गोव्यातील वास्को रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद वावरणा-या समीर सारदाना या संशयित दहशतवादी युवकाची गोवा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी कसून चौकशी करत आहेत.
पणजी- गोव्यातील वास्को रेल्वे स्थानकाजवळ संशयास्पद वावरणा-या समीर सारदाना या संशयित दहशतवादी युवकाची गोवा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी कसून चौकशी करत आहेत. अटक करण्यात आलेला युवक हा निर्ढावलेला असल्याने योग्य माहिती तो देत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
समीरच्या प्राथमिक तपासात तो २००८ पासून आतापर्यंत तब्बल ३५ वेळा विदेशात जाऊन आला होता, असे स्पष्ट झाले आहे. हा युवक मूळ डेहराडून येथील असून; वारंवार विदेशात का जात होता आणि त्याचा खर्च कोण करत होता, याचाही तपास अधिकारी घेत आहेत.
मंगळवारी उशिरा रात्री वास्को रेल्वे पोलिसांनी समीर सारदाना याला ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी आणि गुरुवारी त्याची एटीएसने कसून चौकशी सुरू केली आहे. त्याला पणजीजवळच्या रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागातील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून; चोख आणि कडक पहारा ठेवण्यात आला आहे. त्याच्याकडून पाच पासपोर्ट आणि लॅपटॉपही हस्तगत करण्यात आले आहेत. तो सांगत असलेले समीर सारदाना हे नावही बनावट असल्याचा तपास अधिका-यांचा संशय आहे.
प्राथमिक तपासात समीर २००८ पासून आतापर्यंत व्हिएतनाम, कंबोडिया, जॉर्डन या देशांत वारंवार जाऊन आल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वत: व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असल्याचेही तो सांगत असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही दिवस त्याचे वास्तव्य वास्को येथील रेल्वे स्थानकाच्या वेटिंगरूममध्ये होते. तेथील रेल्वे सुरक्षारक्षकांना आपले नाव एटीएसला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती, असे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी अनेक वेळा तो गोव्यात येऊन गेला आहे; मात्र, त्या वेळी तो ऑनलाईन हॉटेलची खोली आरक्षित करत असे. याच वेळी आठवडाभर तो रेल्वे स्थानकाच्या वेटिंगरूममध्ये वास्तव्य करून का राहिला, याचे कारणही तपास अधिकारी शोधत आहेत.
‘इसीस’ या जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटनेच्या कारवाया विश्वभरात वाढलेल्या असताना जगात ख्यातकीर्त पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात एक संशयित युवक जाळ्यात सापडल्याने ‘इसीस’चा गोव्यातही वावर आहे का? असा संशय व्यक्त होत आहे. या दृष्टीनेही तपास सुरू आहे. समीर सारदाना याच्या चौकशीसाठी नवी दिल्लीतून दहशतवादीविरोधी पथकाचे वरिष्ठ अधिकारी गोव्यात दाखल झाले आहेत. तपास अत्यंत गुप्त ठेवण्यात येत आहे.
Thanks for the great info dog I owe you bigtigy.