तारुखिंडीला आजवर फक्तकेळवे आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशीच भेट देतात. फारशी कोणालाच माहिती नाही. पहिल्यांदाच सावे टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सने या ठिकाणची माहिती मिळवली आणि पहिल्या ट्रेकचे आयोजन केले. तारुखिंडीवरील पहिल्याच अनुभवाच्या ट्रेकची ही माहिती.
तारुखिंड एक अशी जागा ज्याचा उल्लेख ना जगाच्या नकाशावर आढळतो ना या युगात माहिती मिळवण्यासाठी गॉड समजल्या जाणा-या गुगल सर्च इंजिनवर. तारुखिंड ही पालघर जिल्ह्यातील केळवेमध्ये येते. केळवे स्टेशनपासून पूर्वेस पाहिल्यास डोंगराला इंग्रजीमधील यू (व) आकाराची खाच दिसते, ती म्हणजे ‘तारुखिंड’.
केळव्या धरणाला लागूनच असलेल्या डोंगररांगेत तारुखिंड आहे. या तारुखिंडचा इतिहास हा फक्त काहीच लोकांना माहीत आहे. तारुखिंडीबाबत पौराणिक कथा अशी आहे की प्रलयात संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली गेली तेव्हा देवांचे जहाज प्रलय संपेपर्यंत सर्वत्र विहार करत होते.
या जहाजावर सगळ्या जातींचे पशू, पक्षी, प्रत्येक जातीचा मनुष्य, वेगवेगळ्या जातींची झाडे या सर्वाच्या पेशी/ बीज या जहाजावर ठेवलेली होती. हे जहाज विहार करत करत जेव्हा तारुखिंडीच्या डोंगराजवळ आले तेव्हा जहाजाचा पुढचा भाग या डोंगरावर आदळला आणि तिकडे खिंड तयार झाली म्हणून त्या खिंडीला नाव पडले ‘तारुखिंड.’
तारुखिंडीला आजवर फक्तकेळवे आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशीच भेट देतात. पहिल्यांदाच सावे टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सने या ठिकाणी ट्रेकचे आयोजन केले. सावे टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स हा पहिला ऑफिशिअल ग्रुप ज्याने या तारुखिंडीला भेट दिली. सर्वानी या ठिकाणची माहिती मिळवली आणि ट्रायल ट्रेकही केला आणि तारुखिंडीवर ट्रेकवर जाण्याची तारीख ठरली १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता.
सर्व ३४ ट्रेकर्स केळवे स्टेशन लगतच्या एका ठिकाणी भेटले. या ट्रेकर्सना गाईड करणार होते पद्माकर सावे (फाऊन्डर, सावे टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स), सिद्धेश सावे (ट्रेकिंग इन्चार्ज, सावे टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स), शुभम राऊत (व्हॉलेन्टिअर), सुप्रित सावे (व्हॉलेन्टिअर), हर्षद देसाई (व्हॉलेन्टिअर), नमित सावे (व्हॉलेन्टिअर) आणि दिव्यता शेटय़े (व्हॉलेन्टिअर). या सर्व ट्रेकर्सच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी होते मेडिकल एक्सपर्ट डॉ. सुस्मित सावे. या ट्रेकर्समध्ये काही जण अनुभवी होते तर काही जण पहिल्यांदाच ट्रेकला आलेले होते.
तारुखिंडीला भेट देणारे आपण पहिलेच असल्याने अनुभवी ट्रेकर्स तसेच पहिल्यांदा ट्रेक करणा-यांनाही उत्सुकता होती.. सावे टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सतर्फे देण्यात आलेले घरगुती कांदा-पोहे आणि गरमागरम चहा याचा आस्वाद घेऊन ८.२० ला ट्रेकिंगला सुरुवात झाली. डोंगराच्या पायथ्यापर्यंत पोहोचायला ९.२० झाले. त्यानंतर ख-या अर्थाने ट्रेकला सुरुवात झाली.
एकमेकांना मदतीचा हात देत, एनर्जीसाठी ग्लुकोव्हीटाच्या गोळ्या खात, पाणी पीत सर्व ट्रेकर्स डोंगरावर चढत होते. या सर्वाना मार्गदर्शन मिळाले सावे टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या कमिटीचे. सर्व ट्रेकर्स सकाळी ११ वाजता डोंगराच्या मध्यावर पोहोचले. या ठिकाणी इंदादेवीचे मंदिर आहे. या इंदादेवीचा आशीर्वाद घेऊन सर्व जण पुढच्या प्रवासाला रवाना झाले.
हिरवीगार झाडे, मधेच ढगांच्या आडून भेट देणारा श्रावणातला पाऊस, थंडगार वारा, मधेच वाटेत पायांना थंडावा देणारे झरे तर कुठे पायात अडकणारी झुडुपं, मधेच दिसणारे छोटे छोटे किडे, खेकडे, वेगवेगळ्या प्रकाची फुले, वेगवेगळी वारूळं, या सर्वाचा आनंद घेत ट्रेकर्स यू आकाराच्या तारुखिंडीवर पोहोचले.
तिथून वैतरणा नदीचा स्वच्छ प्रवाह, तांदूळवाडी किल्ला, केळवे धरण आणि केळवे स्टेशन हे सर्व पाहायला मिळाले. वर जाईपर्यंत सर्वाच्या पोटात भुकेचे कावळे ओरडायला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वानी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर पोटाला आधार मिळाल्यावर गाण्याची मैफलही रंगली आणि फोटेसेशनही सुरू झाले.
२.३० च्या सुमारास परतीचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास वेगळ्या वाटेने होता. त्यामुळे अनेक आव्हानंही पुढे होती. डोंगराच्या निसरडया वाटेतून, कातळ भागातून परतीचा प्रवास होता. वाट बघताच काहींच्या पोटात गोळा आला. पण कोणाचेही धर्य खचले नाही. एकमेकांना मदतीचा हात देऊन सर्वानी या ट्रेकमधील काही कठीण भाग पार केला. यानंतर कधी एकदा डोंगराच्या तळाशी असलेल्या केळवे धरणात जाऊन डुबकी मारतोय याचे सर्व ट्रेकर्सना वेध लागले. सर्व जण मजल दरमजल करत ५ वाजता डोंगराच्या पायथ्याची असणा-या केळवे धरणावर येऊन पोहोचले.
थकवा घालवण्यासाठी सर्वानी पाण्यात उडया मारल्या. काही जण मनसोक्तपणे तर काही जण कोणाच्या तरी आग्रहाखातर पाण्यात उतरले. धरणातल्या थंडगार पाण्यामुळे थकवा दूर झाला. धरणावर मनसोक्त डुंबल्यावर ६ वाजता सर्व ट्रेकर्स तिथून निघाले. त्यानंतर अजून पाऊण तासाचा रस्ता पार केल्यावर केळवे स्टेशनवर पोहोचणार होतो.
थकल्यामुळे सर्वाची पावलं थोडी थीम्या गतीने चालू लागली. अखेर ७.३० वाजता केळवे स्टेशनवर सर्व ट्रेकर्स पोहोचले. केळवे स्टेशनवर पोहोचल्यावर सावे टुर्सतर्फे देण्यात आलेल्या गरमागरम वडापाव आणि वाफाळणा-या चहाचा सर्व ट्रेकर्सनी आस्वाद घेतला. त्यानंतर केळवे स्टेशनवरून सर्व ट्रेकर्सनी आपापल्या घरांकडे आपली पावले वळवली.. अर्थात मनात हा अभिमान बाळगून की तारुखिंडीला भेट देणारे आम्ही पहिले ट्रेकर्स..
Please mail me the way to the spot
Or your contact