भीमा कोरेगांव येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणात मनोहर (संभाजी) भिडे यांचा कोणताही सहभाग असल्याचे आतापर्यंत आढळून आले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.
मुंबई- भीमा कोरेगांव येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी मनोहर (संभाजी) भिडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. त्याबाबत तपास केला तसेच त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले. मात्र या प्रकरणात त्यांचा कोणताही सहभाग असल्याचे आतापर्यंत आढळून आले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी केला. भिडे यांच्याविरोधात कुठलेही पुरावे नसल्याने त्यांना अटक केलेली नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भिडे यांना क्लिनचीट दिली.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या गंभीर प्रश्नावर विरोधकांच्या वतीने नियम २९३ अन्वये दाखल केलेल्या स्थगन प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.
भीमा कोरेगांव येथे विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या दलितांवर हल्ला करत हिंसाचाराची घटना घडली. त्या अनुषंगाने एका महिलेने संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा पोलिसात तक्रार दाखल केली. ती तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. तसेच त्याचा तपास करण्यात आला. १ जानेवारीच्या आधी किंवा त्या दिवशीही संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगांव येथील स्थानिक जनतेशी संबध नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांचा कोणताही या घटनेशी संबध नसल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी एल्गार मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चाचे शिष्टमंडळ आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भेटायला आले होते. आंबेडकरांना ही बाब सांगितली आहे. त्यावेळी आंबेडकर यांनी या अनुषंगाने आणखी नवे पुरावे सादर करणार असल्याचे सांगत एका फेसबुक पोस्टवरील माहिती दिली. त्या अनुषंगानेही आणखी तपास करणार असल्याचे सांगत याबाबत ८ दिवसात कारवाई पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शेवटी सांगितले.
भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत क्लिन चीट दिलेली असल्याने भिडेंना अटक होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.
संभाजी भिडेंना क्लिनचीट आणि मिलिंद एकबोटेंचा राजकीय बळी दिला…..