माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे पार्थिव रामेश्वरममध्ये दाखल झाले आहे.
नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे पार्थिव रामेश्वरममध्ये दाखल झाले आहे. तिन्ही दलांनी सलामी दिल्यानंतर हवाई दलाचे विशेष विमान सकाळी ८.१५ च्या सुमारास कलाम यांचे पार्थिव घेऊन मदुराईच्या दिशेने रवाना झाले होते.
हवाई दलाच्या विशेष हॅलिकॉप्टरने कलाम यांचे पार्थिव मदुराईहून रामेश्वरम येथे आणण्यात आले. तामिळनाडूतील रामेश्वरम हे अब्दुल कलाम यांचे मूळगाव. याच ठिकाणी गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बुधवारी रामेश्वरम बस स्थानकाजवळच्या मोकळया मैदानात कलाम यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. लोकांना रात्री आठ वाजेपर्यंत कलाम यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल.
सोमवारी रात्री शिलॉंग येथील एका कार्यक्रमात कलाम यांचे निधन झाले. मंगळवारी त्यांचे पार्थिव नवी दिल्लीतील १० राजजी मार्ग या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
बुधवारी सकाळी सातच्या सुमारास रामेश्वरम येथे नेण्यासाठी पुन्हा त्यांचे पार्थिव पालम विमानतळावर आणण्यात आले. यावेळी केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपा नेते शहानवाझ हुसेन विमानतळावर उपस्थित होते.
उद्या पूर्ण लष्करी इतमामात अब्दुल कलाम यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कलाम यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
RIP ,!