मुंबईत कडाक्याची थंडी पडत नसली तरीही गेल्या दोन दिवसांपासून थंड वारे अंगाला बोचू लागले आहेत. स्वेटर, मफलरचा वापर मुंबईत जास्त होत नसला तरीही थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड होत असते. म्हणूनच या थंडीत घराचा चेहरामोहरा काहीसा बदलून घरालाच उबदारपणा देण्याचा प्रयत्न केला तर घराच्या लूकमध्ये नक्कीच छान दिसेल.
मुंबईत अजिबात थंडी पडली नाही, असं आपण कितीही म्हटलं तरी रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी अंगाला बोचणारे वारे वाहू लागले आहेत. स्वटेर, शाल किंवा थोडेसे उबदार कपडे बाहेर पडू लागले आहेत. रात्रीच्या वेळी अंगावर दुलई ओढल्याशिवाय राहावत नाही. आणि पहाटेच्या वेळी अंथरूणातून बाहेर पडावंसं वाटत नाही. सकाळच्या वेळी शाळेत जाणारी लहान मुलं स्वेटर घालून बाहेर पडू लागली आहेत. थोडक्यात काय तर अंगाला ऊब मिळण्यासाठी काही प्रयत्न सुरू असतात. म्हणूनच मग घरातच थोडे फार काही बदल केले आणि घराला काहीसा वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला तर या थंडीत तुम्हाला तुमच्या घराला काहीसा उबदार करण्याचा प्रयत्न करू या.
भिंतीचा रंग
मुलांना ख्रिसमसची सुट्टी म्हणून घराला रंग काढण्याचं काम काढलं असेल तर आजकाल एका भिंतीला गडद रंग देण्याची आणि ती भिंत टेक्श्चकरण्याची खूप फॅशन आहे. मात्र हे रंग निवडताना काहीसे गडद रंग निवडा. घरात भरपूर उजेड असेल तर लाल, केशरी, पिवळा असे गडद रंग वापरावेत. कारण या रंगांमुळे घराला काहीसा उबदार लूक दिसतो. रंग काढणं शक्य नसेल तर मात्र एखादं भडक रंगाचं चित्रं किंवा फ्रेम भिंतीवर लावावी. म्हणजे भिंतीला वेगळाच लूक येतो. तुम्हाला विकत घ्यायच्या नसतील तरीदेखील आजकाल या भिंतीवरच्या चित्रांचीदेखील लायब्ररी असते. त्यातून तुम्ही चित्रं आणून भिंतीवर लावू शकतात.
उबदार कपडे
घराचा लूक बदलण्यामागे तिथल्या कपडय़ांचा खूप मोठा हातभार असतो. चादरी, पडदे, कुशन कव्हर्स, टेबलक्लॉथ, सोफा कव्हर या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करा. म्हणजे उन्हाळ्यासाठी तुम्ही फिकट रंगांचा वापर केला असेल तर आता खास हिवाळ्यासाठी गडद रंगाचा वापर करा. बेडशीट्स आणि कुशन कव्हर्समध्ये आजकाल छान ब्राइटस रंग आले आहेत. त्याचा वापर केल्याने लूक छान दिसतो. त्याला शोभेल असे पडदे लावले की तुमचं घर छान झालंच म्हणून समजा. आलेल्या पाहुण्यांवर चांगलं इम्प्रेशन पडतं. घर मोठं असेल तर एखादा गडद रंगाचा गालिचादेखील तुमच्या घराची शोभा वाढवेल यात काही शंका नाही. मात्र सगळ्यांची रंगसंगती कशी दिसेल याकडे मात्र लक्ष पुरवावं. नाहीतर सगळी मेहनत पाण्यात जाईल. घर छान दिसण्याऐवजी त्याचा लूक बिघडेल.
प्रकाशयोजना
दुपारच्या वेळी घरात ऊन येतं. थंडीच्या दिवसांत हे ऊन खूप चांगलं वाटतं. मात्र अधिक उजेड नको असेल तर तुम्ही पडदे लावून घेऊ शकता. गरम वातावरणामुळे घरात ऊब राहते. मात्र रात्रीच्या वेळी काय करता येईल असं तुम्हाला वाटत असणारच! परदेशात घरात उबदारपणा आणण्यासाठी फायर प्लेसेस असतात. मात्र मुंबईत खूप थंडी अशी नसते. थोडय़ाफार थंडीसाठी मेणबत्त्यांचा पर्याय चालू शकेल. त्यासाठी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घराच्या कोप-यांमध्ये सुगंधी मेणबत्त्या लावा किंवा अगदी छान पद्धतीचा होममेड दिवा देखील केला असेल तर तो देखील ठेवू शकता. इतकंच नाही तर आजकाल बाजारात वॉर्म लाईट आले आहेत. आणि बहुतांशी लोक हे घराचं नूतनीकरण करताना या लाइट्सची निवड करतात. संध्याकाळच्या वेळी हे लाईट लावले की घरात प्रकाशही छान येतो आणि त्यांच्या प्रकाशामुळे वॉर्म फिलही येतो. आवडत असेल आणि जागा असेल तर सोफ्याच्या कोप-यात लॅम्पची शेड लावावी. म्हणजे या एकाच दिव्यात काम होतं. घराला उबदारतेचा लूक आणि प्रकाश दोन्ही गोष्टी साध्य होतात.
फर्निचरची अदलाबदल
फर्निचरची अदलाबदल केल्याने घराचा चेहरामोहराच बदलून जातो. ज्या ठिकाणी खूप हवा येणार नाही अशा ठिकाणी बसण्याची व्यवस्था केल्याने खिडकीतून येणारे बोचरे वारे झोंबणार नाहीत. तिथे बसलं की ऊब जाणवेल. साधारणत: कोप-यात वगैरे बसण्याच्या जागेचं फर्निचर हलवलं की थंडी काहीशी कमी वाटेल. मुळात घराची तीच तीच रचना पाहून कंटाळा आलेला असतो. म्हणूनच जरा वेगळी रचना केली की आपल्याला वेगळ्या ठिकाणी गेल्याचाही भास होतो. छान वाटतं. मात्र फर्निचरची अदलाबदल करताना अडगळ होणार नाही आणि रंगसंगतीला धोका पोहोचणार नाही याची मात्र काळजी घ्यावी.
चांगला सल्ला