सर्वांना हवाहवासा वाटणारा चहा आरोग्याला हानिकारक असून ब्रँडेड कंपन्या भरमसाट नफा कमवण्यासाठी त्यात धोकादायक कीटकनाशके वापरत असल्याचा गौप्यस्फोट ‘ग्रीनपीस’ने केला आहे.
मुंबई- भारतात गरिबापासून श्रीमंतांपर्यंत चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. चहाचा कप ओठाला लावल्याशिवाय अनेकांना तरतरी येत नाही. असा सर्वांना हवाहवासा वाटणारा चहा आरोग्याला हानिकारक असून ब्रँडेड कंपन्या केवळ भरमसाट नफा कमवण्यासाठी त्यात धोकादायक कीटकनाशके वापरत असल्याचा गौप्यस्फोट ‘ग्रीनपीस’ने केला आहे.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, टाटा ग्लोबल बिव्हरेजेस लिमिटेड, वाघबकरी चहा, गुडरिक चहा, ट्विनिंग्ज, गोल्डन टिप्स, खो-चा, गिरनार, रॉयल गिरनार चहा आदी दिग्गज कंपन्यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
‘ग्रीनपीस’ या संस्थेने ‘ट्रबल ब्रुइंग’ नावाचा अहवाल सोमवारी प्रकाशित केला. यात संस्थेने जून २०१३ ते मे २०१४ या कालावधी दरम्यान देशातील चहा वितरक व उत्पादन करणा-या मुख्य ११ कंपन्यांपैकी ८ कंपन्यांच्या पाकिटात बंद असलेल्या चहाची तपासणी केली. त्या वेळी या चहात जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घातक ठरवलेल्या कीटकनाशकांचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे. तर देशात बंदी असलेल्या डीटीडी या कीटकनाशकाची ६७ टक्के नमुन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात भेसळ करण्यात आल्याचे दिसून आले.
तसेच टाटा, वाघबकरी आदी चहांमध्ये तर अतिशय धोकादायक व विषारी कीटकनाशकांचे अंश आढळले. तसेच डीडीटीसोबतच सॉगेनोफॉस्फरस, निओनिकोटीनॉइड आदी घातक विषारी कीटकनाशके आढळल्याचे उघड झाले.
४६ नमुन्यात ९४ टक्के कीटकनाशके
‘ग्रीनपीस’ संस्थेने केलेल्या तपासणीत देशातील बँड्रेड चहाच्या ४६ नमुन्यात ९४ टक्के कीटकनाशके सापडली. तर ५९ टक्के नमुन्यांमध्ये १० विविध कीटकनाशकांचे मिश्रण करून वापर करण्यात आला. २९ नमुन्यांमध्ये एका तरी कीटकनाशकांचे प्रमाण अधिकच आढळले. तर १८ नमुन्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात ही कीटकनाशके आढळली. ही सर्व तपासणी जर्मनीतील एका लॅबमध्ये करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या चहा कंपन्यांनी कीटकनाशकांचे प्रमाण असलेली चहापावडर तयार करणे टाळावे. पर्यावरण, ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करावा, असे आवाहनही ग्रीनपीसने केले.
” चायला ” !!मी तर समजत होतो “टाटा” टी तर लय भारी ,!!