स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांच्या हक्कासाठी लढणारी शिवसेनाच आता कामगारांच्या मुळावर उठली आहे.
मुंबई- स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांच्या हक्कासाठी लढणारी शिवसेनाच आता कामगारांच्या मुळावर उठली आहे. चक्क काही टक्केवारी पदरात पाडून घेण्यासाठी प्रशासनासोबत हातमिळवणी करत शिवसेनेने महापालिका रुग्णालयांचे खासगीकरण करायला मान्यता दिली आहे.
महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये खासगी कंपन्यांकडून स्वच्छतेचे काम करून घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देत शिवसेनेने रुग्णालयांमधील कामगारांना उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला आहे.
कामगारांची भरती, तसेच अनुकंपा तत्त्वावर कामगारांची भरती न करता काही खासगी कंपन्यांच्या भल्यासाठी रुग्णालयांची स्वच्छता त्यांच्याकडून घेण्याचा प्रस्ताव मंजूर करत शिवसेनेने एक प्रकारे कामगारांसाठी कबरच खोदली असून यामुळे भविष्यात कामगारांची भरतीच बंद होऊन महापालिकेतील नोकरीची वाट बंद होणार आहे. कामगारांच्या नोकरभरतीवर गदा येणार असल्यामुळे महापालिका मुख्यालय इमारतीच्या स्वच्छतेचे काम खासगी कंपनीकडून करून घेण्याचा प्रस्ताव याच शिवसेनेने नामंजूर केला होता.
बुधवारी मात्र महापालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय आणि विशेष रुग्णालयांमधील स्वच्छतेच्या कामांसाठी कंत्राट देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यासाठी अनुक्रमे बीव्हीजी, क्रिस्टल आणि ब्रिस्क या तीन कंपन्यांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचे कंत्राट देण्याच्या प्रस्तावाला शिवसेना-भाजपाने मंजुरी दिली.
हा प्रस्ताव मंजुरीला आला असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी याला विरोध करत अशा प्रकारे खासगीकरण केले जात आहे, हे काम आपल्या कामगारांकडून करून घेतले पाहिजे. अनुकंपा तत्त्वावर अनेक कामगार प्रतीक्षेत आहेत, त्यांना सेवेत घेतले पाहिजे,अशी सूचना केली. विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनीही याला तीव्र विरोध करत महापालिकेचे कामगार आजही काम करत आहेत.
पण कोणत्याही कामगारांकडून चांगले काम होत नाही,अशी तक्रार आलेली नाही, मग खासगी कंपन्यांची निवड का? केवळ भाजपाच्या एका नेत्याचा प्रस्ताव आहे म्हणून प्रस्ताव मंजूर करून कामगारांना देशोधडीला लावायचे का? असा सवाल करत जर हा प्रस्ताव मंजूर झाल्यास याचे पाप हे शिवसेना-भाजपाचे असेल,असा इशारा दिला.
आस्थापना खर्च भविष्यात वाढत असल्यामुळे तसेच उत्पन्न कमी होणार असल्यामुळे अशाप्रकारच्या प्रस्तावाची गरज आहे. त्यामुळे खासगी संस्थेकडून स्वच्छता राखणे ही आवश्यक असल्याचे भाजपाचे दिलीप पटेल यांनी स्पष्ट केले.
महापालिकेचे कामगार कर्तव्यापासून दूर पळत आहेत. त्यामुळे चांगली साफसफाई राखली जाणे गरजेचे असल्याचे शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी स्पष्ट करत खासगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन करून डॉक्टर, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना सॅल्यूट ठोकायला सांगा, अशी सूचना केली.
सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनीही याचे समर्थन करत खासगी कंपनीच्या कामगारांना आणि सुरक्षा रक्षकांना महापालिकेच्या वतीने गणवेश तसेच ओळखपत्र देण्याची मागणी करत एकप्रकारे खासगीकरणाला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे.
त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधानंतरही केवळ चिरीमिरीसाठी हा प्रस्ताव मंजूर केला. हा प्रस्ताव एक वर्षासाठी असून जर काम समाधानकारक असल्यास पुढील दोन वर्षे त्यांना काम वाढवून देण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी स्पष्ट केले.
Make them complusory to give एम्प्लॉयमेंट to the persons on waiting लिस्ट
विथ ऑल बेनिफिट्स अँड pay as per कॉर्पोरेशन रूल्स