मांडवी नदीचा काठ.. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेले कपडय़ांचे, पदार्थाचे, विविध कलात्मक वस्तूंचे स्टॉल्स.. ऑर्केस्ट्रा आणि डान्ससाठी बांधलेले मोठमोठे स्टेज.. त्या स्टेजवर कधी गरबा सादर केला जातो तर कधी महाराष्ट्रीय नृत्य. कुठेतरी चर्चासत्र सुरू असतं तर कुठेतरी एखादा चित्रपटाविषयीचा परिसंवाद.. थोडक्यात काय तर जिथे पाहाल तिथे केवळ एंटरटेन्मेंट, एंटरटेन्मेंट आणि एंटरटेन्मेंट.. उपस्थितांना काय पाहावं आणि काय नको असं होत होतं. निमित्त होतं ते इफ्फी फिल्म फेस्टिव्हलचं. या महोत्सवाची थीम ‘नॉर्थ-इस्ट सिनेमा’ अशी होती. त्यामुळे या थीमला साजेशे सगळे कलाप्रकार सादर करण्यात येत होते. त्यात आसामातील कपडे, ज्युट आणि इतर वस्तूंबरोबरच तिथल्या ‘थांग ता’ या नृत्याची झलकही पाहायला मिळत होती.
गेल्या दहा दिवसांपासून गोव्यात रंगलेल्या या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ची आज हॉलिवूडची प्रसिद्ध आणि ‘टुमारो नेव्हर डाइज’ फेम अभिनेत्री मिशेल येओ यांच्या हस्ते सांगता होणार आहे. त्या वेळी ‘सांगलू’ हा मार्शल नृत्य प्रकारही सादर केला जाणार आहे. तसंच दरम्यान या महोत्सवात कित्येक देशीच नव्हे तर परदेशी कलाकारांनी हजेरी लावली होती. या महोत्सवात जगातल्या कानाकोपऱ्यातील कित्येक चित्रपट दाखवण्यात आले. त्यात हिंदी, इंग्रजी, बंगली, काश्मिरी, मल्याळम, कुडुख या चित्रपटांसोबत मराठी चित्रपटही होते. या चित्रपटांनादेखील चित्रपटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी चित्रपटांना केवळ प्रतिसादच नव्हे तर त्यांचं कौतुकही मिळालं.
‘दुनियादारी’चं कौतुक
‘मराठी चित्रपटसृष्टीने आतापर्यंत अनेक आशयसंपन्न चित्रपटांची निर्मिती केली. दिवसेंदिवस यात वाढच होत आहे. मराठी चित्रपटांमध्ये झालेला हा आमूलाग्र बदल अतिशय स्तुत्यच आहे. मराठी चित्रपटात आशयधन चित्रपट असूनही चाकोरीपलीकडे जाण्याचा मराठी चित्रपटाने कधीच विचार केला नाही. मात्र त्याला कलाटणी दिली ती २००४ मध्ये आलेल्या ‘श्वास’ या चित्रपटाने. ‘श्वास’ हा पहिला मराठी चित्रपट होता, ज्याने थेट ऑस्करवारी केली आहे. त्यानंतरच मराठी चित्रपटांकडे बघण्याचा आणि अधिकाधिक आशयघन चित्रपट तयार करण्याकडे कल वाढला. त्यामुळे प्रेक्षकही आता मराठी चित्रपटाची दखल घेऊ लागले आहेत. संजय जाधव यांच्या ‘दुनियादारी’ या चित्रपटाचं उदाहरण घेता येईल. १९७०च्या दशकाची पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट होता. त्यात प्रेम, रोमान्स आणि मैत्री होती. प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे चित्रपटाचं मुख्य काम आहे. ते या चित्रपटाने केलं.’ अशा शब्दांत ‘एंटरटेन्मेट सोसायटी ऑफ गोवा’चे चेअरमन विष्णू वाघ यांनी दुनियादारी आणि मराठी चित्रपटसृष्टीचं कौतुक केलं.
याप्रसंगी ‘दुनियादारी’चे दिग्दर्शक संजय जाधव आणि त्यातील प्रमुख कलाकार स्वप्नील जोशी उपस्थित होते. जाधव म्हणाले ‘१९७० च्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट तयार केला होता. तरीदेखील तो हिट झाला.’ तर अभिनेता स्वप्नील जोशी म्हणतो, मला हा चित्रपट करून खूप समाधान मिळालं. दिग्दर्शकाला त्याच्या कथेविषयी आणि स्क्रिप्टविषयी आत्मविश्वास असेल तर अभिनेत्याला दिग्दर्शकाच्या सूचना पाळणं अतिशय सोपं जातं आणि तेच मी केलं.’
‘फ्रॅन्ड्री’ला उदंड प्रतिसाद
इंडियन पॅनोरमा या विभागात निवड झालेल्या ‘फॅन्ड्री’ या चित्रपटाचे अन्य चित्रपटांच्या तुलनेत तीन शो झाले. या तिन्ही शोजना ‘हाउसफुल्ल’ गर्दी करत देश-विदेशातील प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी ‘फ्रॅन्डी’ला पसंतीची पावती दिली. मराठी चित्रपटाची कक्षा ख-या अर्थाने विस्तारणारा हा सिनेमा दिग्दर्शक नागराज मंजुळेने साकारला आहे. नागराजच्या या पहिल्याच लघुपटाने राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली छाप उमटवली आहे. या चित्रपटाच्या यशाबाबत तो म्हणतो, ‘हा चित्रपट माझ्यासाठी केवळ चित्रपट नसून तो माझं जगणं आहे. मी शिक्षणाची कास धरून आपल्यातल्या न्यूनगंडाला मागे सोडू शकलो. मात्र आज अनेक गावात असे फ्रँडी आहेत. जे तो न्यूनगंड घेऊन जगताहेत. मला त्या अनेक फॅन्ड्रीचे जगणे पडद्यावर आणायचे होते. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या जगण्यात जर काही बदल घडला तर माझ्या या चित्रपटाचं सार्थक झालं असं मी म्हणेन.’ या चित्रपटात सोमनात अवघडे, राजेश्वरी खरात, सूरज पवार, छाया कदम, प्रवीण तरडे, ज्योती सुभाष आणि किशोर कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘कॉफिन मेकर’ची टीम रेड कार्पेटवर
नसिरुद्दीन शाहा प्रमुख भूमिकेत असलेला ‘कॉफिन मेकर’ हा चित्रपट या महोत्सवादरम्यान दाखवण्यात आला. हा एक इंग्रजी चित्रपट असून, शवपेटी तयार करणाऱ्या माणसाची ही कथा आहे. या चित्रपटात गोव्याचंच चित्रीकरण आहे. म्हणूनच या इंग्रजी चित्रपटात गोव्याची गायिका हेमा सरदेसाई हिने कोकणी गाणं गायलं आहे. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी योग्य व्यक्ती सापडत नव्हती. पण अचानक माझ्या डोळ्यांसमोर नासिरुद्दीन शाहा यांचं नाव आलं. माझ्या मते तीच व्यक्ती या भूमिकेसाठी योग्य होती, असं चित्रपटाच्या दिग्दर्शिका वीण बक्षी यांनी सांगितलं. चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी चित्रपटातले कलाकार उपस्थित होते. त्यात नसिरुद्दीन शाहा, रत्ना पाठक, गायक हेमा सरदेसाई, दिग्दर्शक वीणा बक्षी, सहकलाकार शिल्पा शुक्ला आणि महाबानू मोदी- कोतवाल या कलाकारांनी रेड कार्पेटवरून प्रवेश केला.
This piece was cogent, we-liwrltten, and pithy.