मुंबईतील रस्ते कंत्राट कामांमधील घोटाळा उघड झाल्यानंतर भ्रष्टाचार करणा-या सहा कंपन्यांना काळया यादीत टाकून त्याविरोधात पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई- मुंबईतील रस्ते कंत्राट कामांमधील घोटाळा उघड झाल्यानंतर भ्रष्टाचार करणा-या सहा कंपन्यांना काळया यादीत टाकून त्याविरोधात पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तरीही या यादीतील दोन कंपन्यांना मुंबईतील चार उड्डाणपुलांची कामे देण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे.
फौजदारी गुन्हा दाखल झालेल्या आर.पी.एस इन्फ्राप्रोजेक्ट आणि जे. कुमार या दोन कंपन्यांना चार उड्डाणपुलांची कामे देण्यात येत असून याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवले आहेत.
मुंबईतील नालेसफाईपाठोपाठ रस्ते भ्रष्टाचार बाहेर आला आहे. या रस्ते घोटाळयाप्रकरणी जे. कुमार, आर.पी.एस इन्फ्राप्रोजेक्ट, महावीर, रेलकॉन, आर. के. मधाणी आणि के. आर. कन्स्ट्रक्शन या ६ कंत्राटदारांना काळया यादीत टाकले आहे. या प्रकरणी या सहा कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
तत्कालीन रस्ते प्रमुख अभियंता अशोक पवार यांना निलंबित केले. मात्र, या सहा कंपन्यांविरोधात कारवाई केली जात असतानाच या अंधेरी पश्चिम येथील कवठे खाडीच्या पश्चिम दिशेला असलेल्या यारी रोड आणि लोखंडवाला बॅक रोड जंक्शन येथे अमरनाथ टॉवर बिल्डिंगजवळ वाहतूक पूल बांधण्याचे कंत्राट जे. कुमार या कंपनीला देण्यात येत आहे.
६० कोटी रुपयांच्या या कंत्राट निविदेमध्ये या कंपनीची निवड प्रशासनाने करून त्यांना काम देण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच शिवदास चापसी मार्गावरील हॅकॉक पुलाच्या पुनर्बाधणीचे कामही जे. कुमार या कंपनीला देण्यात येत आहे. विक्रोळी रेल्वे स्टेशन येथील लेवल क्रॉसिंग क्रमांक १४ सी येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्याबाबत तसेच सांताक्रुझ पूर्व विभागातील मिठी नदीवरील ड्राईव्ह इन थिएटर जवळील पुलाचे रुंदीकरण आणि पुनर्बाधणी करण्याचे काम आर.पी.एस. इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीला देण्यात येत आहे.
ही दोन्ही कामे अनुक्रमे ५५.२४ कोटी आणि ५६.१३ कोटी रुपयांना आर.पी.एस. इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीने मिळवली आहेत. या चारही पुलांसाठी काळया यादीतील जे. कुमार आणि आर.पी.एस इन्फ्राप्रोजेक्ट या कंपन्या पात्र ठरल्यामुळे प्रशासनाने कंत्राट कामांसाठी या कंपन्यांची निवड करून त्यांचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी पाठवले आहेत.
या दोन्ही कंपन्यांना त्यांच्यावर कारवाई होण्यापूर्वी निविदेत भाग घेतल्यानंतर ते पात्र ठरल्यामुळे कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासन हा प्रस्ताव मागे घेते की सत्ताधारी पक्ष हा प्रस्ताव मंजूर करून काळ्या यादीतील कंत्राटदारांना मदत करते याकडे सर्वाचे लक्ष आहे.
दुस-या क्रमांकावरील कंपन्याही काळया यादीतीलच
पहिल्या क्रमांकावरील कंत्राट कंपन्या या काळया यादीतील असल्यास प्रशासन, स्थायी समितीच्या सूचनेनुसार दुस-या क्रमांकावरील कंपनीला काम देण्याची शिफारस करू शकते. परंतु या कंत्राट कामांपैकी अंधेरी पश्चिम येथील उड्डाणपुलाच्या कामात दुस-या क्रमांकावर आर.पी.एस. इन्फ्राप्रोजेक्ट कंपनी आहे, तर तिस-या क्रमांकावर आर. के. मधानी आणि कंपनी आहे. त्यामुळे या पुलासाठी नव्यानेच निविदा मागावी लागणार आहे. त्यामुळे हे काम रखडण्याची शक्यता आहे.
हॅँकॉक पुलाच्या पुनर्बाधणीत दुस-या क्रमांकावर जी.पी.टी इन्फ्राप्रोजेक्ट कंपनी आहे. ही कंपनी नवीन आहे. तसेच हे काम मिळवणारी जे. कुमार आणि दुस-या क्रमांकावरील जी.पी.टी या कंपन्यांनी अनुक्रमे अंदाजित खर्चापेक्षा ५४ आणि ५६ टक्के अधिक बोली लावून कामे मिळवली आहे. त्यामुळे ही कामे रखडण्याची जाण्याची शक्यता आहे विक्रोळी रेल्वे उड्डाणपुलाचे काम आर.पी.एस इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीला मिळाले तरी दुस-या क्रमांकावर जे. कुमार आणि तिस-या क्रमांकावर ए.बी. इन्फ्राबिल्ट कंपनी आहेत.
या तिस-या कंपनीने अंदाजित खर्चापेक्षा ४१ टक्के अधिक बोली लावली आहे. त्यामुळे या कंपनीला काम देण्याऐवजी नव्याने निविदा मागवणे योग्य ठरणार आहे. तर मिठी नदीवरील पुलाचे रुंदीकरण व पुनर्बाधणीच्या काम आर.पी.एस इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीला मिळाले असले तरी दुस-या क्रमाकावर आर. के. मधानी आणि कंपनी, तिस-या क्रमांकावर राम बिल्डर, चौथ्या क्रमांकावर जे. कुमार आणि पाचव्या क्रमांकावर रेलकॉन या कंपन्या आहेत. त्यामुळे एकमेव राम बिल्डर ही कंपनी आहे. परंतु त्यांच्याकडे त्याचा अनुभव नसल्यामुळे नव्याने निविदा मागवावे लागणार आहे. परिणामी या चारही पुलांची कामे रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुलांची कामे आणि निवड केलेले कंत्राटदार
» यारी रोड आणि लोखंडवाला बॅक रोड जंक्शन पूल
कंत्राट मूल्य : ६०.७४ कोटी
कंत्राट कंपनी : जे. कुमार
» शिवदास चापसी मार्गावरील हॅकॉक पूल
कंत्राट मूल्य : ५५.१४ कोटी
कंत्राट कंपनी : जे. कुमार
» विक्रोळी रेल्वे स्टेशन येथील लेवर क्रॉसिंग क्रमांक १४ सी रेल्वे पूल
कंत्राट मूल्य : ५५.२४ कोटी
कंत्राट कंपनी : आर.पी.एस इन्फ्राप्रोजेक्ट
» मिठी नदीवरील ड्राईव्ह इन थिएटरजवळील पुलाचे रुंदीकरण व पुनर्बाधणी
कंत्राट मूल्य : ५६.१३ कोटी
कंत्राट कंपनी : आर.पी.एस इन्फ्राप्रोजेक्ट
शिवसेनेचे खरे रूप बाहेर काढा राणे साहेब. सोडू नका