कोकणात बंद झालेली डबलडेकर ट्रेनची धडधड कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला.
मुंबई- कोकणात बंद झालेली डबलडेकर ट्रेनची धडधड कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला.
बुधवारी ही गाडी पहाटे ५.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन मडगाव करता रवाना करण्यात आली. यावेळी पहिल्याच दिवशी तब्बल ५२ टक्के गाडी फुल्ल झाल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आलोक बडकुल यांनी दिली.
या गाडीला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतरही गाडी सुरु करण्यात न आल्याने जोरदार टिका झाली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने सर्व अडचणी बाजूला सारत बुधवारी ही गाडी मडगाव करता रवाना केली. या गाडीच्या पहिल्याच दिवशी ८९० प्रवाशांनी या गाडीतून प्रवास केला. शिवाय, येत्या काळात नाताळ आणि नववर्षामुळे गोव्याकडे जाणा-या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने या गाडीला पुढील काळात अधिक चांगला प्रतिसाद मिळेल असा अंदाज रेल्वेचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.
यापूर्वी सुरवातीला गणेशोत्सवात डबल डेकर ट्रेन प्रिमियम तिकिट दराने चालवण्यात आली होती. या प्रणालीमध्ये वाढत जाणा-या तिकिट दरामुळे प्रवाशांनी या गाडीकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर दिवाळीत पुन्हा ही गाडी साध्या वातानुकुलित तिकिट दराने चालवण्यात आली होती. मात्र, मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाच्या मोठा फटका त्यावेळी या गाडीला बसला होता.
अद्याप नियोजनात त्रुटी कायम
दरम्यान, पुन्हा सुरु करण्यात आलेली गाडी पहाटे ५.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून मडगाव करता रवाना करण्यात येते. मात्र, पश्चिम उपनगरात राहणा-या प्रवाशांना पहाटेच्यावेळी लोकमान्य टिळक टर्मिनस गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय, यापूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून इस्थर अनुह्या या तरुणीचे अपहरण करुन खुन करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात पहाटेच्यावेळी रहदारी कमी असल्याने सुरक्षेचा प्रश्न आजही कायम आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातून पहाटे ५.३० वाजता ही गाडी चालवली जात असताना दादर टर्मिनस स्थानकातून ५.२५ वाजता जनशताब्दी एक्सप्रेस रवाना करण्यात येते. त्यामुळे केवळ ५ मिनिटांच्या फरकाने मडगाव करता दोन गाडया चालविल्या जात असल्याने साहजिकच सोयीस्कर असलेल्या दादर स्थानकातून जनशताब्दी ट्रेनचा प्रवास करणे प्रवाशांना सोयीचे जाईल. त्याऐवजी ही गाडी रात्रीच्यावेळी चालवल्यास या गाडीला अधिक चांगला प्रतिसाद मिळेत असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.
ह्या ट्रेन ला संगमेश्वर,विलवडे,वैभववाडी,कुडाळ या स्थानकांवर थांबे दिल्यास प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद ह्या ट्रेन ला मिळेल.