स्मृतिभ्रंशाच्या आजाराने त्रस्त आजोबांकडे पाहून या आजारावर संशोधन करत डोंबिवलीतील एका डॉक्टर तरुणीने यावर औषध शोधून काढले आहे.
डोंबिवली- स्मृतिभ्रंशाच्या आजाराने त्रस्त आजोबांकडे पाहून या आजारावर संशोधन करत डोंबिवलीतील एका डॉक्टर तरुणीने यावर औषध शोधून काढले आहे. डॉ. स्वानंदा मोडक असे तिचे नाव असून अमेरिकेतील लँगॉन मेडिकल सेंटरमध्ये पाच वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर हे संशोधन पूर्ण केल्यानंतर तिला या औषधाचे पेटंटही मिळाले आहे.
भारताच्या एकूण लोकसंख्येच्या १ टक्का लोकांमध्ये स्मृतीभ्रंशाचा आजार आढळून येतो. मात्र यावर काहीही औषध उपलब्ध नसल्याने स्वानंदाने अमेरिकेत जाऊन याबाबत संशोधन केले. स्वानंदाचे शालेय शिक्षण डोंबिवलीतील मॉडेल शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण पेंढारकर आणि डी. वाय. पाटील कॉलेज येथे झाले आहे. त्यानंतर तिने इंग्लंड येथून बायोमेडिकल सायन्सचे शिक्षण घेतले. तसेच डॉक्टरेटही मिळविली. त्यानंतर पाच वष्रे संशोधन करुन स्मृतीभ्रंशावर औषध शोधण्यात तिला यश आले. स्वानंदाला या औषधासाठी इंग्लंड आणि अमेरिकेचे पेटंट मिळाले आहे.
अॅम्युलेस्ट या प्रथिनाच्या कमतरतेमुळे स्मृतिभ्रंश आजार बळावतो, असे लक्षात आल्यानंतर हे प्रथिन वाढविण्यासाठी तिने औषध शोधून काढले. कौतुकास्पद बाब म्हणजे, इतके महत्त्वाचे संशोधन केल्यानंतरही परदेशात मोठय़ा पगाराची नोकरी न स्वीकारता स्वानंदाने भारतातच राहून आपल्या या संशोधन आणि बुद्धिमत्तेचा फायदा देशाला कसा होईल? याचा विचार सुरू केला आहे.
स्वानंदाचे वडिल राजन मोडक हे वास्तूविशारद असून आई शिल्पा यांनी मास्टर्स इन केमिस्ट्रीचे शिक्षण घेतले आहे. तर भाऊ श्रीजीत हादेखील वास्तूविशारद असून या सर्वांचे आपल्या संशोधनात मोलाचे योगदान असल्याचे स्वानंदाने सांगितले. डोंबिवलीतल्या एका तरुणीने हा पराक्रम केल्याचे समजल्यानंतर डोंबिवलीकरांनी स्वानंदावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
need contact details, one of my friend father need to treatment on this………