रस्त्यांवरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी चालक परवाना देण्याची प्रक्रिया अधिक कठीण करण्याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) सूचना केल्या आहेत.
मुंबई- रस्त्यांवरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी चालक परवाना देण्याची प्रक्रिया अधिक कठीण करण्याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) सूचना केल्या आहेत. या सूचना मान्य झाल्यास अमेरिकेतील चालकांना परवाना मिळवण्यासाठी द्याव्या लागणा-या कठीण चाचण्या द्याव्या लागणार असून, त्यात सिम्युलेटिव्ह चाचणीसह ड्रायव्हिंग अॅप्टिटय़ूड (योग्यता) चाचणीही देणे बंधनकारक राहील.
प्रहार कौल
[poll id=”523″]
मुंबईत दरवर्षी तीन ते साडेतीन हजार जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. याला आळा घालण्यासाठी आणि वाहनचालकांचा दर्जा सुधारण्यासाठी चालक परवाना देण्याची प्रक्रिया अधिक कठीण करण्याची सूचना मुंबई वाहतूक विभागातर्फे ‘आरटीओ’ला करण्यात आली आहे. त्याबाबतचे पत्र वाहतूक पोलिसांनी आरटीओ विभागाला दिले आहे. त्यात अमेरिकेत चालक परवान्यासाठी द्याव्या लागणा-या विविध चाचण्यांचाही समावेश करण्याबाबत सूचवण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांच्या सूचनांनुसार, चालक परवाना मिळवण्यासाठी लेखी परीक्षेसह सिग्नल व वाहतूक सांकेतिक खुणा ओळखाव्या लागणार आहेत. त्यात चालक परवान्यासाठी अर्ज केलेल्या व्यक्तीपुढे एका मिनिटाला १० वाहतूक सांकेतिक खुणा व चिन्हे येणार असून, त्याला ती सर्व चिन्हे ओळखावी लागतील. या परीक्षेनंतर संबंधित व्यक्तीला चालकाला सिम्युलेटिव्ह चाचणीला सामोरे जावे लागेल. त्यात व्हिडिओ गेमप्रमाणे आभासी यंत्रणेत कार चालवावी लागेल.
या चाचणीसाठी लागणारे सिम्युलेटर उपलब्ध करून देण्याबाबत अनेक संस्थांशी चर्चा करण्यात आल्या होत्या. वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाइल असोसिएशनने त्यासाठी होकार दर्शवला आहे. त्यांच्यामार्फत अशा प्रकारचे सिम्युलेटर आरटीओला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
त्यानंतर चालकांना प्रत्यक्ष वाहन चालवून दाखवावे लागेल. त्यात सध्याच्या चाचणीसह आरशात बघून कार मागे घेणे, याशिवाय चालक चाचणी देताना सीट बेल्टचा वापर करतोय का, गाडी वळण घेताना दिव्यांनी इशारा देतोय का, अशा विविध गोष्टीही तपासून पाहिल्या जातील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या परीक्षा देऊन पास झाल्यानंतरही परवाना मिळवण्यासाठी चालकाला ड्रायव्हिंग अॅप्टिटय़ूड चाचणीही द्यावी लागेल.
सध्या वैमानिकांना परवाना मिळवण्यासाठी अशा प्रकारची चाचणी द्यावी लागते. त्यात परवान्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती मानसिकदृष्टय़ा चालक म्हणून किती सक्षम आहे, याची पडताळणी केली जाते. त्यानंतरच चालक परवाना मिळणे शक्य होणार आहे.
अमेरिकेत चालक परवाना मिळवण्यासाठी ज्या कठीण चाचण्या द्याव्या लागतात, त्यांचा समावेश आपल्याकडेही करण्याबाबतच्या सूचना आरटीओ विभागाला करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चालकांचा दर्जा सुधारण्यास नक्कीच मदत होईल. – प्रताप दिघावकर, उपायुक्त (उपनगर), वाहतूक शाखा
First improve our indian roads and footpath.