‘‘प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपलं एक सुंदर चार खोल्यांचं घर असावं, माझंही होतं. आज ते सत्यात आलं. घर बांधून झालं अगदी प्रशस्त मोठय़ा खोल्यांचं, प्रत्येक खोलीत अगदी आरामात चार जण राहतील, अशा एक – दोन खोल्या नाही तब्ब्ल चार खोल्याचं दुमजली घर आणि त्यावर एक मोठी गच्ची सुद्धा आहे. जिथे मी एक छान लाकडाचा मोठा झोपाळा घेऊन रात्रीच्या प्रखर चांदण्याच्या उजेडात डिम लाईट मध्ये आरामात पुस्तक वाचत असेन, घरापुढे अंगण आणि अंगणात मुलांना खेळायला गार्डन. मागच्या अंगणामध्ये सजवता येईल अशी सुंदर फुलांची बाग.’’ हे सगळं मनीषा मला का सांगत होती हेच मला कळेना. पण ती तिच्या सुंदर घरकुलामध्ये अगदी रममाण झाली होती. न राहून मी तिला म्हटलं,
‘‘मनीषा मुद्दय़ावर ये ना, मला अजून बरीच कामं आहेत गं..’’ शेवटी तिने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल. अगं वैदेही मी आज एका खूप मोठय़ा पेचात आहे.’’
‘‘पेच? कसला?’’ मी पुन्हा तिला उत्तरून विचार,
‘‘अगं घर बांधून झालं आणि आता घराचं नामकरण नको का करायला.’’
मनीषाच्या या प्रश्नावर मी कशा पद्धतीने व्यक्त होऊ हेच कळेना..
पण खरंच आहे, काही वेळेला आपण या पेचात नक्की पडतो नाव काय? मग ते कसलंही असोत. मुलांची, एखाद्या घरातल्या प्राण्याची, पक्षांची, मित्रांची टोपण नावं, एखाद्या वस्तूचं नावं ठेवण्याचा दिवस आला की थोडं गोंधळायला होतं. कारण ‘नाव’ हे पुन्हा आपल्याला बदलता येणार नाही ना. मग ते कशाचेही असोत. पण जर त्यात घराचे नाव असेल तर कठीणच.
आज आपण रस्त्यानी जाताना-येताना अनेक बंगले, प्रशस्त मोठय़ा इमारती पाहतो. त्या प्रत्येकाला आपली एक ओळख म्हणून नाव दिले जाते. मग ब-याचदा ते नाव, आपल्या आई – वडिलांच्या नावावरून असते. समजा जर मी माझ्या आजी-आजोबांच्या बाबतीत केले की ते घराला नाव काय देतील तर ते एखाद्या देवाचे नाव देतील. गुरुकृपा, विघ्नेश्वर, गजाजन अशी अनेक. समजा जर हाच विचार आई-बाबांच्या बाबतीत केला तर त्यांनी नाव काय दिलं असतं, ‘विजया-विष्णू’ किंवा ‘अंजली’ अशा काहीशा स्वरूपात ते नाव देतील. पण हेच सध्याच्या मॉडर्न पिढीला विचारलं तर ते सरळ सांगतील एक तर माझं नाव दे किंवा घरातल्या मंडळींची नावं घेऊन एक सुंदर नाव तयार करतील.
आहे ना गंमत या नावामध्ये, खरं तर हे सगळं भावनेच्या सागरात डुबलेलं असतं. जिथे आपलेपणा असतो तिथे या गोष्टी असतातच. हे झालं फक्त व्यक्तींच्या स्वभाव आणि पिढीतल्या अंतरांमुळे होणारी नावांची सरमिसळ. ब-याचदा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जे प्रसिद्ध आहे त्यावरून सुद्धा नाव ठेवले जाते. मग ते एखादे प्रेक्षणीय स्थळ असोत, एखादे देवस्थान असोत. याचं एक उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर, ठाणे परिसरातील एक प्रसिद्ध देवस्थान म्हणजे टिटवाळा आणि टिटवाळ्याचा गणपती. आसपास नजर फिरवताच लक्षात येते की, तिथे आजूबाजूला असलेल्या इमारतींची, घरांची नावे ही गणपतीच्या नावाने असतात. मंगलमूर्ती, चिंतामणी, विनायक. गणपतीची सगळीच नावं संपता अष्टविनायक असे सुद्धा नाव दिले जाते. एकंदरीतच घरबांधणी झाल्यावर घराचे नामकरण करण्याकडे अनेकांचा विशेष कल असलेला दिसून येतो.
कृपया नवीन घरांच्या नावाची यादी पाठवा
नावे पाठवा
घराच्या नावाची यादी