पुणे – शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये १२ जानेवारीपासून तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. त्यामुळे शालार्थ प्रणाली बंद पडली आहे. शालार्थ प्रणाली दुरुस्त करण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे सध्या ही प्रणाली सुरू करणे शक्यच नाही. याचसाठी राज्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार ऑफलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा प्रकारचे आदेश राज्याच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी प्राथमिक आणि माध्यमिकच्या संचालकांना दिले आहेत. त्याला अनुसरून माध्यमिकचे संचालक गंगाधर म्हमाणे यांनी संबंधित अधिका-यांना शिक्षकांचे पगार ऑफलाईन करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पगाराची बिले दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यात वेतन पथक अधीक्षक कार्यालयमार्फत स्वीकारली जातात. यासाठी संबंधित शाळांना तारखाही नेमून दिल्या आहेत. या महिन्यात मात्र ज्या शालार्थ वेतन प्रणालीमधून वेतन देयके अपडेट केली जातात त्या शालार्थ वेतन प्रणालीचे संकेतस्थळच बंद असल्यामुळे शिक्षकांच्या वेतन देयकामध्ये अडचणी येत होत्या.
शिक्षकांचे सर्व आर्थिक व्यवहार हे पगारावरच अवलंबून असून शिक्षकांना कुठल्याही समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी शालार्थ वेतन प्रणालीची सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी किंवा या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यास ती दुरुस्त होईपर्यंत शिक्षकांची वेतन देयके ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांनी शासनाकडे केली होती.
शालार्थ प्रणालीवरून तब्बल ५ लाख ७० हजार शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार ऑनलाईन काढण्यात येतात. त्यामुळे प्रणाली बंद झाल्याचा फटका या सर्वच कर्मचा-यांना बसण्याची शक्यता होती. याचसाठी चारुशिला चौधरी यांनी ज्या शिक्षकांचे डिसेंबर महिन्याचे पगार शालार्थमधून दिले आहेत. त्या शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे पगार डिसेंबर महिन्याच्या वेतनाच्या आधारे देण्यात यावेत, ज्या कर्मचा-यांनी डिसेंबर महिन्यात स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे; तसेच सेवानिवृत्त झाले आहेत किंवा अन्य कारणांमुळे सेवेतच नाहीत, अशा कर्मचा-यांची नावे जानेवारी महिन्याच्या वेतन देयकातून वगळावी, डिसेंबर महिन्याच्या वेतन देयकानुसार वेतन भत्ते परिगणित करून वेतन देयक सादर करावे, अशा प्रकारच्या सूचना प्राथमिक तसेच माध्यमिकच्या संचालकांना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने माध्यमिकचे संचालक गंगाधर म्हमाणे यांनी वेतन अधीक्षक तसेच संबंधित अधिका-यांना शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार ऑफलाईन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे पगार ऑफलाईन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शालार्थ प्रणाली बंद पडल्याने, जानेवाली महिन्याचे पगार बिले अॉफलाईन काढणेचा आदेश निघाला आहे. त्याबद्दल शासनाचे आभार. परंतु ऊपसचीव चारूशीला चौधरी यांनी ज्या शिक्षकांचे माहे. डिसें. चे पगार शालार्थ मधुन अदा केले त्यांनाच. जानेवारीचे पगाराचा आदेश दिले. परंतु ज्या शाळेमध्ये शिक्षक अतिरीक्त किंवा समायोजन झालेने, मागील माहे. अॉक्टाेंबर पासून पगार थांबलेले आहेत त्या शाळेतील शिक्षकांचे पगार ऑफलाईन पध्दतीने कधी होणार आणि किती दिवस थांबायचे. त्यासाठीचा वेगळा आदेश काढणार आहे, की नाही याबद्दल काहीच स्पष्टीकरण नाही असे वेतन पथकातील कर्मचारी सांगतात. तरी माध्यमिक संचालक साहेबांनी, राज्याच्या उपसचीव यांनी ज्यांचे मागील न मिळालेल्या ऑक्टाेंबर पासूनच्या महिन्यांचे पगार बिले ऑफलाईन पध्दतीने अदा करणेचा आदेश काढावा, ही आम्हा शिक्षकांना कळकळीची विनंती आहे.