कोकणवासीयांचे आकर्षण ठरलेली वातानुकूलित डबल डेकर रेल्वे गाडी नियमित चालवण्यास कोकण रेल्वेला मंजुरी दिली आहे.
रत्नागिरी- कोकणवासीयांचे आकर्षण ठरलेली वातानुकूलित डबल डेकर रेल्वे अखेर कोकण रेल्वे मार्गावर धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी ही गाडी नियमित चालवण्यास कोकण रेल्वेला मंजुरी दिली आहे. गेले काही महिने ही गाडी अन्य मार्गावर वळवण्याचा खटाटोप सुरू होता. मात्र, ही गाडी कोकण रेल्वे मार्गावरच कायम रहावी, ही कोकणवासीय जनतेची मागणी ‘प्रहार’ने लावून धरली होती. एका विशेष वृत्त मालिकेद्वारे ‘प्रहार’ने यासाठी केलेला पाठपुरावा अखेर सार्थकी लागला आहे.
रत्नागिरी- सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनीही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी येथे केलेल्या रास्ता रोको आंदोलनात रेल्वेमंत्री प्रभूंसह कोकण रेल्वेचे डबल डेकरच्या मागणीकडे लक्ष वेधून घेतले होते. कोकणवासीयांच्या या रास्त मागणीचा विचार झाला नाही तर ‘रेलरोको’चा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला होता.
मध्य रेल्वेच्या ताब्यातील ही गाडी अन्यत्र वळवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच कोकण रेल्वेने नियमित स्वरूपात डबल डेकर चालवण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे तीन दिवसांपूर्वीच परवानगी मागणारा अर्ज केला होता. त्यानुसार मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी मंगळवारी ‘प्रहार’ला दिली. येत्या २६ फेब्रुवारीला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे रेल्वे अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्या आधीच कोकण रेल्वेने डबल डेकरला हिरवा कंदील मिळवल्याने या गाडीची अधिकृत घोषणा २६ तारीखला होऊ शकते.
गेल्या वर्षी मे महिन्यात प्रथमच कोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर रेल्वे गाडीची चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे पहिल्या प्रयत्नातच या दुमजली वातानुकुलित आलिशान गाडीने मुंबईपासून मडगावपर्यंतच्या मार्गावरील बोगदे आणि पूल यशस्वीपणे पार केले. मुंबई- रोहा, रोहा- रत्नागिरी आणि रत्नागिरी ते मडगाव अशी तीन टप्प्यांमध्ये ही चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर कोकणात डबल डेकर रेल्वे गाडीची मोठी चर्चा झाली. यानंतर गेल्या गणेशोत्सवात सुरक्षा आयुक्तांनी ही गाडी विशेष डबल डेकर गाडी म्हणून चालवण्यास परवानगीही दिली.
मात्र, प्रिमियम तिकीट आकारणी आणि त्याचवेळी कोकण रेल्वे मार्गावर झालेला अपघात यामुळे या गाडीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी ऑक्टोबर- नोव्हेंबर २०१४ मध्ये दसरा- दिवाळीत डबल डेकर गाडी पुन्हा कोकण रेल्वे मार्गावर धावली. या कालावधीत डबल डेकरने ३० फे-यांमधून १ कोटी २६ लाख ६६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. दसरा- दिवाळीत या डबल डेकरमधून २० हजार ६२ प्रवाशांनी प्रवास केला होता.
कोकण रेल्वे मार्गावरील फे-या संपल्यानंतर देखभालीसाठी कारशेडमध्ये नेणअयात आलेल्या या गाडीचा मुक्काम काही काळ वसई यार्डात होता. त्यानंतर पुन्हा कोकण रेल्वे मार्गावर आणण्याऐवजी ती दुसरीकडे वळवण्याचा घाट घालण्यात आला. त्या संदर्भातील पहिले वृत्तही ‘प्रहार’नेच नोव्हेंबरमध्ये दिले होते. या नंतर ही गाडी कोकण रेल्वे मार्गावरच सुरू रहावी, यासाठी ‘प्रहार’ने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
तीन दिवसांपूर्वीच कोकण रेल्वेने डबल डेकर नियमित चालवण्याची परवानगी आपल्याकडे मागितली होती. सोमवारीच आपण या अर्जाला मंजुरी दिली असून मंगळवारी तसे पत्र कोकण रेल्वेला जारी करीत आहोत. मात्र, ही गाडी मध्य आणि कोकण या दोन्ही रेल्वे झोनमध्ये चालवली जाणार असल्याने मध्य रेल्वेलाही अशी परवानगी घ्यावी लागणार आहे. – चेतन बक्षी, रेल्वे सुरक्षा आयुक्त, सेंट्रल सर्कल
हि गाडी पुन्हा सुरु व्हावी या साठी सतत पाठपुरावा करणाऱ्या प्रहार दैनिकाचे आणि नितेश राणे यांचे सर्वप्रथम अभिनंदन. फक्त एक विनंती आहे कि ह्या गाडीला खेड,संगमेश्वर,राजापूर,सावंतवाडी इत्यादी महत्वाच्या ठिकाणी देखील थांबे देण्यात यावे.