गेल्या ११ वर्षात फाशी देण्यात आलेला याकूब चौथा गुन्हेगार ठरला आहे.
नवी दिल्ली – २५७ निष्पाप जीवांचे बळी घेणा-या १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला गुरुवारी अखेर फाशी देण्यात आली. सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी त्याला फासावर लटकवण्यात आले. तर सात वाजून १ मिनिटांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. गेल्या ११ वर्षात फाशी देण्यात आलेला याकूब चौथा गुन्हेगार ठरला आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेल्या माहितीनुसार २००४ ते २०१३ या दहा वर्षात तब्बल एक हजार ३०३ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र या कालावधीत केवळ तीन दोषींना फाशी देण्यात आली. २००४ मध्ये पश्चिम बंगाल, २०१२ मध्ये महाराष्ट्र आणि २०१३ मध्ये दिल्लीत फाशी देण्यात आली.
गेल्या ११ वर्षात फाशी देण्यात आलेले गुन्हेगार
१४ ऑगस्ट २००४ – पश्चिम बंगालच्या अलिपोर मध्यवर्ती कारागृहात धनंजय चॅटर्जीला त्याच्या ४२ व्या वाढदिवसादिवशी फाशीची शिक्षा देण्यात आली. अल्पवयीन मुलीवर बलात्कार तसेच तिची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता.
२१ नोव्हेंबर २०१२ – २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अटक झालेल्या एकमेव मोहम्मद अजमल कसाब या दहशतवाद्याला फाशी देण्यात आली. पुण्यातील येरवाडा तुरुंगात त्याला फासावर लटकवण्यात आले.
नऊ फेब्रुवारी २०१३ – २००१ मधील संसदेवर हल्ला प्रकरणातील दोषी मोहम्मद अफजल गुरुला दिल्लीतील तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली.
३० जुलै २०१५- १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला फाशी देण्यात आली. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात याकूबला फासावर लटकवण्यात आले.
२००४ ते २०१३ या दहा वर्षात तीन हजार ७५१ जणांच्या फाशीच्या शिक्षेचे रुपांतर आजन्म कारावासात करण्यात आले.
२००७ मध्ये सर्वाधिक मृत्युदंडाच्या शिक्षांची सुनावणी
२००७ या वर्षात न्यायालयाने सर्वाधिक १८६ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यापाठोपाठ २००५ मध्ये १६४ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर २००५ मध्ये एक हजार २४१ जणांना देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करण्यात आले होते. उत्तर प्रदेश या राज्यात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची संख्या अधिक आहे. गेल्या दहा वर्षात उत्तर प्रदेशात ३१८, महाराष्ट्र १०८, कर्नाटक १०७, बिहार १०५ आणि मध्य प्रदेशात १०४ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
अहो जरा सौदी अरेबिया या देशाचे अनुकरण करा ,खूप गुन्हे कमी होतील ,