रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात विवाहासंदर्भात तसेच शिक्षणाबाबत खोटी माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली.
मुंबई – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात विवाहासंदर्भात तसेच शिक्षणाबाबत खोटी माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली. राऊत यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत म्हणून अॅड. राजेश परुळेकर यांनी राऊत यांच्या विरोधात रिट अर्ज दाखल केला आहे.
निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्याची तातडीने दखल घेतली जात नसल्याने विनायक राऊत यांच्यासह चार जणांविरूद्ध मंगळवारी अॅड. राजेश परुळेकर यांनी उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल केला. निवडणूक अर्ज दाखल करताना शपथपत्राद्वारे आपली सत्य माहिती देणे बंधनकारक आहे. मात्र, राऊत यांनी आपली शैक्षणिक पात्रता आणि विवाह संदर्भात खोटी माहिती सादर केली. म्हणून त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी अॅड. परुळेकर यांनी केली.
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात विवाहाची माहिती लपवली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शामल असे असून तिच्यापासून त्यांना गीतेश नावाचा मुलगा आहे. त्यांच्या दुस-या पत्नीचे नाव मेघा असे असून तिच्यापासून त्यांना रुची ही मुलगी आहे. २००४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवताना राऊत यांनी प्रतिज्ञापत्रात पहिली पत्नी शामल आणि मुलगा गीतेशचा उल्लेख केला होता. त्यावेळी त्यांच्या मिळकतीची माहिती त्यांनी दिली होती.
२००९ मध्ये पुन्हा विधानसभेसाठी अर्ज देताना आपली पत्नी म्हणून शामलचा उल्लेख करताना मुलगी रुची हिच्या नावाचा उल्लेख केला. मात्र, तिचा अन्य तपशील देण्याचे त्यांनी टाळले होते. यंदा लोकसभेसाठी अर्ज सादर करताना त्यांनी पहिली पत्नी शामल आणि मुलगी रुचीचा उल्लेख केला. त्यांच्या उत्पन्नाची माहिती दिली. परंतु, मुलगा गीतेश आणि दुसरी पत्नी मेघा हिची माहिती देण्याचे त्यांनी टाळले.
याबाबतची तक्रार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिका-यांकडे केली होती. परंतु, त्याबाबत तपास न करता अद्याप कारवाई न केल्यामुळे अॅड. परुळेकर यांनी न्यायालयात धाव घेतली.
राऊत यांनी तीन-तीनवेळा निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करताना खोटी माहिती नोंदवली आहे. केवळ ‘एम. ए. भाग- १’ उत्तीर्ण असताना आपण ‘एम. ए.’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्याची खोटी माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली. याबाबतही अॅड. परुळेकर यांनी रिट अर्जात आक्षेप नोंदवला.
निवडणूक आयोगाने खोटे शपथपत्र सादर करणा-या या उमेदवारावर कारवाई करावी, त्यासाठी उच्च न्यायालयाने तसे निर्देश द्यावेत, अशी मागणीही अॅड. परुळेकर यांनी केली. हा अर्ज सादर करतानाची खोटी माहिती कशी दिली आहे, यासंदर्भातील सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत.
Ha tar Congresscha Maidanatun Palayacha Prakar Ahe.