवातीला मी एक गंमत म्हणून ही अक्षर कला रेखाटली. त्याचे कौतुक झाले, त्यामुळे हुरूप वाढला, आवड वाढत गेली. त्यानंतर मात्र लोकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे मी अनेक अक्षर शिल्पे काढली आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना माझी २ हजार ५०० अक्षर शिल्पे भेट दिल्यानंतर त्यांनी माझे कौतुक केले. माझी ५०१ वी कलाकृती अभिनेता अमिताभ यांना दिली. या दोन कलाकृती माझ्या आवडीच्या आहेत.
तुम्ही अक्षर कलेचे प्रदर्शन भरवले आहेत का ?
मी अजून तरी असे प्रदर्शन भरवलेले नाही. कला आणि त्याचे अर्थकारण या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत. कलेच्या माध्यमातून गिनिज किंवा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचे माझे प्रयत्न आहेत. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस व जवानांच्या नावांची गणेश कलाकृती तयार करायची आहे. तसेच माझी ४ हजार २५० वी कलाकृती राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या नावातून साकारून त्यांना भेट देण्याचीही माझी इच्छा आहे.
मराठी अक्षरातून गणेशकृती साकारण्याबाबत तुमचा अनुभव काय आहे?
मराठी भाषेचा खूप आदर आहे. त्यामुळे भारतासह मराठी भाषेचा प्रसार जगभर व्हावा असेच मलाही वाटते. आतापर्यंत माझी ६० हून अधिक अक्षर कलाकृती देशाबाहेर गेल्या आहेत. परदेशातूनही चांगला प्रतिसाद आहे.
नव्या कलाकारांना तुम्ही काय सल्ला द्याल?
मी अनेक शाळांना भेटी दिल्या, त्या वेळी प्रत्येक मुलामध्ये एक कलाकार दडलेला असतो हे समजले. आपल्या देशात असे कलाकार अनेक आहेत; परंतु त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळेल व आपली कला समोर आणता येईल.
शब्दांकन- सीमा दाते
nice