लूट माजवणे, महिलांवर बलात्कार करणे आणि चोरी झाल्यानंतर काही क्षणांत गायब होणारी चड्डी बनियन गँग वसई ग्रामीण आणि विरार परिसरात पुन्हा सक्रिय झाली आहे.
विरार- लूट माजवणे, महिलांवर बलात्कार करणे आणि चोरी झाल्यानंतर काही क्षणांत गायब होणारी चड्डी बनियन गँग वसई ग्रामीण आणि विरार परिसरात पुन्हा सक्रिय झाली आहे. या टोळीसाठी डोळय़ांत तेल घालून दहा ते पंधरा गावांतील रहिवासी जागता पहारा देत आहेत. विरारमधील कणेर गावांसह तळय़ाचा पाडा, खर्डी कोसिंबे, वैतरणा, फणसपाडा, दहिसर, जांभूळ पाडा आणि इतर गावातील रहिवासी दिवसा काम आणि रात्री पहारा देत आहेत.
चड्डी बनियन गँगच्या दहशतीमुळे १० ते १५चा गट विभागून पहारा देत आहेत. एका हातात काठी आणि एका हातात टॉर्च घेऊन गाव परिसरात गस्त घातली जात आहे. गावातील चौकाचौकांत गस्त घालून संपूर्ण गावाची टेहळणी करण्याचे काम गावक-यांचे पथक करत आहे. गावात कोणतीही संशयित व्यक्ती आढळल्यास त्याची कसून तपासणी करणे, तसेच काही संशय वाटल्यास लाऊडस्पीकरवर घोषणा करणे, गावातील कानाकोप-यात गस्त घालत हे तरुण आपल्या गावाचे रक्षण करत आहेत. या गावांपासून विरार पोलीस ठाणे १२ किमी अंतरावर आहे. पोलिसांना तेथे पोहोचताना खूप वेळ लागत असल्याने गावक-यांना रात्र जागवण्यापलीकडे पर्याय उरलेला नाही. याआधी वसई तालुक्यात वर्षभरात चार चोरांना ठार केल्याची घटना घडली आहे.
गावाच्या रक्षणासाठी शेकोट्या पेटल्या
चोरांना पकडण्यासाठी रात्र जागवणारी गावातील तरुण मुले थंडीपासून रक्षणासाठी शेकोट्या पेटवत आहेत. चड्डी बनियन गँग वसई तालुक्यात सक्रिय झाली आहे. अंगाला तेल फासून लोकांच्या घरात शिरणारी ही टोळी कुटुंबांवर अचानक हल्ला चढवून लुटमार करते. अलीकडेच विरारच्या तळय़ा पाडा येथे चड्डी बनियन गँगच्या चोरांनी चोरीचा प्रयत्न केला होता. ही बातमी नजीकच्या गावांत पसरल्याने भीतीचे वातावरण आहे.
हे सर्व अफवा आहेत. गेल्या वर्षी सुधा अशीच बातमी आली होती परंतु कुठेच कोणी चोरी झाल्याची रीतसर तक्रार केली नव्हती ..मिडिया तर आणखी खात पाणी घालते