आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टींचा वापर आपण रोजच्या जगण्यात करत असतो. पण अतिपरिचयाच्या असूनही आपल्याला त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती नसते. म्हणूनच आमच्या छोट्टम-मोठ्ठम खास दोस्तांसाठी आम्ही आपल्या रोजच्या वापरातील काही गोष्टींची रंजक माहिती घेऊन येत आहोत..
दोस्तांनो, मांजर हा आपला सगळ्यांचा आवडता प्राणी. लहानपणापासून आपण माऊच्या गाणी-गोष्टी ऐकत आलो आहोत. आज या आपल्या आवडत्या पाळीव प्राण्याच्या काही सवयी आणि इतर काही रंजक गोष्टी जाणून घेउया.
तुम्हाला माहिती आहे का, मध्य आशियात उगम झालेला मांजर हा जगातील सर्वाधिक प्रसिद्ध प्राणी आहे. आफ्रिकन जंगली मांजरांपासून उत्क्रांत होत आलेली सध्याची मांजरं आपण पाहत आहोत. अश्वयुगात माणसाने मांजर पाळायला सुरुवात केली. उंदीर माणसाने साठवलेल्या धान्याची नासाडी करू लागले, तेव्हा माणसाने मांजर पाळण्यास सुरुवात केली असावी.
मांजर आपापसात काही संवाद करत नाहीत, पण माणसांमध्ये असताना मात्र ती गुरगुरणं, फुसफुसणं, म्यावम्याव असा आवाज करत असतात. मनुष्याशी संवाद साधण्यासाठीच मांजरांना ही व्यक्त होण्याची कला अवगत झाली असावी. एका संशोधनात हे सिद्ध झालं आहे, की मांजरांना कुरवाळल्याने मनुष्याच्या शरीरात हार्मोन ऑक्सिटॉसिन स्र्वतं आणि माणसाला आरामदायी अनुभव मिळून माणूस आनंदी होतो.
सायप्रस शहरात एका मांजराच्या कबरीशेजारी दफन करण्यात आलेल्या एका माणसाची ९,५०० वर्षे जुनी कबर सापडली आहे. जगात आढळणारी ५०० दशलक्ष मांजरे केवळ पाच जातीच्या मांजरांपासून अस्तित्वात आली आहेत, असं एक संशोधनात आढळून आलं आहे. बहुतांश पाळीव मांजर आपलं अन्न वेगवेगळ्या मार्गने मिळवतात. ब-याचदा कित्येक घरातून जे मिळेल त्याचा फडशा पाडतात किंवा शिकार करून आपलं पोट भरतात.
त्यामुळे मांजराला शिकारीचं कसब अवगत असतं. ते त्यांना त्यांच्या वाडवडिलांकडून अगदी सहज मिळतं. मांजर अतिशय काटक असतात. त्यांच्या शरीरासाठी आवश्यक असलेलं पाणी ते ब-याचदा मांस खाऊन मिळवतात. इतकंच नव्हे तर त्या समुद्राचं पाणीदेखील पिऊ शकतात. मांजर ब-याचदा संधिप्रकाशात शिकार करतात. सर्वसाधारणपणे आपल्याला एखादी गोष्ट पाहण्यासाठी जेवढा प्रकाश लागतो त्याच्या एक षष्ठमांश प्रकाशात मांजरांना दिसू शकतं. तसंच इतर कोणत्याही सस्तन प्राण्यापेक्षा त्यांची ऐकण्याची क्षमता खूपच प्रभावी असते. खरं म्हणजे चिमण्यांच्या मृत्यूला ३० टक्के मांजरं जबाबदार असतात, असं म्हटलं तरी चालेल.
मांजरांचे डोळे का चमकतात?
डोळ्यांची खोबण
इतर प्रांण्यांच्या तुलनेत मांजरांच्या डोळ्यांची खोबण त्यांच्या कवटीच्या मानाने खूप मोठी असते.
बुब्बुळ
अंधुक प्रकाशात मांजरांचं बुब्बुळ त्यांच्या डोळ्यांच्या आकाराइतकं मोठं होऊ शकतं.
रेखाकार बुब्बुळ
अतिप्रकाशातही नीट दिसावं म्हणून मांजरे आपल्या डोळ्यांच्या बाहुल्यांचा आकार उभ्या रेषेसारखा करतात.
टॅपिटम ल्युसिडम
मांजरांच्या दृष्टिपटलाच्या मागे एक प्रकाश परावर्तित करणारा थर असतो. या भागावर आलेला प्रकाश परावर्तित केला जातो.
दृष्टिपटल
मांजरी निळा, पिवळा आणि हिरवा या रंगांमधला फरक ओळखू शकतात. पण लाल रंग ओळखण्याची त्यांची क्षमता कमी असते.
मांजराला ऐकू कसं येतं ?
आवाज अचूक ऐकण्यासाठी मांजरांना कान पुढच्या किंवा मागच्या दिशेनं हलवता येतात. मांजरं आपल्या गरजेनुसार काही ध्वनिलहरी ऐकू शकतात तर काही ऐकायचं टाळू शकतात. कुत्र्यांपेक्षा एक सप्तक वरचढ ऐकण्याची क्षमता मांजरांकडे असते.
माझ्या घरी मी एक मांजर पाळली आहे. मला तिला स्पर्श करावासा वाटतो.पण माझी आई सांगते की ती चावते. त्यामुळे मला तुम्हाला असे विचारायचे आहे की खरच मांजर चावते काय?