विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धोत्पादन वाढीस चालना देण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळासोबत (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
मुंबई- विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धोत्पादन वाढीस चालना देण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळासोबत (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. या भागातील दूध उत्पादकांना विविध सोयी-सुविधा देण्याचाही मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रोजगार हमी योजना व जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे शिष्टमंडळ मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या वेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री मधुकर चव्हाण, राज्यमंत्री गुलाबराव देवकर उपस्थित होते. विदर्भ-मराठवाडा हा भाग कोरडवाहू असल्याने त्या भागात दुग्धोत्पादन कमी प्रमाणात होते. ते वाढवण्याच्या दृष्टीने ‘न्यू जनरेशन को-ऑपरेटिव्ह’ ही दूध उत्पादकांची कंपनी तयार करून त्याद्वारे पशू आहार, कृत्रिम रेतन यांचे कार्यक्रम राबवून दूध संकलनाचे कामही केले जाईल. यामुळे शेतक-यांच्या दुधाला वाजवी भाव मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
भिवंडी येथे डेअरी जनावरांची प्रत सुधारून दुग्धोत्पादन सुधारण्याचा कार्यक्रमही हाती घेतला जाईल. दुधाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भिवंडी येथे पाच लाख लिटर क्षमतेची डेअरी स्थापन करण्यात येईल. त्यामुळे मुंबईकरांना चांगले दूध उपलब्ध करून देता येईल. दापचरी येथे मेगा सिमेन सेशन स्थापन करण्यात यावे, ज्यामुळे महाराष्ट्रात जातिवंत पशुधन निर्मिती होईल, अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे करण्यात आली आणि त्यास मान्यताही देण्यात आली.
विदर्भ तसेच सांगली, सातारा जिल्ह्यात भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. जलसाठय़ात वाढ करण्यासाठी ‘फाऊंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्युरिटी’ या संस्थेमार्फत एक कार्यक्रम राबवला जाईल. ‘मनरेगा’ आणि राज्य सरकारच्या अन्य योजनांमार्फत या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे डॉ. नितीन राऊत यांनी या वेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, सचिव डॉ. नितीन करीर व आशीषकुमार सिंह, अनिल डिग्गीकर, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे आयुक्त जयंत गायकवाड, अध्यक्ष अमृता पटेल, व्यवस्थापकीय संचालक दिलीप रथ, कार्यकारी संचालक संग्राम चौधरी यावेळी उपस्थित होते.
मी लवकरच दुधाचा धंदा चालू करनार आहे।