राष्ट्रीय शैक्षणिक सुरक्षा ठेव (नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझिटरी) योजनेंतर्गत मुंबई विद्यापीठाने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.
मुंबई – राष्ट्रीय शैक्षणिक सुरक्षा ठेव (नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझिटरी) योजनेंतर्गत मुंबई विद्यापीठाने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. यापुढे विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र आता अधिक सुरक्षित आणि सोयीस्करित्या घरबसल्या उपलब्ध होणार आहे.
या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र मोबाइल, लॅपटॉप, संगणकावरून सहज डाउनलोड करता येणार आहे. मंगळवारी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
येत्या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. देशातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेणारे मुंबई विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. सुरुवातीला दुस-या सत्राच्या जाहीर होणा-या निकालाच्या गुणपत्रिका या योजनेद्वारे उपलब्ध करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न असून, त्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षापासून ही प्रक्रिया पदवी, पदव्युत्तर आदी सर्व शाखांसाठी राबवली जाईल.
सध्या देशात शैक्षणिक संस्थांच्या मार्फत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र कागदावर उपलब्ध करून दिली जातात. ती नंतर संबंधित शैक्षणिक संस्थांमार्फत मुळ कागदपत्रांशी पडताळणी करून त्यांची खातरजमा केली जाते. यात अनेकदा गैरप्रकार होण्याचा धोकाही अधिक असतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. तो महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक ठेव योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांची हरवलेली गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रही पुन्हा एकदा उपलब्ध होणार असून, शैक्षणिक कागदपत्रे ‘डी-मॅट’ पद्धतीने दीर्घकाळ जतन करून ठेवली जाणार आहेत.
ही सर्व कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशिष्ठ लिंक उपलब्ध होणार असून लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. विशेष म्हणजे गुणपत्रिकांवर डिजीटल स्वाक्षरी असणार आहे. जेणेकरून कधीही पडताळणी करणे सोपे जाईल.
अशी असेल योजना..
इलेक्ट्रॉनिक पद्धतीने माहितीचे स्त्रोत तयार करून जतन
शैक्षणिक कागदपत्रांची विद्यार्थ्यांला गरज पडेल तिथे उपलब्धता
शैक्षणिक कागदपत्रांवर डिजिटल स्वाक्षरी
गुणपत्रक पडताळणीसाठी लागणारा वेळ वाचणार
गुणपत्रिका सुरक्षेसाठी वॉटरमार्क पद्धत
मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना येत्या काळात मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट ऑनलाइन मिळेल म्हणजे मुंबई विद्यापीठाने आपल्या वेबसाइडचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी नापास झाल्यावर गुणपडताळणीकरितासुद्धा हेलपाटा घालतात त्यामुळे त्यांच्या वडिलांचे कष्टाचे पैसे व विद्यार्थ्यांचा वेळही वाया जातो. मुंबईचे धकाधकीचे जीवन,वाढती वाहतुककोंडी त्यामुळे आपल्या पाल्यास घराव्यतिरिक्त बाहेर पाठविताना पालकांचे काळीज धडधडते, तेव्हा गुणपडताळणीकरितासुद्धा ऑनलाइन अर्ज भरून घ्यावेत, जेणेकरून विद्यार्थी निश्चिंत राहतील. मार्कशीट,डिग्री विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन केल्याने मुंबई विद्यापीठात अतिरिक्त कामगार ठेवल्याने मुंबई विद्यापीठाच्या ताळेबंद हिशोब तपासणीस म्हणजेच लेखापालास त्याच्या पगाराच्या आणि ओवर टाईमच्या Provisional Budgetsकरिता जास्त काम/मागणी करता येणार नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या पगाराच्या फंडात ग्राह्य असलेल्यापेक्षा जास्त पैसा खर्च होणार नाही.