महागणपतीसाठी प्रसिद्ध असलेल्या टिटवाळय़ात फोफावलेल्या लॉज संस्कृतीमुळे येथील रिक्षाचालक प्रवासी वाहतुकीपेक्षा दलालीच जास्त करत असल्याने या देवस्थानाला बट्टा लागला आहे.
टिटवाळा – ‘हॅलो, साहेब लॉज हवाय का?’ असा पुकारा कानावर आला तर दचकण्याची गरज नाही. महागणपतीसाठी प्रसिद्ध असलेल्या टिटवाळय़ात फोफावलेल्या लॉज संस्कृतीमुळे येथील रिक्षाचालक प्रवासी वाहतुकीपेक्षा दलालीच जास्त करत असल्याने या देवस्थानाला बट्टा लागला आहे. येथे येणा-या भाविकांनाही देवस्थानापेक्षा लॉजसाठीच जास्त विचारणा होत असल्याने रिक्षाचालकांच्या या ‘धंद्या’विरोधात संताप व्यक्त होत आहे.
मुंबईहून एखादी लोकल टिटवाळा स्थानकात येत नाही, तोच येथील रिक्षाचालकांकडून थेट रेल्वे फलाटावर उभे राहून शूक, शूक करत प्रवाशांना आकर्षित केले जाते. यात एखादा स्त्री-पुरुष असल्यास रिक्षाचालक त्यांच्या मागे हात धुऊन लागतात. मग यात भाऊ-बहीण असो अथवा मुलगी-वडील त्यांना बोलण्याची संधी न देताच, थेट लॉजसाठी विचारणा केली जाते. रिक्षाचालकांच्या या निर्लज्जपणामुळे प्रवाशांना मात्र मान खाली घालण्याची वेळ येते.
लॉजच्या भाडय़ातील ५० टक्के मिळत असल्याने रिक्षाचालकांचा कल प्रवासी वाहतूक करण्यापेक्षा लॉजमालकांना गि-हाइक पकडून देण्याकडे असल्याची माहिती समोर आली आहे. येथील लॉजचे भाडे किमान ५०० रुपये आहे. त्यामुळे एखादे गि-हाईक मिळवून दिल्यास रिक्षाचालकाला २५० रुपये मिळतात. गिऱ्हाइक पकडण्याच्या रिक्षाचालकांच्या या कसरतीमुळे टिटवाळा रेल्वे स्थानक आणि मंदिर परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. मात्र स्थानिक किंवा जिल्हा पोलिस शाखेच्या एकाही पोलिस अधिका-याचे यावर नियंत्रण नाही. साहजिकच येथे येणा-या भाविकांना व स्थानिकांना रिक्षाचालकांचा हा गैरधंदा नाहक सहन करण्याशिवाय पर्याय उरत नाही.
‘आम्ही गेली कित्येक वर्षे टिटवाळ्यात गणपतीच्या दर्शनासाठी येत आहोत. मात्र येथील रिक्षाचालकांवर कुणाचाच अंकुश नसल्याचे दिसते. त्यांच्या या मनमानीला चाप बसणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.– डॉ. रत्नकांत म्हात्रे, पनवेल
रिक्षाचालक समोरून येणा-या व्यक्तींची चौकशी न करताच, लॉज पाहिजे का, असे निर्लज्जासारखे विचारतात व त्यांच्या मागे-मागे फिरतात. त्यामुळे साहजिकच शरमेने मान खाली घालावी लागते.– संध्या गायकवाड, उल्हासनगर
रिक्षाचालकांच्या या वागण्याचा व मनमानी कारभाराचा अक्षरश: वीट आला आहे. त्यांच्यावर ना स्थानिक पोलिसांचा ना आरटीओचा अंकुश. त्यांच्याविरोधात कारवाई करून आम्हीही थकलो आहोत. मात्र याचा काहीएक परिणाम झालेला नाही. – बाळा भोईर, अध्यक्ष, रिक्षा युनियन मांडा-टिटवाळा
मागील दोन दिवसांपासून आम्ही रिक्षा व दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत चार हजारच्या वर दंडाची वसुली केली आहे. – दिलीप गोडबोले, पोलिस निरीक्षक, टिटवाळा पोलिस ठाणे
Straight stroke- tyanche permit kadhun ghya. & policesuddha kiti divas paisa jama karnar auto driver kadun. Public LA trass dyayche jamte sarvana.