‘दुनियादारी’ चित्रपटाजागी शाहरूखचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ प्रदर्शित करण्याचा डाव सिंगल स्क्रीन चित्रपटगृह मालकांनी रचल्याचा आव आणत त्यांना आधीच इशारे देण्याची नको ती दुनियादारी मनसेने सुरू केल्याचे समोर आले आहे.
मुंबई – तुफान गर्दीत सुरू असलेल्या ‘दुनियादारी’ चित्रपटाजागी शाहरूखचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ प्रदर्शित करण्याचा डाव सिंगल स्क्रीन चित्रपटगृह मालकांनी रचल्याचा आव आणत त्यांना आधीच इशारे देण्याची नको ती दुनियादारी मनसेने सुरू केल्याचे समोर आले आहे. आठ ऑगस्टला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणा-या ‘चेन्नई एक्सप्रेस’मुळे दुनियादारीचा बॅनर खाली उतरवण्याचा कोणताही निर्णय चित्रपटगृहांच्या मालकांकडून झालेला नसून, तशी कोणतीही कल्पना दुनियादारीच्या निर्मात्यांना व कलावंतांना नसल्याने मनसेची ही मराठीप्रेमाची स्टंटबाजी उघड झाली आहे.
सध्या तिकीट बारीवर गर्दी खेचणा-या ‘दुनियादारी’ चित्रपटाजागी शाहरूख खानचा ‘चेन्नई एक्सप्रेस’हा चित्रपट प्रदर्शित केल्यास राज्यात एकही शो होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. शाहरूख खानच्या चेन्नई एक्सप्रेससाठी सध्या प्रचंड गर्दी खेचणारा मराठी चित्रपट ‘दुनियादारी’हा चित्रपट काढून टाकण्याच्या सूचना निर्मात्यांकडून मिळाल्यानंतर आपण हा इशारा दिला असल्याचे खोपकर यांनी सांगितले.
दुनियादारीचे आतापर्यंत ४५० पेक्षा अधिक शो झाले असून चित्रपटगृह मालकांना हा चित्रपट खाली उतरविण्याची कोणतीही घाई नाही. मायबाप रसिकांच्या प्रेमामुळे चित्रपट हाउसफुल्ल चालला आहे. परंतु मराठी चित्रपटांसाठी काही करायचे नाही आणि हाउसफुल्ल चाललेल्या चित्रपटांच्या नावावर स्टंटबाजी करणा-या मनसेच्या या आंदोलनाची कल्पना दुनियादारीच्या टीमलाही नव्हती. दुनियादारी हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा ठरला. ज्या पद्धतीने राज्यात या चित्रपटाला प्रतिसाद मिळत आहे, तो पाहता अशा प्रकारच्या कोणत्याही आंदोलनाची गरज आहे, असे मला वाटत नसल्याचे दुनियादारी चित्रपटातील अभिनेता सुशांत शेलार यांनी सांगितले आहे. तसेच, या आंदोलनाची आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
super job PRAHAR. nahitar ajun dekhil manat vatat hote ki kharach mns duniyasari sathi zattoy.