दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या मरिन लाइन्ससारख्या भागात महिला प्रसाधनगृहांत पुरुषांचा वावर असतो. मरिन लाइन्स पूर्व असो वा पश्चिम; महिला प्रसाधनगृहांत पुरुषांना जाण्यास कोणीही रोखत नाही.
मुंबई – दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या मरिन लाइन्ससारख्या भागात महिला प्रसाधनगृहांत पुरुषांचा वावर असतो. मरिन लाइन्स पूर्व असो वा पश्चिम; महिला प्रसाधनगृहांत पुरुषांना जाण्यास कोणीही रोखत नाही. कंत्राटदाराचा मित्रपरिवार आणि कंत्राटदार धूम्रपान करण्यात मग्न असतात. प्रसाधनगृहांत पुरुषांचाच वावर असल्याने महिला प्रसाधनगृहांत न जाणेच पसंत करतात. पुरुष बाहेर पडल्याची खात्री केल्यानंतरच महिला प्रसाधनगृहांचा वापर करतात. पालिकेकडून मोफत प्रसाधनगृहांचे फलक मिळूनही कंत्राटदारांनी ते लावलेले नाहीत. काहींनी चक्क प्रसाधनगृहांच्या आत फलक लावले आहेत. आम्हाला फलक लावा, असे सांगितले आहे. आदेश नाही; त्यामुळे फलक लावणे महत्त्वाचे! प्रसाधनगृहांच्या बाहेर फलक लावण्याची काय गरज? असे निर्लज्ज वक्तव्यही कंत्राटदार करतात.
मरिन लाइन्स (पूर्व)
स्थानकाबाहेर पडताच फुलोरा स्वच्छतागृह लागते. या स्वच्छतागृहाची अक्षरश: केविलवाणी अवस्था आहे. पुरुषप्रसाधनगृहांचा वापर करा, असा निर्लज्ज सल्ला येथील कंत्राटदार देतो. या कंत्राटदाराला महापालिकेकडून कोणतेही परिपत्रक मिळालेले नाही. महिला स्वच्छतागृहाबाहेरच त्याने आपला अड्डा बनवला आहे. बाहेरच टेपरेकॉर्डरवर गाणी ऐकत बसलेला कंत्राटदार, महिलांना पुरुष प्रसाधनगृहांचा वापर करा. काय हरकत आहे? असा सल्ला देतो. महिलांसाठी एक प्रसाधनगृह आहे. मात्र या प्रसाधनगृहाच्या वापरासाठी पाच रुपये आकारले जातात. दोन रुपयांसाठी तुम्ही पुरुष प्रसाधनगृहांचा वापर करा, असे या कंत्राटदार सांगतो. पुढे उड्डाणपुलाखाली असलेल्या सुलभ शौचालयात महिला मोफत शौचालयांचा फलक आढळतो. परंतु हा फलक आत लावला आहे. फलक सहजासहजी दिसणार नाही, याची काळजी कंत्राटदाराने घेतली आहे. एखाद्या महिलेचे लक्ष गेलेच आणि तिने फलकाबाबतची माहिती विचारलीच तर सुविधा मोफत आहे, असे कंत्राटदार सांगतो. पुढे जवळपास एक किलोमीटरच्या परिसरात प्रसाधनगृहे नाहीत. काळबादेवी भागातील एका चिंचोळ्या गल्लीच्या सुरुवातीलाच एक खासगी स्वच्छतागृह आहे. या मालकाला महापालिकेकडूनच फलक उपलब्ध झाला आहे. परंतु हा फलक काही दिवसांनी लावू, असे या मालकाचे म्हणणे आहे. महिलांचा वावर नसल्याने पुरुषच या प्रसाधनगृहांचा वापर करतात. बाहेर टवाळखोर धूम्रपानात मग्न असतात. समोरच्या न्यू हनूमान लेनमधील सुलभ शौचालयात महिला व पुरुष प्रसाधनगृहे एकाच रांगेत आहेत. त्यापैकी महिलांना केवळ एकच प्रसाधनगृह उपलब्ध आहे, परंतु पुरुषांसमोर प्रसाधनगृहात कसे जायचे, या शरमेने महिला या प्रसाधनगृहांत जाणे टाळतात. फलक प्रसाधनगृहाच्या आत लावला आहे. महिलांसाठी मोफत प्रसाधनगृह असा फलक लावण्याचा आदेश महापालिकेकडून नाही, असे कंत्राटदाराने सांगितले. येथेही प्रसाधनगृहाच्या आत पुरुष धूम्रपान करताना आढळतात. पुढे १० मिनिटांच्या अंतरावर चिराबाजार येथे महिला प्रसाधनगृह आहे. तेसुद्धा शोधावे लागते. कचराकुंडीत गडप झालेल्या या प्रसाधनगृहात महिलांसाठी सोय असेल का? असा प्रश्न पडतो. महिला प्रसाधनगृहात जातानाही कचरा ओलांडावा लागतो. गाडय़ाही पुरुष आणि महिला प्रसाधनगृहांच्या बाहेर अडगळीच्या ठिकाणी लावण्यात येतात. पालिकेकडून १५ दिवसांपूर्वीच फलक मिळाला आहे. पण हा फलक प्रसाधनगृहात लावण्यात आला आहे. मात्र तुम्ही स्वच्छेने पैसे देऊ शकता, असे कंत्राटदार सांगतो.
मरिन लाइन्स (पश्चिम)
पश्चिमेकडील भागांत महिलांसाठी फक्त एकच प्रसाधनगृह आहे. उड्डाणपुलाखाली महापालिकेचे एकच प्रसाधनगृह असून, येथे ‘मोफत’ असा फलक लावलेला आहे, परंतु हा फलक पडलेलाच आहे. त्यामुळे फलक असून, नसल्यासारखाच आहे. प्रसाधनगृहात येणा-या महिलांना सुविधा मोफत असल्याचे कळत नाही. प्रसाधनगृहात स्वच्छता असली तरीही मोफतचा फलक काही दिवसांपूर्वीच लावल्याची कबुली कंत्राटदाराने दिली. फलक दिसत नसल्याने ‘राइट टू पी’च्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मरिन ड्राइव्ह परिसरात मोबाइल टॉयलेट्स हा पर्याय उत्तम ठरू शकतो.
झोननिहाय बैठकांत झोन-१अंतर्गत मरिन लाइन्स या ‘सी’ वॉर्डमध्ये सर्व ठिकाणी मोफत महिला प्रसाधनगृहांचे फलक लावण्यात आल्याचा महापालिकेचा दावा खोटा
दोन लाख २ हजार २१६ लोकसंख्या; मात्र प्रसाधनगृहे हाताच्या बोटावर
जवळपास सर्वच ठिकाणी पुरुषांचा वावर
फलक प्रथमदर्शनी न लावता आत लावले आहेत
कच-याचा डबा नाही. एका ठिकाणी पुरुष व महिलांसाठी बाहेर एकच कच-याचा डबा आहे. कित्येक स्वच्छतागृहे कच-याच्या ढिगा-यात उभी आहेत.
पश्चिेमकडे मोबाइल टॉयलेट्स उभारण्याची गरज
झोननिहाय बैठकांत तसेच सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीत प्रचंड तफावत आहे. मोफत महिला प्रसाधनगृहाचे फलक प्रथमदर्शनीच हवेत. महिला सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. – मुमताज शेख, कार्याध्यक्ष, महिला मंडळ फेडरेशन
मते द्या ! मते द्या ! आम्हाला मते द्या ! आम्ही तुमच्या सगळ्या अडचणी दूर करू , निवडून आलेले रथी महारथी आता गेले कुठेत ?