गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत आलेली डबल डेकर चाचणी परीक्षेचा पहिला पेपर देऊन अखेर बुधवारी सायंकाळी मुंबईला पोहोचली
रत्नागिरी – गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत आलेली डबल डेकर रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरील बोगदे, पूल, द-या तसेच स्थानके पार करून चाचणी परीक्षेचा पहिला पेपर देऊन अखेर बुधवारी सायंकाळी मुंबईला पोहोचली. शनिवारी डबल डेकरने मुंबईहून रोहा आणि पुढे रोहा ते रत्नागिरी असं चाचणीचं अग्निदिव्य पार पाडलं. या गाडीचा तिस-या टप्प्यातील चाचणी प्रवास गोव्यातील मडगाव स्थानकावर रविवारी सायंकाळी संपला.
देशातील गर्दीचा आणि सर्वात पसंतीच्या रेल्वे मार्गामध्ये दिल्ली- मडगाव, मुंबई- मडगाव या मार्गाचा समावेश झाला आहे. जनशताब्दी, कोकणकन्या, राज्यराणी एक्स्प्रेस या मुंबई- गोवा मार्गावर धावणा-या गाडय़ा सर्वच हंगामात ‘हाऊस फुल्ल’ जात असल्याने आाणि कोकण रेल्वेचा मार्ग हा एकेरी असल्याने या मार्गावर गाडय़ा वाढवण्यापेक्षा ‘डबल डेकर’चा पर्याय व्यवहार्य ठरतो, का या दृष्टीने रेल्वे बोर्डानेच पुढाकार घेतला आणि गेल्या आठवडय़ात दुमजली रेल्वे गाडीची चाचणी सुरू केली.
शनिवारी १७ रोजी ही गाडी मुंबईतून पनवेलमार्गे मध्य रेल्वेच्या अधिकारी, तांत्रिक कर्मचा-यांच्या पथकासह रोह्यापर्यंत धावली. पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होत असल्याने रोहा ते रत्नागिरीपर्यंतच्या मार्गातील पूल, बोगदे, द-या ओलांडत ही गाडी शनिवारी रात्री रत्नागिरीत आली. दुस-या दिवशी सकाळी १०.३० च्या सुमारास या गाडीची चाचणी दौड मडगावच्या दिशेने रवाना झाली. दुमजली रेल्वे गाडीचा कोकण रेल्वे मार्गावरील हा पहिलाच प्रवास असल्याने गाडीत उपस्थित रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, तांत्रिक पथक यांनी मार्गातील वळणे, बोगदे, पूल तसेच फलाटाजवळून गाडी जाताना येणा-या अडचणी नोंदवून घेतल्या. दरम्यान, मुंबई ते मडगाव दरम्यान या गाडीच्या चाचणीसाठी आणखी फे-या होणार असल्याची समजते. चाचणीनंतर अंतिम निर्णय रेल्वे सुरक्षा बोर्डाकडून घेतला जाणार आहे.
दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार रोहा ते मडगावपर्यंत या गाडीने चाचणी दौड यशस्वीपणे पूर्ण केली. चिपळूण-रत्नागिरी दरम्यान आरवली स्थानकावरून ‘लूप’ लाइनवरून ही गाडी नेताना शेवटच्या काही डब्यांना स्कॅ्रचेस गेल्याचे समजते. मात्र, ही समस्या दूर करण्याजोगी असल्याने सध्या तरी डबल डेकरचा प्रवास कोकणवासीयांना दृष्टिपथात येऊन ठेपल्याचे समजते. दरम्यान, परतीच्या प्रवासासाठी ही गाडी मडगावहून मंगळवारी दुपारनंतर निघाली. रात्री रत्नागिरीत स्थानकात देखभालीसाठी मुक्काम करून बुधवारी सकाळी ११ वाजता ती रत्नागिरीतून निघाली. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता संगमेश्वर, तर दुपारी १२.२० वाजता तिने चिपळूण स्थानक सोडले. सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी या गाडीने रोह्यापर्यंतची कोकण रेल्वेची हद्द यशस्वीपणे ओलांडली.
चाचणी अहवालानंतर पुढील सर्व गोष्टी अनुकूल ठरल्या तर सध्या धावणा-या जनशताब्दीऐवजी डबल डेकर किंवा दुसरा पर्याय म्हणून जनशताब्दी आणि डबल डेकरच्या वेळेत काही तासांचे अंतर ठेवून ही गाडी प्रत्यक्ष धावण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याची माहिती सुत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
व्हीडिओ कॅमे-यांचा वापर
कोकण रेल्वे मार्गावर प्रथमच धावलेल्या डबल डेकरच्या चाचणीत कोणतीही कसूर राहू नये, याची पुरेपूर दखल घेण्यात आली होती. स्थानकातूनफलाटाजवळून गाडी नेताना डबे घासत नाही ना, याचे अचूक निरीक्षण नोंदवण्यासाठी डबल डेकरच्या कोचबाहेर फलटाच्या उंचीवर व्हीडीओ कॅमेरे बसवण्यात आले होते.
कृपा करून जनशताब्दी बंद करू नये.कोकण वासीयांची आवडती गाडी आहे.डबल डेकर हि सकाळी ७ -८ या दरम्यान दादर वरून सोडावी.जनशताब्दी बंद करून कोकण वासीयांवर अन्याय करू नये.ह्या गाडीला कुडाळ येथे थांबा देण्यात यावा.
janashatabdi should not be replaced for this train…