सिनेमात चोरांच्या मागे पोलिस धावत असल्याचे दृश्य कायम आपण पाहिलेले असते. मात्र, यासारखी खरीखुरी घटना खार येथे सोमवारी घडली.
मुंबई – सिनेमात चोरांच्या मागे पोलिस धावत असल्याचे दृश्य कायम आपण पाहिलेले असते. मात्र, यासारखी खरीखुरी घटना खार येथे सोमवारी घडली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस आपल्या मागावर असल्याचे लक्षात आल्यानंतर एका पोलिसाने घरातील एसीचा बॉक्स उघडून त्यातून उडी मारून पोबारा केला. इस्टेट एजंटला सामूदायिक बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून त्याच्याकडून ५० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी एसीबीने पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षकासह तीन खासगी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलिस निरीक्षक सुभाष सामंत व पोलिस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर अशी आरोपी पोलिस अधिका-यांची नावे आहेत.
सुभाष सामंत याने खार येथील एका बांधकाम व्यावसायिकाला दूरध्वनी करून तुमच्या विरोधात एका २० वर्षीय तरुणीने सामुदायिक बलात्काराची तक्रार केल्याचे सांगितले. त्याचा पुरावा म्हणून छायाचित्र सादर केल्याचे सामंत यांनी सांगितले. या प्रकरणी आरोपीने नेर्लेकर यांच्याशी भेट घेतली. त्यांनी हे प्रकरण दोन लाख रुपयांमध्ये मिटवण्याचे आश्वासन दिले होते.
पण त्यानंतर त्यांनी बांधकाम व्यावसायिकाचे दूरध्वनी उचलले नाही. त्यानंतर तक्रारदाराने सामंत यांची भेट घेऊन विकी अरोरा, त्याचा चालक महेश कांबळे व रॉबीन गोन्साल्विस याला भेटून त्यांच्यातील जागेचा वाद सोडविण्यास सांगितले.
तसेच हे प्रकरण मिटवण्यासाठी सामंत यांनी या प्रकरणी ५० लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराला अरोरा यांना रिकामी करण्याच्या जागेचे कागदपत्र व लाचेचा पहिला हप्ता १० लाख रुपये घेऊन सामंत यांनी सोमवारी घरी येण्यास सांगितले. तक्रारदाराने याप्रकरणी एसीबीकडे तक्रार केल्यानंतर २० हजार रुपयाचे दोन बंडल व त्या खाली कागद भरून तक्रारदार सोमवारी सामंत यांच्या वांद्रे येथील घरी गेला.
ही रक्कम सामंत यांना दिल्यानंतर त्याने याची माहिती एसीबीच्या अधिका-यांना दिली. त्यानुसार एका महिला शिपायाने घरात प्रवेश केल्याचा प्रयत्न केल्यानंतर सामंत यांना आपल्या मागावर कोणीतरी असल्याचे लक्षात आले. त्यांनी घरातील एसीचा बॉक्स काढून पहिल्या मजल्यावरून उडी मारून पलायन केले.
या प्रकरणी सामंत यांच्या कारमध्ये पीडित तरुणीची तक्रार व तिने सादर केलेले पुरावे सापडले आहे. त्यानंतर सामंत व नेर्लेकर यांच्यासह अरोरा, कांबळे व गोन्साल्विस याच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.
चांगल फोडून काढा साल्यांना ,सोकावलेत कुत्रे जनतेची लुटमार करायला…