राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर वस्तू व सेवा विधेयक (जीएसटी) सोमवारी लोकसभेत पुन्हा सादर केले जाणार आहे.
नवी दिल्ली- राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर वस्तू व सेवा विधेयक (जीएसटी) सोमवारी लोकसभेत पुन्हा सादर केले जाणार आहे. यासाठी कॉँग्रेसने सोमवारी आपल्या सर्व खासदारांसाठी व्हीप बजावला आहे, अशी माहिती पक्षाचे मुख्य प्रतोद ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.
काँग्रेसने जीएसटीबाबतच्या घटनात्मक सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा आम्ही गुणवत्तेनुसार दिला. या विधेयकातील सुधारणांना आम्ही समर्थन दिले. आमच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे, असे शिंदे म्हणाले.
लोकसभेत कॉँग्रेसचे सर्व खासदार उपस्थित राहावेत, यासाठी आम्ही ‘व्हीप’ जारी केला आहे. हे विधेयक आणण्याची पहिली कल्पना कॉँग्रेसची आहे.
आमचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशव्यापी एकच कर लागू करण्याचा संकल्प मांडला होता. सरकारने जीएटीबाबतचे घटनात्मक सुधारणा विधेयक २०११ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले होते. मात्र, गेल्या चार वर्षात भाजपा या विधेयकाबाबत एकमत बनवण्यात अपयशी ठरला.
गेल्या वर्षी हे विधेयक लोकसभेत भाजपाने मंजूर केले. मात्र, रालोआ सरकारचा लोकशाहीवर विश्वास नसल्याने विरोधकांशी त्यांनी चर्चाच केली नाही. त्यामुळे हे विधेयक प्रलंबित राहिले. आता हे विधेयक महत्त्वाचे असल्याची जाणीव त्यांना झाल्याने त्यात सुधारणा केल्या, असे शिंदे म्हणाले.
ते म्हणाले की, जीएसटीचा देशाला फायदा झाला पाहिजे. कॉँग्रेसची ही पहिल्यापासून भूमिका आहे. या विधेयकाला आमचा पाठिंबा आहेच. मात्र, त्याचा जनतेला काय फायदा होईल, याचा विश्वास सरकारने देणे गरजेचे आहे.
profestional tax nighun janar ka & ptrc che kai honar
GST ची माहिती देणारे पुस्तक आहे का असेल तर कोणते ओंलीने मिळेल का