छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या सब-वेतील दुर्गंधी, घाणीकडे पालिकेचे लक्ष नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई- ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’चा नारा देणा-या पालिकेचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या सब-वेतील दुर्गंधी, घाणीकडे पालिकेचे लक्ष नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी पसरलेल्या घाणीमुळे चालणे कठीण होत असल्याची तक्रार प्रवाशांनी ‘प्रहार’कडे केली आहे. लवकरात लवकर स्वच्छता मोहीम हाती घेण्याच्या सूचनादेखील प्रवाशांनी पालिकेला दिल्या आहेत.
मुंबईत कामासाठी येणा-या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे सर्वात जास्त रहदारी असते. सीएसटीतून बाहेर पडण्यासाठी सब-वेचा वापर करण्यात येतो. रस्ता ओलांडून जाणे शक्य नसल्याने अनेक प्रवासी सब-वेचा वापर करतात. मात्र याच सब-वेमध्ये सध्या घाणीचे, दुर्गंधीचे साम्राज्य आहे. सीएसटीच्या प्रवेशद्वाराजवळ पानाच्या पिचका-या दिसतात. हे ओघळ सब-वेच्या मध्यापर्यंत पसरलेले असतात. वर्दळीच्या वेळेस असे घाण पाणी मध्येच येत असल्याने चालणे कठीण होते. अनेक वेळा तर प्रवासी यावरून घसरूनही पडले आहेत. सीएसटीच्या प्रवेशद्वारासह पालिकेकडे जाणारा मार्ग, ‘कॅनॉन’कडे जाणारा मार्ग या ठिकाणीदेखील कचरा साठून ‘ओव्हरफ्लो’ होण्याचा प्रकार पाहायला मिळतो.
कचरा साठवण्यासाठी ठेवलेल्या टाक्यांचा आकार पाहता सर्वात श्रीमंत असलेल्या पालिकेला ‘भिकेचे डोहाळे’ लागल्याचा अनुभव येतो. चाकरमान्यांसह सीएसटीला भेट देणा-या पर्यटकांची गर्दीसुद्धा तितकीच असते. स्वच्छतेची जबाबदारी सर्व नागरिकांची असली तरी पालिकेचे कर्तव्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. पालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाचे अधिकारी कर्तव्य बजावताना दिसत नसल्याचा आरोप नागरिकांच्या वतीने अनेक वेळा करण्यात येतो. आता तर पालिकेच्या नजरेसमोर असलेल्या सीएसटी स्थानकाच्या सब-वेचीदेखील बिकट अवस्था झाली आहे. सीएसटी परिसरात येणा-या अनेक पर्यटकांसमोर सब-वेचे असे चित्र असल्यास मुंबईची प्रतिमा ‘मलिन’ होण्यास वेळ लागणार नाही.
सब-वेचा वापर करताना समोरच अस्वच्छतेचे दर्शन होत असल्याने संताप होतो. विविध तंत्रज्ञान उपलब्ध असूनदेखील त्याचा वापर होत नसल्याने पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. प्रमुख सब-वेच्या आत पालिकेने स्वच्छता मोहीम राबवावी, ही अपेक्षा! – प्रमोद खापरे, प्रवासी
sarvant pratham paan khaoon pichkarya marnaryanchya tondant shen ghala,tenvach ardhiadhik mumbai saaf swachha hoil,!