शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविना प्रथमच दसरा मेळावा आयोजित करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी अक्षरक्ष: आटापिटा चालवला आहे.
मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविना प्रथमच दसरा मेळावा आयोजित करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी अक्षरक्ष: आटापिटा चालवला आहे. त्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली असून विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी ३५० मोटारसायकली उपलब्ध करून शक्तिप्रदर्शनासाठी जोर लावण्याचे ‘आदेश’ जारी झाले आहेत.
युवा सेनेचे बहुतेक कार्यकर्ते कॉलेज विद्यार्थी असल्याने त्यांना मोटारसायकलसाठी प्रत्येकी २०० रुपये पेट्रोलखर्च उपलब्ध करून देण्याचा फतवाही काढण्यात आला असून दस-याच्या दिवशी आदित्यबाबांचा पुकारा करत ही तरुणाई युवा सेनेचे शक्तिप्रदर्शन करताना दिसणार आहे, अशी विश्वसनीय माहिती शिवसेनेच्याच गोटातून देण्यात आली आहे.
दसरा मेळावा म्हटल्यावर बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवाजी पार्कवर प्रचंड जनसागर उसळतो. मात्र, बाळासाहेबांना मानणा-या शिवसैनिकांची गर्दी यंदा उद्धव ठाकरेंसाठी होईल का, याबाबत शंका असल्याने शाखा-शाखांना प्रत्येकी पाच बसेसमधून किमान २५० जणांची गर्दी जमवण्याचे फर्मान यापूर्वीच धाडण्यात आले आहे.
पक्षप्रमुखांबरोबर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंसाठीही हा मेळावा महत्त्वाचा आहे. त्यासाठी तरुणांच्या मदतीने मोटारसायकलींवरून ‘रोड शो’ करत ‘आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर गर्दी जमवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. या तरुणांना आदित्य ठाकरे आगे बढोची नारेबाजी करत फिरण्याच्या विशेष सूचनाही देण्यात आल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून समजते. दस-याच्या दिवशी दुपारनंतर युवा सेना शक्तिप्रदर्शन करणार असल्याने ठिकाणी वाहतुकीचा बो-या वाजणार आहे.
एका विधानसभा मतदारसंघात सहा नगरसेवकांचे प्रभाग असून त्यातील प्रत्येक शाखांना ४० ते ५० मोटारसायकलस्वार कार्यकर्ते शोधायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. सोबत दोनशे रुपयांच्या पेट्रोल खर्चासह चहा-पानाच्या खर्चाचा भारही प्रत्येक शाखांच्या युवा शाखाध्यक्षांवर पडला आहे. त्यामुळे हा खर्च मुख्य शाखाप्रमुख, नगरसेवक आणि आमदारांकडून वसूल होणार आहे. पैसा खर्च केला जाऊ शकतो, पण माणसे व मोटारसायकली असलेल्या तरुणांना कसे आणायचे, याच चिंतेने शिवसेनेच्या पदाधिका-यांना भंडावून सोडले आहे.
Aditya Thakare yanche Kami Bolane pan kam jasta karne hya vruttiche aahe.
Te evodhya kami vayat prayatna karat aahet, he kai kami zale.