गुजरातमध्ये मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाकडे कोणीही लक्ष देत नसल्याने काँग्रेसचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुंबई- गुजरातमध्ये मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाकडे कोणीही लक्ष देत नसल्याने काँग्रेसचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नितेश राणे यांनी गुजरातमधून आपला व्यवसाय बंद करून राज्यात परतावे लागलेल्या सातारा येथील शशिकांत फडतरे यांना घेऊन मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली.
या वेळी गुजरातमध्ये मराठी माणसावर अन्याय होत असून अशाच घटना आपल्या राज्यात घडल्या असत्या तर हाहाकार माजला असता, असे नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसावर गुजरातमध्ये अन्याय होऊ देणार नाही आणि जर अशा घटना घडत असतील तर त्या सहन केल्या जाणार नाहीत, असे आश्वासन देत फडतरे यांच्या प्रकरणाबाबत गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन नितेश राणे यांना दिले. या वेळी नितेश राणे यांनी याबाबतचे एक पत्रही मुख्यमंत्र्यांना दिले.
याबाबत सविस्तर माहिती पत्रकारांना देताना नितेश राणे बोलत होते. पुढे त्यांनी असेही सांगितले की, शशिकांत फडतरे गोध्रा येथे व्यवसाय करतात. परंतु क्षुल्लक कारणावरून तेथील सोनी बंधूंनी फडतरे यांना मारहाण करून त्यांना बळजबरीने व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले आहे.
पोलीसही फडतरे यांना न्याय देत नसल्याने ते आपल्या साता-यातील खटाव या मूळ गावी परतलेआहेत. व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या कुटुंबाची उपासमार सुरू आहे. याबाबत गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची आपण भेट घेणार असून मराठी माणसावर गुजरातमध्ये होणा-या अन्यायाची जाणीव मुख्यमंत्र्यांना करून द्यावी म्हणून देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतल्याचेही नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या शहर आणि ग्रामीण भागात अनेक गुजराती बांधव आपला व्यवसाय सुखनव करीत आहेत. त्यांना कोणीही त्रास दिलेला नाही. गुजराती बांधवांना येथे त्रास दिला असता तर आमच्यावर चौफेर टीका झाली असती, परंतु गुजरातमध्ये मराठी माणसावर होणा-या अन्यायाची दखल कोणीही घेतली नाही. आम्ही मराठी माणसावरील अन्याय सहन करणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी या वेळी दिला.
व्वा रे , शेर का बच्चा !!!