‘ज्यांना राज्यातील जनतेने रोजगारमुक्त केले त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळू नयेत,’ अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केली आहे.
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली ‘मोदीमुक्त भारता’ची घोषणा भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. ‘ज्यांना राज्यातील जनतेने रोजगारमुक्त केले त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळू नयेत,’ अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केली आहे.
‘मोदीमुक्त भारत’ जरा जास्तच झाले. राज यांनी त्यांचा स्तर पाहून बोलावे, असा सल्लाही शेलार यांनी दिला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. पूर्वी राज यांच्या भाषणावर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव दिसायचा, आता त्यांच्यावर शरद पवार यांचा प्रभाव दिसून येतो, असा टोला शेलार यांनी हाणला. विधानसभा ‘मनसेमुक्त’ झाली, मुंबई महापालिकेतील उरले-सुरलेले नगरसेवकही पळून गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही राज यांच्यावर सडकून टीका केली. पराभूत मानसिकतेतून राज यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. ‘मोदीमुक्त भारत’ करण्याआधीच महाराष्ट्राने त्यांना ‘मनसेमुक्त’ केल्याची टीका भातखळकर यांनी केली. ज्यांनी यांचे नगरसेवक पळविले, त्यांच्यावर टीका केली नाही आणि ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली जात आहेत. ‘मोदीमुक्त भारत’ करण्यासाठी यांच्याकडे नेते तरी आहेत का? असा सवालही त्यांनी केला.
काय बोलले होते राज ठाकरे?
गुजरात दौ-यावर असताना नरेंद्र मोदींनी माझ्यासमोर चांगले चित्र उभे केले, मात्र, ते सगळे खोटे होते. आता मोदींचा खरा चेहरा माझ्यासमोर आला आहे. भारताला १९४७ साली पहिले स्वातंत्र्य मिळाले, दुसरे स्वातंत्र्य १९७७ साली मिळाले आणि आता २०१९ साली भारताला तिस-या स्वातंत्र्याची गरज आहे. मोदीमुक्त भारत करा, मोदी मुक्त भारत व्हायला हवा. मोदींच्या परदेश दौ-यातून एकही रुपया भारतात आला नाही. मोदी हे केवळ खोटे बोलणारे नेते आहेत. ते जर पुन्हा सत्तेत आले तर देशाची आणखी वाट लागेल. त्यामुळे आता मोदीमुक्त भारतासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे जाहीर आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
मोदी मुक्त भारत Good Joke .
असे फक्त पराभूत पक्षाच्या लोकांनाच वाटतंय … सामान्य नागरिकांना नाही.