देशातील अतिसंवेदनशील कारागृहांपैकी एक असलेल्या आर्थर रोड कारागृहात कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकारामुळे कारागृहांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई- देशातील अतिसंवेदनशील कारागृहांपैकी एक असलेल्या आर्थर रोड कारागृहात आसिफ अब्दुल रेहमान खान (२०) या कैद्याने नुकताच आत्महत्येचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकारामुळे कारागृहांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे त्याने काचेच्या तुकड्यानेही स्वत:च्या डोक्यावर दुखापत करून घेतल्याचे निष्पन्न झाले असून काचेचा तुकडा कारागृहात उपलब्ध होणे, ही बाब अन्य कैद्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही घातक ठरणारी आहे.
या प्रकरणातील फिर्यादी कारागृह रक्षक परशुराम सावंत (४२) हे २४ जुलै रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास कारागृहातील कैद्यांना चहाचे वाटप करताना दोन कैदी स्वयंपाकगृहात आले. त्यापैकी एकाने खान शौचालयात फाशी घेत असल्याची माहिती त्यांना दिली. त्यानंतर सावंत सहकारी सुरक्षारक्षक महेश भोसले यांच्यासह शौचालयात गेले असता खानने त्याच्या अंगातील टी-शर्ट शौचालयातील जलवाहिनीला बांधून गळफास घेतल्याचे पाहिले. त्यावर भोसले यांनी तात्काळ खानला उचलले व सावंत यांनी त्याच्या गळय़ाभोवतीचा फास सोडवला. खानला खाली उतरवले असता त्याच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू होता. त्याने काचेच्या तुकड्याने स्वत:च्या डोक्यात मारून घेतल्याचे सावंत यांच्या निदर्शनास आले. खानवर कारागृहातील रुग्णालयातच उपचार करण्यात आले. त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रहार कौल-
[poll id=”742″]
खानविरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गेल्या वर्षी एक बलात्काराचा आणि २०१२मध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता. त्याला अटक झाल्यानंतर अंडरट्रायल म्हणून आर्थर रोड कारागृहात ठेवले होते. कारागृह सुरक्षेतील तज्ज्ञांनुसार, सहा कैद्यांमागे साधारण एका सुरक्षारक्षकाची आवश्यकता आहे. परंतु, राज्यातील कारागृहांमध्ये दाटीवाटीने कैदी भरले असतानाच, त्या तुलनेत सुरक्षारक्षकांची संख्याही फार कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी सरकारने सुरक्षारक्षकांच्या संख्येत वाढ करणे आवश्यक आहे.
आर्थर रोड कारागृहातील ही घटना जरी खरी असली, तरी आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने सर्व काळजी घेत आहोत. सध्या सीसीटीव्ही, बॅगेज स्कॅनर, हँट स्कॅनर्स आदी यंत्रांच्या सहाय्याने कारागृहांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जाते. पण सर्व प्रयत्न करूनही क्वचित असे प्रकार घडतात. – मीरा बोरवणकर, अतिरिक्त महासंचालक (कारागृह)
ह्या आसिफ खानला जेल मध्ये असलेल्या ” अंडा सेल ” मध्ये सुरक्षित ठेवा ,!!