भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे समालोचन करण्यासाठी इंग्लंडमध्ये असलेले लिटल मास्टर सुनील गावस्कर रविवारी अपघातातून बालबाल बचावले.
लंडन – भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे समालोचन करण्यासाठी इंग्लंडमध्ये असलेले लिटल मास्टर सुनील गावस्कर रविवारी अपघातातून बालबाल बचावले. चौथा कसोटी सामना संपल्यानंतर मँचेस्टरहून लंडनला जात असताना गावस्कर यांच्या गाडीला अपघात झाला होता.
सामना संपल्यानंतर जॅग्वार कारमधून गावस्कर, समालोचक मार्क निकोलेस आणि चंद्रशेखर पटेल लंडनला जाण्यासाठी निघाले. गावस्कर डाव्या बाजूला तर, निकोलेस चालकाच्या शेजारी बसले होते. पावसामुळे रस्ते निसरडे झालेले असूनही गावस्कर यांची गाडी वेगात पळत होती. त्याचवेळी समोरुन वेगात आलेल्या गाडीने गावस्कर यांच्या गाडीला बाजूने धडक दिली.
गावस्कर किंचाळल्याने डुलक्या घेणारा चालक भानावर आला आणि त्याने समोरुन होणारी गाडीची धडक टाळली. अन्यथा हा भीषण अपघात ठरला असता. गावस्कर बसलेल्या जॅग्वार कारचे या अपघातात बरेच नुकसान झाले मात्र गाडीतील सर्व प्रवाशांचे जीव वाचले.
हा अपघात झाला त्यावेळी गावस्कर गाडीत पेपर वाचत होते रस्ते निसरडे असल्याने गाडी वेगाने पळवू नको असे त्यांनी चालकाला बजावले होते. तरीही चालक वेगाने गाडी पळवत होता. अपघाताच्यावेळी निकोलेस आणि पटेल झोपेत होते.
हा अनुभव खूप भितीदायक होता मात्र देवाने आम्हाला वाचवले असे गावस्करांनी सांगितले. अपघातानंतर तिघांनी ईस्ट मिडलॅंण्ड पार्क रेल्वे स्थानकातून लंडनला जाणारी ट्रेन पकडली. गावस्कर स्काय स्पोटर्ससाठी समालोचन करतात.
श्री, गणपती बाप्पा पावला ! असे म्हणावे लागेल !!!