पोलिस अधिका-याला मारहाण झाल्याच्या कारणावरून ‘सळो की पळो’ अशी अवस्था झालेल्या आमदारांच्या मदतीसाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे सरसावले आहेत.
मुंबई- पोलिस अधिका-याला मारहाण झाल्याच्या कारणावरून ‘सळो की पळो’ अशी अवस्था झालेल्या आमदारांच्या मदतीसाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे सरसावले आहेत. आमदारांविरोधात टीकेचा सूर लावला जात असताना विरोधक आणि सत्ताधारीही शांत असल्याने ते हतबल झाले होते. मात्र गुरुवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनासाठी धडाक्यात एन्ट्री करणा-या राणेंनी आमदारांच्या बाजूने आवाज उठवल्याने सर्व सदस्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. इतकेच नाही तर ‘प्रसंगाला बेधडकपणे भिडणारा एकच वाघ, नारायण राणे! अशी प्रतिक्रिया सभागृहात उमटल्याने लोकप्रतिनिधींतही आत्मविश्वास भरला आहे.
पोलिसाला मारहाण झाल्याप्रकरणी बुधवारी पाच सदस्यांना विधानसभेत निलंबित करण्यात आले. त्याबद्दल काही आमदारांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना हवी तशी साथ मिळाली नाही. मारहाणप्रकरणी आमदारांवर कारवाई झाली. पण विधान भवनाच्या आवारात अटक करण्यासाठी बेकायदा घुसणा-या पोलिसांचे काय, वृत्तवाहिन्यांवर आमदारांना मवाली, राडेबाज संबोधले जात होते, त्याचे काय? आदी अनेक सवाल आमदारांच्या मनात होते. आमदारांच्या मनातील या सर्व प्रश्नांना राणे यांनी सडेतोड भाषेत वाचा फोडल्यानंतर आमदारांनी त्यांच्यावर सभागृहात व सभागृहाबाहेर अभिनंदनाचा वर्षाव केला. यामध्ये सर्वपक्षीय आमदारही होते. राणे त्यांचे भाषण संपवून खाली बसल्यानंतर अनेक आमदारांनी चिठ्ठय़ा पाठवून त्यांना धन्यवाद दिले. सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर राणे त्यांच्या दालनात गेल्यावरही सर्वपक्षीय आमदारांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली. प्रत्येकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘तुमच्यासारखा खंबीर माणूस या सभागृहात आहे हे दिसून आले. आमच्या सर्वाच्या मनात ज्या भावनांची खदखद होती तिला तुम्ही वाचा फोडलीत.’ भाजपचे उदगीर येथील आमदार सुधाकर भालेकर म्हणाले, ‘खरच एकच वाघ, नारायण राणे इतकेच म्हणता येईल. आमदारांवर मोठय़ा प्रमाणात टीका होत असताना त्याच्याविरोधात कुणीही बोलायला तयार नव्हते. राणे मात्र सर्वाच्या बाजूने उभे राहिल्याने आता आम्हाला हिंमत आली आहे. ‘काँग्रेसचे माणिकराव कोकाटे म्हणाले, ‘प्रसारमाध्यमांच्या दबावाखाली कुणीही बोलण्यास तयार नव्हते. सर्व जण मूग गिळून गप्प होते. आमदारांना मवाली, चोर, राडेबाज म्हटले जाऊनही कुणाचेही रक्त खवळत नव्हते. पण नारायण राणेंमुळे सर्व आमदारांचा आवाज उठला असून, आत्मविश्वास जागा झाला. आता जे अधिकारी बेकायदा विधान भवनात घुसले त्यांच्याविरोधात व आमदारांशी ‘उद्धट’ वागणा-या सचिन सूर्यवंशींविरोधात कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असाच सूर उमटत आहे. शिवसेनेचे तरुण आमदार अभिजित अडसूळ यांनीही नारायण राणे यांची भेट घेऊन आभार मानले. ते म्हणाले, ‘कोणतीही शहानिशा न करता आमच्यासारख्या तरुण आमदारांवर प्रसारमाध्यमांतून बेछूट आरोप केले गेले.
[EPSB]
लोकप्रतिनिधी मवाली आहेत काय? »
विधिमंडळातील आमदारांवर गेली दोन दिवस केलेल्या चिखलफेकीला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी सडेतोड उत्तर दिले.
[/EPSB]
या आरोपांमुळे आमचे कुटुंब दोन दिवस व्यथित झाले आहे. मी आणि संजय कुटे यांची नावेही ‘एफआयआर’मध्ये नाहीत. तरीही आम्हाला राडेबाज ठरवण्यात आले. नारायण राणे यांनी मांडलेल्या भूमिकेने आम्हाला आधार मिळाला आहे.’ तसेच अपक्ष आमदार जयकुमार गो-हे, मामा घटनदाट, शिरीष कोतवाल, काँग्रेसचे कालिदास कोळंबकर, सुरेश नवले, मधू चव्हाण, डॉ. कल्याण काळे, राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे आदी आमदारांनी राणे यांना भेटून धन्यवाद दिले. दुपारपर्यंत आमदार गटागटाने भेटून राणे यांचे आभार मानत होते.
प्रहार भूषण-उद्योगमंत्री नारायण राणे — येत्या ३० मार्च रोजी मुंबईत पहिल्या-वहिल्या ‘प्रहार भूषण’ सन्मानांचे समारंभपूर्वक वितरण होईल. यासाठी निवड झालेल्या ‘प्रहार भूषण’ सन्मानमूर्तीची ही ओळख