अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवारी पुण्यात हत्या करण्यात आली.
ओंकारेश्वर मंदिराजवळील पुलावर सकाळी साडेसातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात मारेक-यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पुरोगामी चळवळीचे अध्वर्यू राहिलेले डॉ. दाभोलकर यांच्या हत्येने पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला.
दाभोलकर यांच्या पश्चात पत्नी शैला, मुलगा डॉ. हमीद, मुलगी मुक्ता, नातवंडे असा परिवार आहे. सातारा येथे रात्री नऊच्या सुमारास दाभोलकरांच्या पार्थिवाला त्यांची कन्या मुक्ता यांनी भडाग्नी दिला.
डोक्यात गोळ्या लागल्याने मृत्यू
डॉ. दाभोलकर हे ओंकारेश्वर मंदिराजवळील पुलावर ‘मॉर्निंग वॉक’साठी गेले असताना स्प्लेंडर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी दाभोलकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्यात घुसल्या. गोळ्या लागल्यामुळे ते घटनास्थळीच कोसळले.
गोळीबार केल्यावर हल्लेखोर दुचाकीवरून रविवार पेठेच्या दिशेने पसार झाले. दाभोलकरांच्या मानेच्या वरच्या बाजूला डोक्यात गोळ्या लागल्याने मोठया प्रमाणात रक्तस्रव झाला. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. ही बातमी महाराष्ट्रभर पसरली आणि अवघा महाराष्ट्र सुन्न झाला.
पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीच्या सहाय्याने मारेक-याचे रेखाचित्र प्रसिद्ध केले. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळापासून जवळ असलेल्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत. यातील एका इमारतीच्या फुटेजमध्ये सकाळी ७.१४ वाजता दोन जण दुचाकीवरून जात असल्याचे दिसत आहेत.
आज पुणे ‘बंद’
डॉ. दाभोलकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील सर्व राजकीय पक्षांनी बुधवारी पुणे बंद पुकारला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना काही दिवसांपासून धमकीचे फोन येत असल्याची माहिती अंनिसचे प्रदेशाध्यक्ष अविनाश पाटील यांनी पुण्यात दिली. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही याला दुजोरा दिला असून मारेक-यांची माहिती देणा-यास दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
‘प्रहार’च्या पुनर्भेटीची इच्छा अधुरी
यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या पूर्वसंध्येला डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी ‘प्रहार’च्या कार्यालयाला भेट दिली होती. या वेळच्या अधिवेशनातही जादूटोणाविरोधी विधेयक संमत न झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करतानाच आझाद मैदानात निदर्शनांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मी ‘प्रहार’बद्दल खूप लोकांकडून ऐकतो, मुंबईत आल्यावर तुमचा अंक आवर्जून पाहतो. तुम्ही पुण्यात लवकर आवृत्ती सुरू करा, असेही त्यांनी सांगितले होते. डॉ. दाभोलकरांनी अचानक भेट दिल्याने त्या वेळी त्यांना संपादक महेश म्हात्रे यांच्याशी संवाद साधता आला नव्हता. तेव्हा त्यांनी जाता जाता प्रहारला पुन्हा आवर्जून भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता ही इच्छा कधीच पूर्ण होऊ शकणार नसल्याने ‘प्रहार’ परिवारासही हूरहूर लागून राहिली आहे.
चीड आणणारे कृत्य
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा प्रकार अत्यंत निंदनीय असून याचा मी निषेध करतो. ज्या व्यक्तीने आपल्या विचारांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून समाज सुधारणेचे काम केले, त्या व्यक्तीची हत्या होणे हे सत्तारूढ आघाडीला शोभा देणारे नाही. हा प्रकार चीड आणणारा आहे.
– नारायण राणे, उद्योगमंत्री
घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असून गुन्हे शाखेला तपासाच्या योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तपासासाठी ६ टीम तयार करण्यात आल्या आहेत. मारेक-यांच्या दुचाकीचा क्रमांक मिळाला असून आरटीओकडे तो तपासासाठी दिला आहे. याबाबत कुणाला माहिती असल्यास ९९२३६९५३१५ किंवा ०२०-२६११२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच मारेक-यांची माहिती देणा-यास पुणे गुन्हे शाखेकडून एक लाखाचे बक्षीस देण्यात येईल.
– गुलाबराव पोळ, पुणे शहर पोलिस आयुक्त
अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर
दाभोलकरांची हत्या ही विवेकाची हत्या असून, त्यांना शांतपणे श्रद्धांजली वाहण्यात यावी, अशी विनंती दाभोलकर यांचे चिरंजीव हमीद यांनी केली. अंत्यदर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू, अभिनेते अमोल पालेकर, डॉ. मोहन धारिया, महापौर वैशाली बनकर आदींसह अंनिसचे कार्यकत्रे उपस्थित होते. पुणे येथून डॉ. दाभोळकर यांचे पार्थिव संध्याकाळी ५ च्या सुमारास त्यांच्या साता-यातील शाहूनगर येथील घरी आणण्यात आले. संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
[EPSB]
अंधश्रद्धेविरोधातील जागल्या
बाबाबुवांकडून नाडल्या जाणा-या महाराष्ट्रातील जनतेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची ज्ञानज्योत पेटावी आणि डोळसपणा जागृत व्हावा यासाठी जी नामवंत मंडळी कार्यरत आहेत त्या प्रभावळीत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे स्थान फार वरचे आहे. महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाचे कायद्यात रूपांतर करावे यासाठी त्यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्षे लढा देत आहे.
[/EPSB]
नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांची हत्या म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा गळा घोटणं हा गुन्हा आहे. दाभोलकर वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून समाजातील रुढी,अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी आग्रही राहिले आहेत. जादूटोणा विरोधी कायदा पारित व्हावा यासाठी त्यांनी कधीही अताताई भूमिका घेतली नाही. नेहमीच सामंजस्याने ते आपली भूमिका मांडत राहिले.- पृथ्वीराज चव्हाण,मुख्यमंत्री
महाराष्ट्राला शरमने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. समस्त जगाला संदेश देणारा महात्मा गांधींचा प्रवाह आजही महाराष्ट्रात आहे. त्याच प्रवाहातले दाभोलकर होते. जादूटोणा विरोधी कायदा करण्यासाठी दाभोलकरांनी आपले आयुष्य वेचले. मात्र राजकर्ते अंतर्मुख झाले नाहीत. राज्यकर्त्यांनी आपण नेमके काय करतो आहोत हे आवर्जून पहावे. त्यांना सत्येची शरम वाटली पाहिजे. महात्मा फुले यांच्या परंपरेला ही घटना लज्जास्पद आहे. जिथे सतीचा कायदा करणे शक्य आहे तिथे जादूटोणा विरोधी कायदा का होत नाही? डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अशा प्रकारे मृत्यू यावा ही बाब निंदनीय आहे. – एन.डी पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शेकापचे अध्यक्ष
नरेंद्र दाभोलकर यांच्या निधनाने सामाजिक विषयावर सातत्याने काम करणारा कार्यकर्ता हरपला आहे. आज दाभोळकरांसारखे कार्यकर्ते दिसत नाहीत. ते एखाद्या पक्षाच्या किंवा धर्माच्या विरोधात नव्हते. जादूटोणा विरोधी कायदा व्हावा हा त्यांचा आग्रह योग्यच होता.मात्र काही समाजकंटकांना त्यांचा हा आग्रहच आवडलेला नाही. अशा रितीने त्यांचा मृत्यू व्हावा हे दूर्दैवी आहे. – नरेंद्र चपळगावकर, निवृत्त न्यायमूर्ती
पुरोगामी महाराष्ट्र आता उरलेलाच नाही. दाभोलकरांची हत्या होणं हे दुर्दैवी आहे. – अनंत दिक्षीत, ज्येष्ठ पत्रकार
नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांना तात्काळ शोधून काढा. – अजित पवार, उपमुख्यमंत्री
नरेन्द्र दाभोलकरांच्या रक्ताच्या एका थेंबातुन हजार दाभोलकर निर्माण होतील