देशात सर्वात मोठी वाहन उत्पादक मात्र तरीही मंदी आणि महागाईशी संघर्ष करणा-या टाटा मोटर्सला लक्झरी मोटारींनी तारले आहे.
नवी दिल्ली– देशात सर्वात मोठी वाहन उत्पादक मात्र तरीही मंदी आणि महागाईशी संघर्ष करणा-या टाटा मोटर्सला लक्झरी मोटारींनी तारले आहे. जग्वार आणि लँड रोव्हरच्या विक्रीने डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात तिप्पट वाढ झाली. या तिमाहीत ४८०५ कोटींचा नफा मिळाला असून यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत १९५ टक्क्यांची वृद्धी झाली.
एकीकडे देशांतर्गत स्थिती बिकट झाल्याने कंपनीच्या मोटार आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे. मात्र याच काळात ब्राझील, चीन आणि अमेरिका या देशांमधील जग्वारची विक्री वाढल्याने कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. विक्रीत ३८.६ टक्क्यांची वाढ झाली असून ६३,५३६.०६ कोटींचा महसूल मिळाला असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १,६३० कोटींचा नफा झाला होता. सध्या देशांतर्गत बाजारपेठेवर मंदीचा प्रभाव असून तो आणखी काही काळ राहण्याची शक्यता मुख्य वित्तीय अधिकारी सी. रामकृष्णन यांनी व्यक्त केली. विक्रीला चालना देण्यासाठी कंपनीने गेल्याच आठवड्यात ऑटो एक्स्पोमध्ये ‘बोल्ट’ आणि ‘झेस्ट’ या दोन पेट्रोलवरील मोटारी सादर केल्या. पुढच्या सहा महिन्यांत या बाजारात उपलब्ध केल्या जाणार आहेत.
गेल्याच महिन्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांचा बँकॉकमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. कंपनीच्या मोटारींना नवी झळाळी देण्यासाठी स्लिम यांच्या संकल्पनेतून होरायझन नेक्स्ट हा उपक्रम राबवण्यात आला. त्यालाही ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान स्लिम यांच्या निधनामुळे जागतिक व्यवहार सांभाळण्यासाठी कंपनीचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.
‘जग्वार’ ठरतेय तारणहार
२००८ मध्ये ब्रिटिश लक्झरी ब्रँड जग्वारला टाटांनी खरेदी केले होते. हीच कंपनी टाटा मोटर्ससाठी सध्या तारणहार ठरत आहे. गेल्या दोन वर्षापासून जग्वार आणि लँड रोव्हरच्या विक्रीतून टाटा मोटर्सला सावरले आहे. २०१३ मध्ये जगभरात ४,२५,००६ जग्वार, लँड रोव्हर आणि एसयूव्ही मोटारींची विक्रमी विक्री करण्यात आली. तर डिसेंबरच्या तिमाहीत १,१६,३५७ जग्वार आणि लँड रोव्हर मोटारींची विक्री करण्यात आली. देशांतर्गतही या मोटारींना चांगली मागणी असून यापुढेही ती कायम राहील, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
This is real international approach in business. All other companies also should try to earn profit through their external activities.
Bravo TATA SONS….