सीरिया व सीरियात धुमाकूळ घालणारी ‘इसिस’ ही ठगांची टोळी असून ती कधीच जिंकणार नाही.
वॉशिंग्टन- सीरिया व सीरियात धुमाकूळ घालणारी ‘इसिस’ ही ठगांची टोळी असून ती कधीच जिंकणार नाही. या दहशतवादी संघटनेच्या विरोधात संपूर्ण जगाने एकजूट दाखवायला हवी, अशी घोषणा अमेरिकेचे उपाध्यक्ष ज्यो बिडेन यांनी केली.
अमेरिकेला उद्देशून केलेल्या भाषणात बिडेन म्हणाले की, ‘इसिस’ ही ठगांची टोळी असून त्यांना कोणतीही विचारधारा नाही. या दहशतवादी टोळीचा बीमोड करण्यासाठी जगाने एकत्र यायला हवे. आम्ही संपूर्ण जगाला पराभूत करू अशी धारणा घेऊन ‘इसिस’ जगात दहशतवाद पसरवत आहे. यासाठी ते अधिकाधिक भरती करत आहेत. मात्र ते जिंकू शकतील का ? याबाबत माझ्या मनात शंका आहे.
पॅरिस, बैरूत, इराक व नायजेरियात झालेले हल्ले नृशंस होते. दहशतवादाची भयानकता त्यातून दिसून आली. मात्र, याच काळात संपूर्ण जग एकत्रित आल्याचे दिसून आले आहे. रस्त्यावर अडकलेल्या व्यक्तींना पॅरिसमधील टॅक्सीचालकांनी सुरक्षितपणे घरी सोडले.
अनेक जण स्वेच्छेने रक्तदानासाठी तयार झाले. ही घटना अत्यंत छोटी होती, मात्र आम्ही दहशतवादासमोर झुकणार नाही हे दाखवून देणारी होती. दहशतवादाच्या विरोधात आम्ही एकजुटीने लढणार असल्याचे त्यांनी दाखवून दिले, असे ते म्हणाले.
सिरियन निर्वासीतांना अमेरिकेत प्रवेश देण्यास विरोध होत असल्याबद्दल ते म्हणाले की, सीरियन निर्वासितांना प्रवेश देण्यापूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणे गरजेचे आहे. निर्वासितांना राजश्रय देताना अभ्यास करावा लागेल.
अमेरिकेत येण्यापूर्वी त्यांना कडक सुरक्षा चाचण्यांना सामोरे जावे लागेल. त्यांच्या हातांचे ठसे घेतले जातील. त्यांची सर्व पार्श्वभूमीवर तपासली जाईल. अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागाकडून त्यांच्या मुलाखती घेतल्या जातील. हे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर एफबीआय, राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्र, संरक्षण विभाग आदींनी हिरवा कंदील दाखवणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दहशतवादाची भीती लक्षात घेऊन आम्ही सुरक्षेसाठी आणखीही चाचण्या करू शकतो. अमेरिकेत निर्वासितांचा मोठा लोंढा आदळण्याची शक्यता कमी आहे. कारण अमेरिकेत येण्यापूर्वी निर्वासितांची कडक तपासणी केली जाईल. त्यासाठी १८ ते २४ महिन्यांचा कालावधी लागेल, असे बिडेन म्हणाले.
इराक वर हल्ला करून इराक बेचिराख करणारे अमेरिकन हे दह्शद वादी इसीस चे बाप आहेत